पिठापुरम् (आंध्रप्रदेश) येथे श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या भेटीसाठी साक्षात् श्री दत्तगुरु वृद्ध पुजार्‍याच्या रूपात येणे

सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ १४.११.२०२२ या दिवशी आंध्रप्रदेश येथील पिठापुरमला  गेल्या होत्या. त्या वेळी पिठापुरम् येथे घडलेली दैवी लीला पुढे दिली आहे.

वयस्कर पुजार्‍यांच्या रूपातील दत्तगुरूंना भावपूर्ण वंदन करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
दत्तमंदिरातील पुजारी आजोबांच्या समवेत भावविभोर झालेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. पिठापुरम् येथील दत्तमंदिरात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी पुजार्‍यांना सांगितले, ‘‘आम्ही हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना करायला आलो आहोत.’’ तेव्हा पुजार्‍यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना सनातनच्या ३ गुरूंच्या नावाने गाभार्‍यात ३ नारळ बांधायला सांगितले. नारळ आणेपर्यंत पुजार्‍यांनी दत्तपादुकांवर अभिषेक केला आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना गाभार्‍याच्या उंबरठ्याजवळ येऊन दत्तपादुकांचे दर्शन घ्यायला सांगितले. पादुकांचे दर्शन होताच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंची भावजागृती झाली. त्यांची स्थिती विलक्षण होती. जणू डोळ्यांतील भावाश्रूंनी त्या दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक करत होत्या.

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना दत्तगुरूंचे झालेले दिव्य दर्शन आणि अनुभवलेली दैवी लीला !

२ अ. दत्तगुरूंच्या मूर्तीतून दत्तगुरुच पांढरी दाढी असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या रूपात येणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू दत्तगुरूंच्या मूर्तीकडे पाहून प्रार्थना करत असतांना दत्तगुरूंच्या मूर्तीतून पांढरी दाढी असलेली वृद्ध व्यक्ती सूक्ष्मातून बाहेर येतांना दिसली. ‘तेच दत्तगुरु आहेत’, असे काकूंना जाणवले.

२ आ. सूक्ष्मातून दत्तगुरूंच्या मूर्तीतून बाहेर पडलेल्या वृद्ध व्यक्तीप्रमाणेच वृद्ध पुजारी तेथे येणे आणि यांतून दत्तगुरूंनी ‘मीच तो अत्रीपुत्र दत्तात्रेय आहे’, याची साक्ष पटवल्याचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांनी सांगणे : तितक्यात एक पांढरी दाढी असलेले वयस्कर आजोबा घाईघाईने आले आणि गाभार्‍यात गेले. थोड्या वेळाने ते गाभार्‍यातून बाहेर आले. त्या आजोबांकडे बघून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू त्यांच्या मागे मागे चालायला लागल्या. आम्हा साधकांना ‘हे काय घडत आहे’, हे कळेना. हातात ३ नारळ घेऊन काकू त्या पुजार्‍याच्या वेषातील आजोबांच्या मागे धावत होत्या. थोडे दूर चालत गेल्यावर आजोबांनी मागे वळून पाहिले आणि ते थांबले. त्या आजोबांकडे पाहून पुनः एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंची भावजागृती झाली. त्या एका वेगळ्याच स्थितीत होत्या. त्यांनी आम्हा साधकांना सांगितले, ‘‘मला दत्तगुरूंच्या मूर्तीतून पांढरी दाढी असलेली वृद्ध व्यक्ती सूक्ष्मातून बाहेर येतांना दिसली होती. आता अगदी तशीच व्यक्ती आपल्यासमोर आली आहे. यांतून दत्तगुरूंनी ‘मीच तो अत्रीपुत्र दत्तात्रेय आहे’, याची साक्ष पटवली आहे.’’

२ इ. आजोबांकडे पहाताच श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ काकूंना देव भेटल्याचा आनंद होऊन त्यांची भावविभोर स्थिती होणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी त्या आजोबांकडे बघत भावविभोर स्थितीत त्यांना विचारले, ‘‘आजोबा, तुम्ही या मंदिरात कधीपासून सेवा करत आहात ?’’ आजोबा म्हणाले, ‘‘अगं आई, मी या मंदिरात माझ्या जन्मापासून आहे. माझा जन्म १९४२ मध्ये झाला.’’ हे ऐकतांच काकूंच्या चेहर्‍यावर देव भेटल्याचा आनंद दिसत होता. तो क्षण वेगळा होता.

३. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री महालक्ष्मी असल्याची मिळालेली साक्ष !

३ अ. आजोबांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना स्वतःची आई आणि सर्व जगाचे पालनपोषण करणारी ‘आदिशक्ति’ संबोधून त्यांच्यातील देवत्वाची जाणीव करून देणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंकडे पाहून आजोबा म्हणत होते, ‘‘अगं आई, तूच माझी आई आहेस. तू केवळ माझी आई नसून सर्व जगाचे पालनपोषण करणारी ‘आदिशक्ति’ आहेस. माझ्या जन्मापासून आतापर्यंत तूच माझे पोषण करत आली आहेस.’’

खरोखरंच ‘देव’ आला होता. दत्तगुरूंनी त्या वयस्कर आजोबांच्या माध्यमातून स्वतःची साक्ष पटवून दिली. दत्तगुरूंनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना त्यांच्यातील देवत्वाची, म्हणजे आदिशक्तितत्त्वाची जाणीव करून दिली होती किंबहुना ते त्यासाठीच आले असावेत; कारण आजोबा म्हणाले, ‘‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूच त्यांचे पालन-पोषण करत आहेत.’’

३ आ. दत्तगुरु प्रतिदिन भिक्षा मागायला दुपारी १२ वाजता कोल्हापूरला श्रीमहालक्ष्मीकडे येत असून त्याच वेळी आजोबा आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंची भेट झाल्याने दत्तगुरूंनी त्या महालक्ष्मी असल्याचे दाखवून दिले.

३ इ. सप्तर्षींनी केलेल्या नाडीपट्टीच्या वाचनातही त्यांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंचा उल्लेख ‘श्रीदेवी’ असा केला आहे आणि पृथ्वीवर ‘श्रीदेवीचा’ वास कोल्हापुरात आहे, हे सर्वश्रुत आहे.

४. श्रीविष्णु आणि श्रीमहालक्ष्मी यांची दैवी लीला

देव भक्ताजवळ येतो; मात्र ‘तो देवच आहे’, हे त्या भक्ताला कळेलच, असे नाही. श्रीमहालक्ष्मी स्वरूप श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या दर्शनासाठी दत्तगुरूंनी वृद्ध पुजार्‍यांच्या रूपात येणे, ही भक्त आणि भगवंताची भेट नसून ती एक दैवी लीला होती. ही श्रीविष्णु आणि श्रीमहालक्ष्मी यांची लीला होती. ती आम्हा भक्तांसाठी होती. या दैवी भेटीमध्ये काही क्षणांतच दत्तगुरूंनी ‘मी स्वतः पृथ्वीवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात विराजमान आहे’, असा संदेश दिला आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या रूपात सर्वत्र दैवी प्रवास करणारी साक्षात् श्रीमहालक्ष्मी आहे’, याचीही जाणीव करून दिली. यासाठी आम्ही सर्व सनातनचे साधक दत्तगुरुस्वरूपी गुरुदेवांच्या चरणी आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), भाग्यनगर, तेलंगाणा. (१६.११.२०२२)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर दत्तगुरूंची असलेली कृपा आणि अनुभवलेली दैवी लीला !

४ अ. दत्त तीर्थक्षेत्रांजवळ आणि दत्तजयंतीला जन्म होणे : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंचा जन्म दत्तजयंतीचा आहे. त्यांचा जन्म सांगली येथे झाला आहे. सांगलीच्या जवळच नरसोबावाडी आणि औदुंबर ही २ प्रमुख दत्तक्षेत्रे आहेत. हे सर्व योगायोग नसून ‘दैवी लीला’ आहेत, असेच म्हणावे लागेल.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दत्तगुरु म्हणून पहाण्यास सप्तर्षींनी नाडीपट्टीत सांगणे : वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेला सप्तर्षींनी सांगितले होते, ‘साधकांनी गुरुदेवांकडे दत्तगुरु म्हणून पहावे.’ आजोबांनी त्यांचा जन्म १९४२ मध्ये झाल्याचे सांगितले. गुरुदेवांचे जन्मवर्षही १९४२ आहे. यातून दत्तगुरूंनी दाखवून दिले, ‘दत्तगुरु आणि प.पू. डॉक्टर एकच आहेत.’

४ इ. दत्तगुरूंनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ३ वेळा मानव रूपात दर्शन देणे : वर्ष २००८ मध्ये माणगाव (प.प. वासुदेवानंद टेंबेस्वामी यांचे स्थान, कुडाळ) आणि वर्ष २०१३ मध्ये भिक्षालिंगाला (कोल्हापूर येथील दत्त भिक्षापात्राला) दत्तगुरूंनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना मानवरूपात दर्शन दिले होते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘काही वर्षे साधना झाल्यावर दत्तगुरूंनी तिसर्‍यांदा वृद्ध पुजार्‍यांच्या रूपात साक्ष दिली.’’

– श्री. विनायक शानभाग

श्रीक्षेत्र पिठापुरमची दिव्य महती

श्रीक्षेत्र पिठापुरम्

पिठापुरम् हे दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान होय. पिठापुरम्च्या श्रीकुक्कुटेश्वर मंदिराच्या परिसरात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. औदुंबर वृक्षाच्या बाजूला एका छोट्या मंदिरामध्ये दत्ताची स्वयंभू मूर्ती आहे. भक्ताच्या मनात काही इच्छा किंवा नवस असेल, तर तो पूर्ण होण्यासाठी दत्तगुरूंच्या गाभार्‍यात नारळ बांधण्याची प्रथा आहे.

– श्री. विनायक शानभाग

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक