कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकवण्याची धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन !

चिपळूण येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची चेतावणी !

जुने एस्.टी. स्टँड, बाजारपेठ येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते

चिपळूण, ४ जून (वार्ता.) – भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ आणि कलम ३० अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्याची तरतूद आहे. यानुसार ख्रिस्ती मुलांना बायबल शिकवले जाणे, एकवेळ समजता येईल; मात्र त्याच शाळेत बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांनाही बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही धार्मिक बळजोरी न थांबवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’द्वारे देण्यात आली. हे आंदोलन आज येथील जुने एस्.टी. स्टँड, बाजारपेठ येथे सकाळी ११ ते १२.१५ या वेळेत करण्यात आले. आंदोलनाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सचिन सकपाळ यांनी केले. आंदोलनानंतर नायब तसीलदार टी.एस्. शेजाळ यांना याविषयी निवेदन देण्यात आले.

घटनाविरोधी कृतीला आमचा विरोधच असेल ! – शशिकांत मोदी, नगरसेवक, शिवसेना

कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. हिंदु विद्यार्थ्याना बायबल शिकण्याची सक्ती करणे, ही घटनाविरोधी कृती असून त्याला विरोध केला जाणारच.

राज्यघटनेच्या कलम २९ आणि ३० मध्ये सरकारने सुधारणा करावी !- डॉ. (सौ.) साधना जरळी , सनातन संस्था

राज्यघटनेच्या कलम २९ आणि कलम ३० यांचा गैरवापर करून ख्रिस्ती शिक्षण संस्था बायबल शिकण्याची सक्ती लादत असतील, तर या दोन्ही कलमांमध्ये सुधारणा करण्यात यावी.

धर्माचरणावर बंधने लादणार्‍या कॉन्व्हेंट शाळांच्या मनमानीला आळा बसवावा !- सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु विद्यार्थांना टिळा लावू न देणे, विद्यार्थिनींना कुंकू-टिकली लावू न देणे, हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी शाळांच्या परीक्षा ठेवणे यांसारखे गैरप्रकार करणार्‍या कॉन्व्हेंट शाळांचा परवाना रहित करून शासनाने त्यांच्या मनमानीला आळा बसवावा.

आंदोलनात उपस्थित असलेले मान्यवर

या आंदोलनात माजी सैनिक संघटनेचे ऑनररी कॅप्टन श्री. अनंत शिंदे, जय हनुमान मित्र मंडळ ओझरवाडीचे अध्यक्ष श्री. अशोक घेवडेकर, वारकरी संप्रदायचे ह.भ.प. लक्ष्मण चिले, ह.भ.प. दत्तात्रय शितपगुरुजी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष मालप, तालुका सरचिटणीस श्री. मंदार कदम, रा.स्व. संघाचे श्री. अंकुश जंगम, मुरादपूर येथील साईनाथ भक्त सेवा मंडळाचे श्री. महेश गुढेकर, श्री. विष्णु लाणे, पेठमाप येथील शिवनेरी चौक मित्रमंडळाचे श्री. राजू विखारे, पेठमाप येथील श्री. महाकाली देवस्थानचे सल्लागार श्री. मोहन तांबट, सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष घोरपडे, जगदीश यादव यांसहित ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते.