सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र १९९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले. याचा लाभ ३४ सहस्र ६४६ जिज्ञासूंनी घेतला, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत ३२ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ २६ सहस्र ३० जिज्ञासूंनी घेतला. यासमवेतच ३८३ हून अधिक प्राचीन मंदिरे आणि ग्रामदेवतांची मंदिरे यांठिकाणी ‘मंदिर स्वच्छता अभियान’ही राबवण्यात आले. या उपक्रमात ३ सहस्र ५९९ भाविक सहभागी झाले होते. या अभियानात ग्रामस्थ, समाजातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत २६१ ठिकाणी साधनाविषयक प्रवचने घेण्यात आली. त्याचा ५ सहस्र ९०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
या अभियानात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, विभिन्न धर्मसंप्रदाय एकत्र येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदूसंघटनाच्या विचाराला बळकट बनवले. ७० सहस्रांहून अधिक हिंदूंनी या अभियानाच्या अंतर्गत हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभाग घेतला. या सर्वांचे आभार मानतो आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच हे कार्य होऊ शकले, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.