उद्दाम धर्मांध !

संपादकीय

मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली, तर मंदिरांसमोर बसून भोंग्यांवरून कुराण पठण करू, अशी धमकी समाजवादी पक्षाच्या नेत्या रूबीना खानम यांनी दिली आहे. मशिदींवर भोंगे लावून कर्णकर्कश अजान दिल्यामुळे होणारा त्रास लोकांनी बरीच वर्षे सहन केला; मात्र आता त्यांच्याही सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अवैध भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंत समयमर्यादा दिली आहे. त्यामुळे भोंग्यांच्या सूत्रावरून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतभरातील वातावरण तापले आहे. भोंग्यांवरून दिली जाणारी अजान आणि त्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण हे तसे जुनेच सूत्र; मात्र आता ते हिंदूंनीही लावून धरल्यामुळे धर्मांधांचे पित्त खवळले आहे. रूबीना खानम यांनी दिलेली धमकी हा त्याचाच भाग आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ‘अवैध भोंग्यांद्वारे अजान देऊन आणि त्याद्वारे लोकांना त्रास देऊन स्वतःचे काहीतरी चुकत आहे’, याचे या धर्मांधांना काहीच वाटत नाही. एवढेच नव्हे, तर स्वतःला सुधारणावादी म्हणवून घेणारे मुसलमानही या प्रकरणात गप्प आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्यांकांना इतके लाडावून ठेवले आहे की, आमचे कुणीच काही वाकडे करू शकणार नाही, हे त्यांनी पुरेपूर ओळखले आहे. त्यामुळे भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करणे, हे कायद्याने चुकीचे असले, तरी ते निर्धास्त आहेत. त्याही पुढे जाऊन त्याची जाणीव करून देणार्‍यांच्या विरोधात ते कृती करण्यास सिद्ध आहेत. त्यासाठी रूबीना खानम यांनी धर्मांध महिलांना संघटित केले आहे. याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पी.एफ्.आय.च्या धर्मांध पदाधिकार्‍याने धमकी दिली होती.

एकंदरीत धर्मांध घेत असलेली भूमिका पहाता ‘हे प्रकरण चिघळणार’, हेच प्रकर्षाने दिसून येते. हे लक्षात घेऊन आता हिंदूंनी सतर्क राहिले पाहिजे. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती या उत्सवांच्या वेळी हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले. ते पूर्वनियोजित होते. आताही भोंग्यांच्या सूत्रावरून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर त्याचा त्रास हिंदूंनाच होण्याची चिन्हे आहेत. महत्त्वाचे म्हणजे पाकसारखे शत्रूराष्ट्र भारतातील या हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शत्रूराष्ट्राचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. भोंग्यांच्या संदर्भातील सूत्र ही चूक धर्मांधांची असतांना त्यांना ‘पीडित’ म्हणून आणि हिंदूंना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवण्याचे षड्यंत्र भारतातील काही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंडळी रचतांना दिसत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात धर्मांधांकडून हिंदूंवर आणखी आक्रमणे झाल्यास आणि त्याचे खापर हिंदूंवरच फुटल्यास आश्चर्य वाटणार नाही. हे थांबवण्यासाठी हिंदूंनी परिणामकारक संघटन करणे आवश्यक आहे. त्याद्वारे मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारी यंत्रणांवर हिंदूंनी दबाव आणला पाहिजे. असे केले, तरच समाजात शांतता नांदेल !