श्रीलंकेनंतर आता नेपाळवर आर्थिक संकटाचे सावट !

  • परकीय चलनाच्या गंगाजळीत घसरण !

  • अनेक वस्तू महागल्या !

काठमांडू (नेपाळ) – श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात असून त्याच्यावरील गेल्या ७० वर्षांतील हे सर्वांत मोठे संकट असल्याचे म्हटले जात आहे. अशातच भारताचा दुसरा शेजारी देश असलेल्या नेपाळवरही असे संकट कोसळू शकते, अशी चिन्हे आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या आरंभीपासूनच तेथील स्थिती बिकट होती, पण आता तेथील सरकार घेत असलेल्या निर्णयांतून हे प्रकर्षाने लक्षात येऊ लागले आहे. जुलै २०२१ पासूनचे अहवाल पाहिल्यास नेपाळच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत सातत्याने घसरण होत आहे. नेपाळकडे केवळ पुढील ६ मासांसाठीच वस्तू आयात करण्यासाठीचे पैसे शिल्लक आहेत. त्यामुळे त्याने अनेक विदेशी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

नेपाळमधील महागाई !

पेट्रोलपंपावर शेकडोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी होत आहे. सायकल, मोटर उपकरण, तांदूळ, कापड, सोने, चांदी, सिमेंट, खेळणी, लाकूड, कोळसा या महत्त्वपूर्ण उत्पादनांच्या आयातीवर बंदी लादण्यात आली आहे. मिरची, मासे, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी, मांसाहारी पदार्थ, वैद्यकीय उपकरणे यांची आयातही रोखण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व वस्तूंची किंमत वाढत आहे.

‘नेपाल फ्रूट होलसेलर्स एसोसिएशन’नुसार फळांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

एक डझन केळी – २०० रुपये
द्राक्षे (प्रतिकिलो) – १४५ रुपये
लिंबू (प्रतिकिलो) – ४५० रुपये

अनावश्यक कर्ज देण्यावर बंदी !

नेपाळी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत की, कुणालाही अनावश्यक कर्ज देऊ नये. परकीय चलनाच्या गंगाजळीचा योग्य पद्धतीनेच उपयोग व्हायला हवा. चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

पर्यटन व्यवसाय आणि चिनी कर्ज यांवर अवलंबून असल्याचे तोटे !

पर्यटन व्यवसाय हे नेपाळच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे, परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे पर्यटनावर पुष्कळ प्रभाव पडला असून नेपाळला प्रचंड हानी सोसावी लागली. एका अहवालानुसार श्रीलंकेवर जिथे ५१ बिलियन डॉलरचे (३ लाख ८८ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) कर्ज आहे, तिथे नेपाळवर २० बिलियन डॉलरचे (१ लाख ५२ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) कर्ज आहे. चीनने त्याच्या कर्जाच्या जाळ्यात श्रीलंकेला कसे फसवले, हे श्रीलंकेलाही कळाले नाही. तसेच नेपाळही बर्‍याच प्रमाणात चीनच्या प्रभावाखाली आहे. अनेक नेपाळी निर्णयांवर चीनचा प्रभाव पहायला मिळतो.