युक्रेन सीमेवरील काही सैन्य तुकड्या माघारी जात आहेत ! – रशियाची घोषणा

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यात कधीही युद्ध होण्याच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर ‘युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सैन्यापैकी काही सैन्य तुकड्या त्यांच्या मूळ ठिकाणी म्हणजे माघारी जात आहेत’, अशी घोषणा रशियाने केली आहे; मात्र नेमक्या किती तुकड्या माघारी येत आहेत ? युक्रेनच्या सीमेवर नेमके किती सैनिक आहेत ? या तुकड्या परतल्याने सैन्यसंख्या किती अल्प होणार ? याची माहिती देण्यात आलेली नाही.

१. रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील एका प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण आणि पश्‍चिमेला तैनात असलेल्या सैन्य तुकड्यांनी त्यांचा युद्धाभ्यास पूर्ण केला आहे. त्यामुळे काही तुकड्या आता माघारी परतत आहेत. या तुकड्यांनी त्यांची सर्व सामग्री युद्धवाहनांमध्ये भरली आहे, तसेच त्या आता माघारी येण्यास प्रारंभ झाला आहे.

२. ब्रिटनने म्हटले आहे की, युक्रेनवर आक्रमण करण्याचा रशियाचा कोणताही विचार नाही, असा दावा करण्यात आला आहे. आता रशियाने त्यांच्या काही सैन्य तुकड्या माघारी बोलावल्या आहेत. त्यामुळे तणाव नक्कीच न्यून होईल; मात्र रशियाने युक्रेनच्या सीमेवरील सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याची आवश्यकता आहे.

३. युक्रेनने यावर म्हटले आहे की, रशियाने त्यांच्या काही सैन्य तुकड्या माघारी घेण्याची घोषणा केली आहे; मात्र सीमाभागातील सैन्य जेव्हा ते मागे घेतील, त्याचवेळी तणाव न्यून करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवता येईल.