१६ फेब्रुवारीला रशिया करू शकते युक्रेनवर आक्रमण !

  • रशिया-युक्रेन सीमासंघर्ष

  • पाश्‍चात्त्य राष्ट्रांनी व्यक्त केला अंदाज

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्या सीमेवर रशियाचे १ लाख सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असतांना रशियाने त्याचे काही सैनिक माघारी बोलावले असल्याचे त्याने स्पष्ट केले. असे असले, तरी पाश्‍चात्त्य राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात विविध स्तरांवर मोर्चे उघडले आहेत. युनायटेड किंगडमच्या विदेश सचिव लिज ट्रस यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले की, रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकी अधिकार्‍यांनी रशियाचे युक्रेनवर १६ फेब्रुवारीला आक्रमण होण्याच्या शक्यतेवरही ट्रस यांनी होकार दर्शवला आहे. दुसरीकडे रशियाचे विदेशमंत्री सर्जी लॅवरॉव यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हवाल्याने सूतोवाच केले की, अजूनही संवादाचे अनेक पर्याय खुले आहेत.

१. ट्रस यांनी स्पष्ट केले की, युक्रेन जरी ‘नाटो’चा (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चा) भाग झाला, तरी त्याच्या सार्वभौमत्वावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. तिथे रशियाने युक्रेनच्या या आगामी संभाव्य निर्णयाला कठोर विरोध दर्शवला आहे. युक्रेन जर ‘नाटो’चा सदस्य देश बनला, तर पाश्‍चात्त्य महाशक्तींना युक्रेनला सैनिकी साहाय्य करण्यास अडचण नसेल.

२. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भेटणार असून, ‘जर रशियाने आक्रमण केलेच, तर त्याच्यावर कठोर प्रतिबंध लादण्यात येतील’, अशी प्रत्यक्ष चेतावणी देणार असल्याचे समजते. या उभय देशांना लाभदायी असलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम ३’ ही गॅसवायूची पाईपलाईन स्कोल्ज बंद होऊ देणार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.

३. याआधी स्कोल्ज हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वॉलॉदीमिर झेलेन्स्की यांना भेटले. त्यांनी युक्रेनला आश्‍वस्त केले की, रशियाने आक्रमण केलेच, तर रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल.