संभाजीनगर, ३० डिसेंबर (वार्ता.) – जगातील हिंदूंचा निर्वंश होऊ नये आणि देशातील हिंदू समाज गुलाम होऊ नये यासाठी कालीपूत्र कालिचरण महाराज प्रचार अन् प्रसार करत आहेत. त्यांचे कार्य बंद पाडण्यासाठी, तसेच त्यांना अपकीर्त करण्यासाठी सुनियोजित प्रयत्न चालू आहेत. त्रिपुरामध्ये इस्लामचा अपमान झाला; म्हणून अमरावती, नांदेड, मालेगाव येथे दंगली घडवण्यात आल्या. याविषयी आमदार, मंत्री का बोलत नाहीत ? कालिपूत्र कालिचरणजी महाराज यांचा नेते मंडळी जाणीवपूर्वक अपमान करत आहेत. महाराजांच्या वक्तव्याच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मगुरूंचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, अशी चेतावणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
छत्तीसगड राज्यातील धर्मसंसदेचा व्हिडिओ प्रसारित करून कालिपूत्र कालिचरणजी महाराज यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभेत काही आमदार आणि मंत्री एकेरी भाषा वापरून टीका करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गांधींचा अपमान झाला; म्हणून सगळीकडे चर्चा चालू आहे; मात्र हिंदूंचे देव, संत, व्रत, ग्रंथ, हिंदु धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान प्रतिदिन करण्यात येतो. त्या वेळी सर्व आमदार आणि मंत्री एक शब्दही काढत नाहीत. कोरोनाच्या संसर्ग काळात अल्प कालावधीचे अधिवेशन असतांना अनेक विषय महत्त्वाचे असूनही हेतूपुरस्सर अन्य राज्यांतील प्रकरण काढून हिंदु साधूंचा अपमान करण्याची तत्परता दाखवली जात आहे.