मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.१२.२०२१) या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त…
१. ‘गुरुकार्यातील वेळ वाचावा’, यासाठी प्रयत्नरत असणे
‘आम्ही करणार असलेला प्रवास ६-७ किंवा त्यांहूनही अधिक घंट्यांचा असेल, तर वेळ वाचावा; म्हणून श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू जेवणासाठी गाडी न थांबवता चालू गाडीत जेवतात. खरेतर त्यांना झाडाखाली बसून जेवायला आवडते; पण गुरुकार्यातील वेळ वाचावा; म्हणून त्या सतत प्रयत्नरत असतात.
२. ‘स्वतःमुळे इतरांचा वेळ वाया जाऊ नये’, याची काळजी घेणे
कधी सकाळी थकव्यामुळे श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना उठायला विलंब झाला असेल आणि आम्हा सर्वांचा अल्पाहार झाला असेल अन् निघण्याची वेळ झाली असेल, तर त्या आम्हाला सांगतात, ‘‘माझा अल्पाहार समवेत घ्या. मी गाडीत बसून अल्पाहार करीन.’’ या वेळी ‘माझ्यामुळे बाकीच्या ४ साधकांचा वेळ वाया जाऊ नये’, असा त्यांचा विचार असतो.
३. विश्रामालयातही (हॉटेलमध्येही) आश्रमाप्रमाणे रहाणे आणि साधकांनाही तसे शिकवणे
३ अ. विश्रामालयात रहायला जाण्याआधी त्या विश्रामालयाची स्पंदने पाहून ‘आत जायचे कि नाही ?’, ते सांगणे : सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जावे लागते. काही ठिकाणी रहाण्यासाठी साधकांचे घर नसते. तेव्हा आम्हाला विश्रामालयात (हॉटेलमध्ये) मुक्काम करावा लागतो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयात रहायला जाण्याआधी त्या विश्रामालयाची स्पंदने पाहून ‘आत जायचे कि नाही ?’, ते सांगतात.
३ आ. विश्रामालयात काम करणार्यांशीही प्रेमाने बोलणे आणि त्यांना साधना सांगणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयात रहात असतांना तेथे कामाला असणार्या लोकांशीही पुष्कळ प्रेमाने बोलतात आणि ‘तुमचे जेवण, अल्पाहार झाला का ?’, अशी त्यांची विचारपूस करतात. ‘तुम्ही खोली किती छान आवरून ठेवता !’, असे म्हणून त्या त्यांचे कौतुकही करतात. त्या त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अडचणी समजून घेऊन त्यांना साधना सांगतात. ‘सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहून साधना करावी’, असे त्यांना वाटते.
३ इ. आश्रमाप्रमाणेच विश्रामालयातही ‘वीज, पाणी, मनुष्यबळ इत्यादींचा अनावश्यक वापर होऊ नये’, याची काळजी घेणे : श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू विश्रामालयातील अनावश्यक चालू असलेले दिवे बंद करतात. त्या म्हणतात, ‘‘राष्ट्राची संपत्ती वाया जाते.’’ ‘इतका बारकाईने विचार कसा करायचा ?’, ते त्या मला शिकवतात. त्या म्हणतात, ‘‘आपण साधना करत आहोत, तर आपल्याला आश्रम आणि विश्रामालय एकसमान वाटायला हवेत. जेव्हा असे वाटते आणि तशी कृती होते, त्या वेळी आपली आपोआप आध्यात्मिक प्रगती होते.’’
३ ई. विश्रामालय सोडण्याच्या वेळी साधकांना खोली व्यवस्थित आवरून ठेवायला सांगणे आणि वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करणे : विश्रामालय सोडण्याच्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आम्हाला सांगतात, ‘‘आपण विश्रामालयात आल्यावर ही खोली जशी नीटनेटकी होती, तशी ती आवरून ठेवून जायला पाहिजे. खोलीतील ‘रिमोट’ आणि इतर साहित्य ‘कर्मचार्यांना दिसेल’, असे ठेवायला पाहिजे, म्हणजे साहित्य शोधण्यात त्यांचा वेळ जाणार नाही.’’ (‘रिमोट’ म्हणजे विद्युत् उपकरणे काही अंतरावरून चालू आणि बंद करण्याचे साधन) श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू स्वतः तशी कृती करतात. त्या खोलीतून निघतांना वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
३ उ. केवळ संपर्काने विश्रामालयात काम करणार्या लोकांमध्ये पालट घडवून आणणार्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ! : कुल्लु (हिमाचल प्रदेश) येथे आम्ही एका विश्रामालयात निवासाला होतो. तेव्हा तेथे काम करणार्या लोकांशी आमची पुष्कळ जवळीक झाली होती. आम्ही २ दिवसांसाठी दुसरीकडे गेलो होतो. आम्ही तेथून परत विश्रामालयात आल्यावर आम्हाला पाहून तेथील सर्व कर्मचारी आले आणि आम्हाला नमस्कार करू लागले. ते दृश्य पाहून आमची पुष्कळ भावजागृती झाली. आम्ही गोव्याहून तिथे गेलो होतो. तसे पाहिले, तर त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही; पण श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या केवळ संपर्काने त्यांच्यात एवढा पालट झाला. देवाने मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या समवेत सेवा करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ‘देव माझ्यातही तसा पालट घडवणार’, अशी माझी श्रद्धा दृढ झाली.
४. साधकांच्या घरी गेल्यावर स्वतःचे वेगळेपण न जपता सहजतेने वागून गुरुदेवांच्या शिकवणीचे आज्ञापालन करणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ घरी येणार’, असे कळवल्यावर साधकांना पुष्कळ आनंद होतो. तो मी शब्दांत सांगू शकत नाही. साधकांच्या घरी गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू त्या घरातील लहान-मोठ्या, अशा सर्वांशी पुष्कळ सहजपणे आणि प्रेमाने बोलतात अन् वागतात. त्या त्यांचे वेगळेपण कुठेच दाखवत नाहीत. ‘बाहेरचे संत त्यांचे वेगळेपण किती दाखवतात !’, हे आपण पहातो. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू साधकांना सांगतात, ‘‘तुम्ही जो स्वयंपाक केला असेल, तोच मी जेवणार आहे. माझ्यासाठी वेगळे काही करायला नको.’’ साधकांच्या घरी जे बनवले असेल, तेच त्या जेवतात. त्या म्हणतात, ‘‘पुढे आपत्काळात जे मिळेल, ते खावे लागेल. त्यामुळे आतापासून सिद्धता करावी लागेल.’’
यावरून ‘आपले गुरुदेव किती महान आहेत !’, याची कल्पना येते. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू गुरुदेवांच्या शिकवणीचे आज्ञापालन करतात’, हेही मला शिकायला मिळाले.
५. प्रार्थना
‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कृपेमुळे मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली अनमोल सूत्रे गुरुचरणी अर्पण करण्याची संधी मिळाली. या लिखाणामुळे पुढील पिढीला सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्यातील ईश्वरी गुण शिकायला मिळतील. प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या समवेत दौर्यावर येण्याची संधी मिळाली. तुम्हीच माझ्याकडून ही सेवा करवून घेत आहात. ‘गुरुदेवा, ‘माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी गुरुसेवा तुम्हीच करवून घ्या’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– गुरुचरणसेवक, श्री. वाल्मीक भुकन, चेन्नई (९.९.२०२१)
‘संतांचे बोलणे म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ असते’, याची साधकाला आलेली प्रचीती !‘९.५.२०२१ या दिवसापासून गुरुदेवांच्या कृपेने मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दौर्यावर जाण्याची संधी मिळाली. ‘साक्षात् श्रीमहालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंची सेवा करायला मिळणार’, याचा मला पुष्कळ आनंद झाला होता. साधारण ३ वर्षांपूर्वी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू मला म्हणाल्या होत्या, ‘‘एकदा मी तुलाही दौर्यावर घेऊन जाईन.’’ यावरून ‘संतांचे बोलणे म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ असते’, याची मला प्रचीती आली, तसेच ‘ते जे बोलतात, ते सत्य होते; पण आपण त्यावर श्रद्धा ठेवायला कमी पडतो’, हे माझ्या लक्षात आले.’ – श्री. वाल्मीक भुकन, चेन्नई (९.९.२०२१) |