कोल्हापूर, २० जुलै (वार्ता.) – शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. श्री विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून सरकारने वारकर्यांच्या श्रद्धांचा मान राखला आहे; मात्र सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्री विठ्ठलाचे चित्र त्वरित काढून श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना रोखावी, हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अनंत गुरव यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, अखिल भारतीय हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. नंदू घोरपडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
लोकसंख्येचे नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी कायदा करणे अन् देशभरात समान नागरी कायदा लागू करा !
पुष्कळ वर्षांपासून देशातील विविध घटकांकडून सातत्याने समान नागरी कायद्याची मागणी करण्यात येत आहे. याच विषयाला हात घालत ‘आता देशाला खर्या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे’, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले. तसेच याविषयी केंद्रसरकारने प्रयत्न करावेत’, असे म्हटले आहे. आधुनिक काळातील युवा पिढीला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. भारतीय घटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी संहितेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ती आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तरी लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन राखणारा अन् सर्व धयांना लागू असणारा कायदा तात्काळ करण्यात यावा, अशा मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदनही या वेळी देण्यात आले.