गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताकडून सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात ! – ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेचा दावा

भारताच्या व्यूहरचनेमध्ये पूर्वीच्या तुलनेत मोठा पालट !

नवी देहली – लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की,

१. भारताने गेल्या ४ मासांमध्ये चिनी सीमेला लागून असलेल्या विविध भागांत सैन्याच्या तुकड्या आणि लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

२. सध्याच्या घडीला संपूर्ण चीन सीमेवर २ लाख भारतीय सैनिक तैनात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ४० टक्क्यांनी अधिक आहे. यावरून भारताची पालटलेली व्यूहरचना लक्षात येते.

३. सीमेचे संरक्षण करण्यासाठी आणि अतिक्रमण रोखण्यासाठी भारतीय सैनिक सीमावर्ती भागात तैनात असायचे; मात्र आता प्रतीआक्रमण करण्यासाठी भारताने या भागात सैनिक तैनात केले आहेत.

४. आता भारत चीनविरोधात आक्रमक बचावाच्या व्यूहरचनेचा वापर करण्यास जराही मागेपुढे पहाणार नाही, अशी माहिती एका सूत्राने दिली. त्याचाच एक भाग म्हणून सैनिकांना आणि हलक्या हॉवित्झर तोफांना एका खोर्‍यातून दुसर्‍या खोर्‍यात नेण्यासाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.

५. दुसरीकडे चीनकडून सीमावर्ती भागात लढाऊ विमानांच्या धावपट्ट्या सिद्ध करण्याचे आणि बॉम्बप्रूफ बंकर सिद्ध करण्याचे काम चालू आहे.