पाकमध्ये आतंकवाद्यांना आश्रय आणि निवृत्तीवेतन दिले जाते !

भारताची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकवर टीका !

भारताने केवळ अशा प्रकारची टीका करण्याऐवजी पाकला कायमचा धडा शिकवणे आवश्यक आहे ! अशा टीकेचा विशेष काही परिणाम होतांना कधी दिसत नाही !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या कायमस्वरूपी अभियानाचे प्रथम सचिव पवन कुमार बाधे

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तान त्याच्या राष्ट्रीय धोरणांच्या नावाखाली धोकादायक आणि आतंकवादी घोषित म्हणून करण्यात आलेल्यांना निवृत्तीवेतन देतो. तसेच तो या लोकांना आश्रयही देतो. त्यामुळे आता पाकला आतंकवाद्यांना साहाय्य करणे आणि आतंकवाद वाढीसाठी उत्तरदायी ठरवण्याची वेळ आली आहे, अशी कठोर टीका भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमधील एका सत्रात पाकवर केली. काश्मीरविषयीच्या एका अहवालावर भारताने त्याची बाजू मांडली.

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या कायमस्वरूपी अभियानाचे प्रथम सचिव पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आपण पाकमधून धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि बलपूर्वक केलेले धर्मांतर, तसेच विवाहाच्या बातम्या पाहिल्या आहेत. पाकिस्तानमध्ये प्रतीवर्षी धार्मिक अल्पसंख्यांक समुदायातील १ सहस्रांहून अधिक मुलींचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते. हिंदु, ख्रिस्ती, अहमदिया, शीख, यांसह अन्य अल्पसंख्यांकांचा कायदेशीर न्यायव्यवस्थेऐवजी समांतर न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून छळ करण्यात येणे, ही गोष्ट पाकिस्तानमध्ये सामान्य समजली जाते. पाकमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या पवित्र आणि प्राचीन स्थळांवर आक्रमणे करून त्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.