कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बांगलादेशातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना !

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या जेशोरेश्‍वरी काली मंदिरात प्रार्थना करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या २ दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर आहेत. भेटीच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी ईश्‍वरीपूर गावातील ५१ शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या प्राचीन जेशोरेश्‍वरी काली मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली. मंदिरात दर्शन घेतल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेशोरेश्‍वरी काली मंदिरात पूजा करून मी धन्य झालो. मी प्रार्थना केली, ‘कालीमाते, जगाला कोरोनाच्या संकटापासून मुक्त कर.’ मला संधी मिळाली, तर मी या ५१ शक्तीपिठांमध्ये जाऊन डोके टेकवेन. मी ऐकले आहे की, नवरात्रात येथे कालीमातेची यात्रा भरते, तेव्हा सीमावर्ती भागातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. येथे कम्युनिटी हॉल आवश्यक आहे. हे भक्तांसाठी आणि आपत्तीच्या वेळी लोकांचे आश्रयस्थान बनले पाहिजे. भारत सरकार हा कम्युनिटी हॉल उभारील.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवीला मुकूट, साडी आणि इतर पूजेचे साहित्यही अर्पण केले. तसेच मंदिराला प्रदक्षिणा घातली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशातील मतुआ समुदायाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांचे ठाकूरबाडी म्हणजेच ओरकांडी मंदिरातही जाऊन दर्शन घेतले.