२२ मार्च रोजी आयोजित केलेल्या एका ऑनलाईन सत्संगात वाराणसी सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. राजाराम पाध्ये यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले. ही आनंदवार्ता ऐकून साधकांची भावजागृती झाली. या वेळी त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये साधकांनी व्यक्त केली. या सत्संगासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवारत असणार्या त्यांच्या पत्नी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. रश्मी पाध्ये, तसेच भू (राजापूर) येथे असलेले सुपुत्र श्री. राकेश, श्री. ओंकार , स्नुषा सौ. पूर्वा आणि सौ. स्वराली हे ऑनलाईन माध्यमातून जोडले होते.
या प्रसंगी परिवारातील सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि श्री. राजाराम पाध्ये यांच्या साधना प्रवासातील काही प्रसंग अन् त्यांच्यातील साधनेतून झालेले पालट भावपूर्ण व्यक्त केले.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर श्री. राजाराम पाध्ये यांचा भाव जागृत झाला. ते म्हणाले, ‘‘माझी प्रगती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने झाली.’’ या प्रसंगी पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांना भेटवस्तू दिली.
अनासक्त आणि परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ असलेले श्री. राजाराम पाध्ये !१. साधी रहाणी‘श्री. राजाराम पाध्येकाका मूळचे राजापूर (रत्नागिरी) येथील आहेत. त्यांना वाराणसी सेवाकेंद्रात सेवेला येऊन साधारण २ वर्षे होत आली. त्यांची रहाणी अत्यंत साधी आणि निरासक्त आहे. २. त्यांचा तोंडवळा सतत आनंदी आणि हसतमुख असतो.३. सर्वांना जवळीक वाटणे‘सर्वांकडे समभावाने पहाणे, सर्वांशी नम्रतेने आणि प्रेमाने बोलणे, स्वतःकडे न्यूनपणा घेणे’, असे त्यांचे आचरण असल्याने ते सर्वांना आपले वाटतात. सर्वांना त्यांच्याविषयी जवळीक वाटते. ४. सहजतात्यांच्यातील ‘सहजता’ या गुणामुळे ‘ते उत्तर भारतात सेवेसाठी नवीन आले आहेत’, असे कधीच वाटले नाही. ते सहजतेने वाराणसी येथील सेवाकेंद्रातील जीवन आणि सेवा यांच्याशी एकरूप झाले. ५. बालकभावते बोलतांना त्यांचा एक वेगळा बालकभाव जाणवतो. त्यांच्याशी बोलतांना मला कधी कधी ‘मी लहान बाळाशी बोलत आहे’, असे वाटायचे. ६. अनासक्तवाराणसी येथे धर्मसंवादाचे ध्वनीचित्रीकरण चालू झाले. तेव्हा त्यांनी आवश्यकता पाहून त्यांचा नवीन भ्रमणभाष या सेवेसाठी दिला. त्यांना भ्रमणभाषविषयी आसक्तीही नव्हती. त्यामुळे बरेच दिवस ध्वनीचित्रीकरण करणारे साधक मोकळेपणाने त्यांचा भ्रमणभाष मागून घ्यायचे आणि ध्वनीचित्रीकरण झाल्यावर त्यांना परत करायचे. त्यांच्याकडे पाहूनच ‘ते मायेपासून अलिप्त आहेत आणि सेवेच्या माध्यमातून भगवंताच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवते. ७. परिपूर्ण आणि तळमळीने सेवा करणेते वाराणसीला रहायला आले. तेव्हा प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या सात्त्विक उत्पादनांच्या विक्रीसंबंधी सेवा चालू झाली होती. या सेवेत काही कठीण प्रक्रिया होत्या आणि काही अडचणीही निर्माण झाल्या होत्या. तेव्हा काका नवीनच आल्याने त्यांना या सेवेचा मागचा तपशील ठाऊक नव्हता, तरीही त्यांनी तळमळीने आणि अखंड सेवा करून या सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. हे करतांना त्यांना मागच्या तपशिलांच्या खोलात जाऊन प्रयत्न करावे लागले. ‘मी इथे नवीन आलो आहे. मला काही ठाऊक नाही. मला जमणार नाही’, अशा स्वरूपाचे विचार त्यांनी एकदाही व्यक्त केले नाहीत. त्यांनी श्रद्धेने या सेवेत पुढाकार घेऊन प्रयत्न केले. त्यातील त्रुटी शोधून काढल्या आणि सेवा पूर्ण केली. ८. ‘अखंड सेवारत रहाणे’ हा काकांचा एक दैवी गुणच आहे.– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी (१३.१.२०२१) |
श्री. राजाराम पाध्ये यांची सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. आनंदी
‘श्री. राजाराम पाध्येकाका सतत अनुसंधानात असतात’, असे जाणवते. त्यामुळे ते सतत आनंदी आणि हसतमुख असतात.’ – श्री. राजन केशरी, कु. कुहू पाण्डेय, श्रीमती भाग्यश्री आणेकर आणि सर्व साधक, वाराणसी सेवाकेंद्र
२. उत्साही
अ. ‘काका सतत उत्साही असतात.’ – सौ. श्रेया प्रभु, वाराणसी
आ. ‘पुष्कळ वेळा रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करूनही ते दुसर्या दिवशीही उत्साही असतात.’ – श्री. संदीप ढगे, वाराणसी
३. नम्र
‘ते कधीही कुठल्याही साधकाशी प्रतिक्रियात्मक किंवा उद्धटपणे बोलल्याचे आठवत नाही. कुणाला काही विचारायचे असल्यास ते विनंती स्वरूपातच विचारतात. साधकांच्या काही चुका लक्षात आल्यास ते त्या चुकाही विनम्रतेने सांगतात.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. कुहू पाण्डेय, श्री. राजन केशरी आणि श्रीमती भाग्यश्री आणेकर
४. प्रेमभाव
‘वाराणसी सेवाकेंद्राचेे नूतनीकरणाचे काम चालू असल्याने साधकांची निवासव्यवस्था २ वेगळ्या इमारतींमध्ये केली आहे. जेथे काकांची निवासव्यवस्था आहे, त्या ठिकाणी त्यांच्या समवेत माझ्या यजमानांचीही निवासव्यवस्था आहे. माझ्या यजमानांची प्रकृती बरी नसल्याने प्रतिदिन त्यांच्यासाठी अल्पाहार आणि जेवण यांचा डबा द्यावा लागतो. काका प्रतिदिन स्वतः अल्पाहार किंवा जेवण घेण्याआधी माझ्या यजमानांना ‘अल्पाहार आणि जेवण वेळेत मिळावे’, यासाठी आधी त्यांना डबा देऊन येतात आणि मग स्वतः अल्पाहार किंवा जेवण करतात.’ – सौ. प्राची मसुरकर
५. इतरांना समजून घेणे
‘कधी कुठल्या प्रसंगात ते दुखावले गेले, तरी ते स्थिर रहाण्याचा प्रयत्न करतात. नंतर ते त्या साधकांशी बोलून घेऊन त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. कुहू पाण्डेय, श्री. राजन केशरी आणि श्रीमती भाग्यश्री आणेकर
६. सर्वांशी जवळीक साधणे
‘काकांची आश्रमातील पुष्कळ साधकांशी जवळीक आहे. त्यांचा स्वभाव सरळ असल्याने अगदी लहान वयातील साधकांपासून ते वयस्कर साधकांपर्यंत सर्वांशीच त्यांचे जुळते.’ – सौ. श्रेया प्रभु आणि श्री. राजन केशरी
७. सेवाभाव
७ अ. सेवाकेंद्रातील कुठलीही सेवा आनंदाने करणे : ‘काकांचे वय ६३ वर्षे आहे; पण या वयातही ते प्रत्येक सेवा तळमळीने करतात. सेवाकेंद्रातील सेवांचे नियोजन करतांना ते स्वतःहून सांगतात, ‘‘मला केर काढणे, लादी पुसणे, भांडी घासणे’, अशा कुठल्याही सेवा दिल्या, तरी चालतील.’’ कधी अकस्मात् कुठली सेवा आली किंवा त्यांना सेवाकेंद्रातील कुठलीही सेवा सांगितली, तरी ती सेवा ते अगदी आनंदाने करतात. त्यांना सेवा सांगतांना आम्हाला कुठलाही संकोच वाटत नाही. आम्हाला ते आपले हक्काचे साधक वाटतात.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. कुहू पाण्डेय, श्री. राजन केशरी, श्री. संदीप ढगे आणि श्रीमती भाग्यश्री आणेकर
७ आ. पुढाकार घेऊन सेवा करणे
१. ‘सेवेसाठी कधी कुणी नियोजित साधक उपलब्ध नसल्यास काका स्वतः पुढाकार घेऊन ती सेवा करतात. कुठलीही सेवा कुठल्याही वेळी दायित्व घेऊन करायची त्यांची सिद्धता असते.’ – सौ. श्रेया प्रभु
२. ‘वाराणसी सेवाकेंद्राचे नूतनीकरण झाल्यानंतर आम्ही नवीन जागी स्थलांतरित झालो होतो. तेथील सदनिकेमध्ये प्रतिदिन साधकांची ये-जा चालू होती. त्यामुळे सतत ‘दार उघडणे आणि लावणे’, असे करावे लागत होते. त्या वेळी ‘अन्य साधकांना त्यांच्या खोलीतून येऊन दार उघड-बंद करावे लागू नये’, यासाठी काकांनी स्वतःच दाराच्या बाजूला थांबून ती सेवा चालू केली आणि ते दिवसभर तिथेच थांबून सेवा करू लागले.’ – श्री. विश्वनाथ कुलकर्णी
७ इ. परिपूर्ण सेवा करणे : ‘त्यांना कधीही कुठलीही सेवा सांगितली, तरी त्यांच्या मनात विकल्प येत नाही. सेवा करतांना अनेकदा त्यांना वेळेचेही भान रहात नाही. कुठलीही सेवा असो, ते ती सेवा तळमळीने आणि परिपूर्ण करतात.’ – सौ. श्रेया प्रभु
७ ई. ‘काका प्रत्येक सेवेतील बारकावे विचारून सेवा करतात.
७ ए. ते प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि कृतज्ञताभावाने करतात.
८. सेवा चांगली होण्यासाठी सांगितलेले प्रयत्न करून त्याचा आढावा देणे
त्यांना ‘सेवा समजून घेऊन करणे, परिपूर्ण सेवा करण्यासाठी देवाचे साहाय्य घेणे, प्रार्थना आणि गुरुस्मरण वाढवणे’, असे प्रयत्न करायला सांगितले होते. काका तसे प्रयत्न करून त्याचा आढावाही देतात.’ – सौ. श्रेया प्रभु आणि कु. सुमन सिंह
९. शिकण्याची वृत्ती
अ. ‘काका वयाने मोठे असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ‘सेवाकेंद्रातील वेगवेगळ्या प्रकृतीचे साधक आणि घडत असलेले प्रसंग यांतून त्यांना काय शिकायला मिळाले ?’, हे ते नेहमी सांगतात. कुठलाही प्रतिकूल प्रसंग घडला, तरी काका स्थिर, शांत आणि शिकण्याच्या स्थितीत असतात.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. सुमन सिंह आणि श्री. राजन केशरी
आ. ‘एकदा जेवल्यानंतर काकांना त्यांचे ताट धुवायचे होते; पण त्यांच्या आधी एक साधिका भोजनकक्षातील काही भांडी तिथे धूत होती. त्या साधिकेची भांडी धुऊन झाल्यावर तिने त्यांना ताट धुवायला सांगितले. तेव्हा ते तिला म्हणाले, ‘‘मला ताट धुण्यासाठी वाट पहाण्यात आनंद मिळाला; कारण मला ‘तू भांडी कशी स्वच्छ धुतेस ?’, हे शिकायला मिळाले.’’ यावरून मला त्यांचे ‘शिकण्याची स्थिती, सकारात्मक रहाणे, संयम ठेवणे, प्रसंगात साधनेचा दृष्टीकोन ठेवणे’ इत्यादी गुण शिकायला मिळाले.’ – कु. कुहू पाण्डेय
१०. स्वीकारण्याची वृत्ती
अ. ‘काकांनी पूर्वी महाराष्ट्रात सेवा केली आहे. त्या वेळी त्यांना त्यांच्या सेवेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते; परंतु ते वाराणसीला आल्यापासून त्यांच्या सेवेचे पूर्ण नियोजन सेवाकेंद्रातच आहे. दळणवळण बंदीच्या काळात तर त्यांंची सेवा सेवाकेंद्रापुरती सीमित झाली. आरंभी त्यांना ते अवघड वाटत होते; पण त्यांनी त्यांच्या मनातील विचार मोकळेपणाने सांगून ‘परिस्थिती स्वीकारण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे ?’, हे विचारले.’ – सौ. श्रेया प्रभु आणि श्री. विश्वनाथ कुलकर्णी
आ. ‘काकांनी कधी कुठली समस्या सांगितली किंवा कधी मनाच्या स्तरावरचा कुठला अडथळा सांगितला, तर त्याविषयी त्यांना जो दृष्टीकोन सांगितला जातो किंवा जी उपाययोजना सांगितली जाते, ती ते मनापासून ऐकून घेतात आणि स्वीकारून त्यानुसार सातत्याने प्रयत्न करतात.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. सुमन सिंह आणि श्रीमती भाग्यश्री आणेकर
११. अंतर्मुखता
‘काका अनेक प्रसंगांत स्वतःकडे न्यूनता घेतात. कधी कुठला प्रसंग घडला, तर ‘त्यात स्वतःचे काय चुकले ? स्वतः कुठे न्यून पडलो ?’, याकडे त्यांचे अधिक लक्ष असते. त्याची त्यांना पुष्कळ खंतही वाटते. ‘त्यांचा अहं पुष्कळ अल्प असून ते शिष्यभावात आहेत’, असे वाटते.’ – सौ. श्रेया प्रभु, कु. कुहू पाण्डेय आणि श्री. राजन केशरी
१२. कृतज्ञताभाव
‘काकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञता वाटते. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी सेवा करू शकतो. त्यांनीच माझ्या कुटुंबाचे दायित्व घेतले आहे’, असा त्यांचा भाव असतो.’ – सौ. श्रेया प्रभु (जानेवारी २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |