शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमा !

गोवा राज्य महिला आयोगाची सूचना

अशा उपाययोजनांसहित समाजाला साधना शिकवून नीतीमान बनवणेही आवश्यक आहे. त्यासाठी शाळांमधून साधना शिकवण्यास प्रारंभ करायला हवा !

पणजी – शाळा आणि महाविद्यालये येथे लैंगिक छळवणुकीविषयी तक्रारी हाताळण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन गोवा राज्य महिला आयोगाने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांना केली आहे. अंतर्गत तक्रार समितीवरील सदस्यांची नावे आयोगाला पाठवावी, असे आयोगाने पुढे म्हटले आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे ७० शैक्षणिक संस्थांनी अंतर्गत तक्रार समिती नेमून त्यावरील सदस्यांची नावे आयोगाला कळवली आहेत.

गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे म्हणाल्या, ‘‘शाळांतील शिक्षिकांचे लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत आणि यामुळे शाळा आणि महाविद्यालये यांना अंतर्गत तक्रार समिती नेमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या समितीमध्ये निम्मे सदस्य महिला असणे आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी लैंगिक छळवणूक झाल्यास पीडित त्याविषयी समितीकडे तक्रार करू शकते आणि समिती नियमानुसार तक्रारीची सत्यता पडताळू शकते. याविषयी नंतर पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करता येते. या योजनेविषयी सर्वांना माहिती व्हावी, यासाठी शाळा आणि महाविद्यालये या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.’’