UP CM Yogi Adityanath : उत्तरप्रदेशात हिंदू सुरक्षित आहेत, तर मुसलमानही सुरक्षित आहेत ! – योगी आदित्यनाथ

प्रत्येकाला त्याच्याच ‘भाषे’त समजावले जाईल, असेही केले स्पष्ट !

योगी आदित्यनाथ आणि स्मिता प्रकाश

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच ए.एन्.आय. (एशियन न्यूज इंटरनॅशनल) या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या वेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमच्या राज्यात मुसलमान सुरक्षित आहेत का ? त्यावर योगी म्हणाले, ‘‘उत्तरप्रदेशात मुसलमान सर्वांत सुरक्षित आहेत. आमच्या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत, तर मुसलमानही सुरक्षित आहेत. ते पुढे असेही म्हणाले की, जी व्यक्ती जशी आणि ज्या भाषेत समजून घेईल, त्याला त्या भाषेत समजावले जाईल.’’

योगी आदित्यनाथ यांनी मांडलेली महत्त्वाची सूत्रे –

बांगलादेश, अफगाणिस्तान जे झाले, ते भारतात होण्यापूर्वी सतर्क होणे आवश्यक !

हिंदूंच्या सहिष्णुतेविषयी बोलतांना ते म्हणाले की, १०० हिंदु कुटुंबांच्या वस्तीत असलेले मुसलमान कुटुंब हे नेहमीच सुरक्षित असते. त्यांना त्यांचे धार्मिक विधी करण्याचे स्वातंत्र्य असते; मात्र १०० मुसलमान कुटुंबियांच्या वस्तीत रहाणारे ५० हिंदु कुटुंबे सुरक्षित असतात का ? तर नाही. बांगलादेश याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी पाकिस्तान याचे उदाहरण होते. अफगाणिस्तानात काय झाले होते ? जर कुणावर अन्याय होत आहे, तर आपल्यावर तो होण्याआधी आपण सतर्क होणे आवश्यक आहे.

वक्फ बोर्डाने कल्याणकारी कामे केली आहेत का ?

वक्फ बोर्ड आणि त्याने बळकावलेल्या भूमींवरून चालू असलेल्या वादावरही योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘वक्फच्या नावाखाली कधी कल्याणकारी कामे केली आहेत का ? तुम्ही त्यांचे एकही काम सांगू शकत नाही. वक्फ ज्या भूमीकडे बोट दाखवून म्हणेल की, ही आमची भूमी आहे ती त्यांना द्यायची ? आपण त्यांच्या गोष्टी मान्य करायच्या? गेल्या कित्येक वर्षांपासून तेच घडत आले आहे. हा कुठला आदेश आहे ? वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्याविषयी काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. ही आजची सर्वांत मोठी आवश्यकता आहे. सर्वांनी त्यावर विचार करणे आवश्यक आहे.

समाजवादी पक्षाची लोक औरंगजेब आणि बाबर यांची पूजा करतात !

‘औरंगजेब हा समाजवादी पक्षाचा आदर्श आहे’, असे सांगत योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘‘महाराणा प्रताप, महाराणा सांगा, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांच्याविषयी हे लोक (समाजवादी पक्षाचे नेते) आम्हाला शिकवणार का ? यांना इतिहासाची किती जाण आहे ? हे लोक औरंगजेब आणि बाबर यांची पूजा करतात. महंमद अली जिना यांना आदर्श मानतात.

मथुरा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अन्यथा तेथे वेगळे घडले असते !

आदित्यनाथ म्हणाले की मथुरेतील मशिदीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहोत. अन्यथा तिथे पुष्कळ काही घडले असते. आमचे सरकार कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येक गोष्ट करत आहे.

संपादकीय भूमिका

योगी आदित्यनाथ यांच्याकडून अन्य शासनकर्त्यांनी शिकले पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे, असेच देशातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी हिंदूंना वाटते; मात्र त्यापूर्वी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे साधना करणे आवश्यक आहे, तरच त्यांच्यात धर्माभिमान, धैर्य, शक्ती आणि निर्भिडता निर्माण होईल !