
नवी देहली – पंजाब नॅशनल बँक (पी.एन्.बी.) घोटाळ्यातील पसार झालेला मुख्य आरोपी असणारा हिरे व्यापारी मेहुल चोकसी युरोपमधील बेल्जियम देशामध्ये असल्याचे समोर आले आहे. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात चोकसीच्या देशात उपस्थितीची माहिती दिली. चोकसीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू करण्यासाठी भारताने बेल्जियमच्या अधिकार्यांशी संपर्क साधला आहे.
१. मेहुल चोकसी आणि आणखी एक पसार हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यावर ‘पी.एन्.बी.’च्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेत १३ सहस्र ८५० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
२. बेल्जियममध्ये आश्रय घेण्यापूर्वी आरोपी चोकसी दक्षिण अमेरिका खंडाजवळील अँटिग्वा-बार्बुडा येथे रहात होता. वर्ष २०१८ मध्ये भारत सोडण्यापूर्वी चोकसीने वर्ष २०१७ मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते.
३. वर्ष २०२१ मध्ये चोकसीला दक्षिण अमेरिका खंडाजवळील डोमिनिका देशामध्ये अटक करण्यात आली. त्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी ‘सीबीआय’चे एक पथक डोमिनिका येथे पोचले; परंतु त्यापूर्वीच त्याची पुन्हा अँटिग्वाला रवानगी करण्यात आली.
४. चोकसीने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेल्जियममध्ये आश्रय मिळवला आहे. त्याने कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्याचे निमित्त केले आहे.