न्यूयॉर्क विधानसभेकडून ‘५ फेब्रुवारी’ हा ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित

  • पाक साजरा करत असलेल्या ‘काश्मीर एकता दिवसा’च्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्क विधानसभेची भारतविरोधी कृती !

  • भारताकडून निषेध

  • भारताच्या अंतर्गत प्रश्‍नावर अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेच्या एका राज्यातील विधानसभेला कुणी दिला ? उद्या भारतातील २९ राज्यांतील विधानसभांमध्ये अमेरिकेतील गोर्‍यांकडून होणार्‍या वर्णद्वेषाच्या विरोधात एखादा दिवस साजरा करण्याचा निर्णय भारताने घेतला, तर ते अमेरिकेला चालणार आहे का ?
  • भारताने केवळ पोकळ निषेध नोंदवण्याऐवजी अमेरिकाला समजेल आणि ती माघार घेईल, अशा भाषेत तिला फटकारले पाहिजे !

न्यूयॉर्क (अमेरिका) – न्यूयॉर्क राज्यामधील विधानसभेमध्ये संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार ‘५ फेब्रुवारी’ हा दिवस ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित करण्यात येणार आहे. पाकिस्तानमध्ये ‘५ फेब्रुवारी’ हा दिवस ‘काश्मीर एकता दिवस’ म्हणून साजरा करतो. काश्मीरमधील नागरिकांच्या कथित हक्कांचे जतन व्हावे, यासाठी पाक हा दिवस साजरा करतो. न्यूयॉर्क विधानसभेमधील सदस्य नादर सायेघ आणि अन्य १२ सदस्य यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावाचा भारताने निषेध केला आहे.

वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासामधील प्रवक्त्यांनी यावर म्हटले की,

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याला कोणीही भारतापासून वेगळे करू शकत नाही. जम्मू-काश्मीरच्या संस्कृती आणि सामाजिक एकतेच्या संदर्भातील व्याख्या आणि संमत करण्यात आलेला ठराव हा चिंतेचा विषय आहे. भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर तसेच न्यूयॉर्कमधील सर्व भारतीय समुदायाच्या वतीने न्यूयॉर्कमधील विधानसभेच्या सर्व सदस्यांशी भारत चर्चा करणार आहे.