गुन्ह्यांमागील तोंडवळे उघड करणारी ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ !

‘सी.सी.टी.एन्.ए.’ आणि ‘नॅशनल इंटलिजन्स नेटवर्क’ या दोन्ही ‘नेटवर्क सिस्टिम’ आता जोडल्या जात आहेत. जगात तोंडवळ्यावरून गुन्हेगार ओळखण्याची ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’वर संशोधन करणारे भारत सरकार हे पहिलेच आहे. ही सिस्टिम कशी असेल ? तिचा वापर कसा करता येईल ? यामुळे देशाचा काय लाभ होईल ? या सर्व गोष्टींचा विचार आपण या लेखातून करणार आहोत.

प्रतीकात्मक छायाचित्र

१. पोलिसांना हवे असणार्‍या गुन्हेगारांना पकडण्यासाठी ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ उपयुक्त !

१ अ. व्यक्तीचा तोंडवळा पाहून तिची संपूर्ण माहिती मिळणार ! : ‘राष्ट्रीय गुन्हेगार नोंदणी विभाग’ गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी एका नव्या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेणार आहे. संपूर्ण देशभरात ‘ऑटोमेटेड फेशिअल रेडिएशन सिस्टिम (ए.एफ्.आर्.एस्.) नावाची प्रणाली लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच ‘आर्टिफिशिअल इंटलिजन्स’ या तंत्रज्ञानाचा हा नवीन आविष्कार आहे. ‘हाय डेन्सिटी’ छायाचित्रे घेणार्‍या सीसीटीव्ही छायाचित्रकांचे जाळे देशभरात वाढत आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान जगात उपयुक्त ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एखाद्या व्यक्तीचा तोंडवळा पाहून तिची संपूर्ण माहिती संगणकाद्वारे सुरक्षा यंत्रणांना मिळणार आहे. पासपोर्ट, आधारपत्र, वाहनचालक परवाना, तसेच पोलिसांकडील नोंदणीशी हे तंत्रज्ञान जोडले जाणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या गुन्हेगारी नियंत्रण प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यात उपलब्ध असणार आहे.

१ आ. बॅरिकेड्स लावून तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगारांना पकडले जाणे : या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आतंकवादी आणि गुन्हेगार यांची ओळख पटवणे सोपे जाईल. पोलिसांकडे आज अनेक गुन्हेगारांची माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध आहेत. अनेक गुन्हेगार जामिनावर सोडल्यानंतर ते कारागृहात परत येत नाहीत. त्यांना पकडणे महत्त्वाचे काम असते; परंतु अशा गुन्हेगारांची संख्या मोठी असल्याने अशांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात नाही. ज्या वेळी पोलीस रस्त्यांवर ‘बॅरिकेड्स’ लावून वाहने आणि व्यक्ती यांची पडताळणी करतात, तेव्हा ‘फेशियल रेकग्निशन पद्धती’चा वापर करून त्या सर्वांना पकडता येऊ शकते. पोलिसांकडे अनेक गुन्हेगार, हरवलेली मुले, पळून गेलेले बांगलादेशी घुसखोर किंवा आतंकवादी आदींची छायाचित्रे असतात. पोलीस अशांना पकडण्यासाठी जेव्हा बॅरिकेड्स लावतात, तेव्हा त्यामधून जाणार्‍या व्यक्तींच्या तोंडवळ्यावरून नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हेगार पकडता येईल.

निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन

२. हरवलेल्या मुलांना शोधण्यास साहाय्य

आतापर्यंत हरवलेल्या १० सहस्र ५६१ मुलांना ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ने शोधून त्यांच्या आई-वडिलांकडे पोचवण्यात आले आहे. भारतात अनेक लहान मुलांना ठेवण्यासाठी कारागृहे किंवा बालसुधारगृहे आहेत. या तंत्रज्ञानाने माहिती एकत्र केल्यास ती मुले कुठून आली, त्यांचे आई-वडील कुठे आहेत, त्यांना आई-वडिलांच्या समवेत एकत्र रहाता येईल का, या सर्वांची उत्तरे मिळू शकतात. आपल्याकडील पोलिसांची संख्या अशा मुलांना शोधण्यात न्यून पडते. पोलिसांच्या साहाय्याला तंत्रज्ञान आले, तर आपण हा शोध नक्की लावू शकतो.

अलीकडे रेल्वेस्थानके, बसस्थानके, दुकाने, निवासी सोसायट्या अशा बहुतांश ठिकाणी सीसीटीव्ही छायाचित्रक लावलेले आहेत. त्या छायाचित्रकांमध्ये मिळालेल्या छबीचा वापर गुन्हेगार, हरवलेली मुले, आतंकवाद्यांचे समर्थक यांना शोधण्यास नक्कीच होऊ शकतो. रस्त्यावरही असे छायाचित्रक लावले असतात; पण त्यांचा उपयोग फारसा होत नाही. आता ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ने अशा प्रकारे गुन्हेगारांचा शोध लावणे सोपे जाईल.

३. अमेरिका आणि चीन या देशांमध्ये वापर केला जाणे

अमेरिका आणि चीन यांसह जगातील अनेक देशांमधील विभाग तोंडवळे ओळखायचे हे तंत्रज्ञान वापरत आहेत. नवीन अभ्यासानुसार तोंडवळा ओळखण्याचे हे तंत्र १०० टक्के अचूक असण्याची आवश्यकता नाही. तज्ञांच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांवर याचा पुष्कळ वापर होत होता. हे तंत्रज्ञान वापरण्यात चीन आघाडीवर आहे. तेथे गुन्हेगार किंवा तस्कर पकडण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. चीनने एका शहरात सर्वांत मोठे ‘नेटवर्क’ निर्माण केले आहे.

४. ७ मिनिटांत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी, तसेच आतंकवादी आक्रमणे आणि गुन्हे रोखण्यासाठी ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ चांगला पर्याय !

या ‘नेटवर्क’च्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला शहराच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातून शोधून काढणे अवघ्या ७ मिनिटांत शक्य होते. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी डीएन्ए, प्रोफाईल, हातांच्या बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बाहुल्या, रक्तवाहिन्यांचे पॅटर्न अशा अनेक खुणा आहेत; परंतु या सर्व खुणांपेक्षाही अधिक सहजसोपी पद्धती, म्हणजे तोंडवळा ओळखू शकणारे ‘सॉफ्टवेअर’ ! कोणतीही माहिती नसतांना केवळ तोंडवळा पाहून हे ‘सॉफ्टवेअर’ सर्व माहिती एकत्रित करू शकते. एखादी संशयास्पद व्यक्ती कोणत्याही ठिकाणी जेव्हा पोचेल, तेव्हा पोलिसांना तातडीने ‘अलर्ट’ मिळेल. त्यामुळे आतंकवादी आक्रमणे आणि गुन्हे रोखण्यास साहाय्य मिळेल.

५. भारतामध्ये लवकरच या तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता

प्रवाशांच्या तोंडवळ्यांची ओळख पटवणार्‍या ‘सॉफ्टवेअर’चा वापर प्रायोगिक तत्त्वावर भाग्यनगर विमानतळावर चालू झाला आहे. अनुमाने एक मास केलेल्या चाचणीनंतर मुंबईसह देशातील १०५ विमानतळांवर हे तंत्रज्ञान कार्यान्वित करण्याची सिद्धता चालू आहे. तोंडवळे ओळखणार्‍या या नव्या तंत्रज्ञानामुळे सामाजिक माध्यमावरील अनेक आस्थापने, संस्था, देश अनेकांवर आधीपासूनच दृष्टी ठेवून आहेत. फेसबूकने तोंडवळ्याची ओळख पटवणार्‍या ‘डीप फेस’ या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती आधीच केली आहे. हे तंत्रज्ञान जवळजवळ मनुष्याने मानवी तोंडवळा ओळखावा, इतक्या अचूकपणे ते तोंडवळा ओळखू शकते. गुगलकडे ‘फेसनेट’ हे तोंडवळा ओळखू शकणारे सॉफ्टवेअर आहे. अ‍ॅमेझॉनकडेही अशाच प्रकारचे ‘सॉफ्टवेअर’ आहे. ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ या तंत्रज्ञानाला पुरवण्यात आलेला ‘डाटा’ आपले पासपोर्ट, आधार, बँक खाते, पोलीस रेकॉर्ड, अमली पदार्थविरोधी यंत्रणा यांसह अशा संवेदनशील यंत्रणांना जोडलेला असेल. अर्थात हा डेटा सुरक्षित राखणे, हे सरकारला मोठे आव्हान असेल.

६. ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ हे तंत्रज्ञान सर्वसामान्य होणे

६ अ. घुसखोरांना पकडणेही शक्य होणार ! : ‘आय.बी.एम्.’, ‘एच्.पी.’ यांसारख्या विविध ‘आयटी’ आस्थापने अशा प्रकारचे तंत्रज्ञान बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली अंतर्गत सुरक्षा सबळ करू शकतो. आपली सुरक्षा व्यवस्था सहस्रो बांगलादेशी घुसखोरांना पकडते. त्यांना साहाय्य करणार्‍या व्यक्तींची माहिती गोळा केली, तर या तंत्रज्ञानाने त्यांनाही पडता येऊ शकेल. बांगलादेशी घुसखोर भारत-बांगलादेश सीमेवरील चौक्यांमधून घुसखोरी करतात. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांचे काम नीट केले, तर त्यांनाही पकडणे शक्य होईल. भूसीमा, सामुद्री सीमा या ठिकाणीही या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.

६ आ. भविष्यकाळात ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’ यांसारख्या तंत्रज्ञानाचे मूल्य न्यून होणार आहे. अलीकडे पासवर्ड न ठेवता आपला तोंडवळा बघून, म्हणजेच ‘फेशिअल रिकग्निशन’करून भ्रमणभाष किंवा भ्रमणसंगणक उघडता येतो. हे तंत्रज्ञान अगदी सामान्य माणसाच्या भ्रमणभाषमध्येही आले आहे.

७. सरकारने ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’चा वापर त्वरित करणे श्रेयस्कर !

प्रत्येक तंत्रज्ञानामध्ये काहीतरी न्यूनता असू शकते. ‘फेशियल रेकग्निशन सिस्टिम’मध्येही काही न्यूनता राहून ते चुकीचे निर्णय घेऊ शकते; म्हणून इतर माहितीचा आधार घेऊन या तंत्राचा सकारात्मक उपयोग करता येईल. भारत सरकारकडून विकसित होणार्‍या या सॉफ्टवेअरचा उपयोग लवकरच सुरक्षा व्यवस्थांमध्ये करण्यात येईल. गुन्हेगार, आतंकवादी, माओवादी, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोर यांना पकडणे सोपे होईल. तसेच मोठ्या शहरांमधून हरवलेली लहान मुले आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती यांचा शोध घेणे सोपे जाईल. ‘या तंत्रज्ञानाचा वापर देशाने लवकरात लवकर करावा’, अशी अपेक्षा आहे.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.