सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढून ती अग्नीत अर्पण केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु अनुराधाताईंनी (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी) ‘भगवंत भेट’ सत्संगात सर्वांना आपले नातेवाईक आणि कार्यालयीन सहकारी यांच्याविषयी जे काही पूर्वग्रह असतील, त्यांची व्याप्ती काढण्यास सांगितली होती.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

मी (श्री. श्रीकृष्ण उपाध्ये) आणि माझी पत्नी (सौ. अभया उपाध्ये) आम्ही दोघांनी नातेवाईक, साधक, समाजातील लोक आणि कार्यालयातील सहकारी यांच्याविषयीचे पूर्वग्रहाचे प्रसंग लिहून काढले. ‘पूर्वग्रह’ या दोषामुळे साधनेत येणारे अडथळे तूच दूर कर आणि आमची साधना चांगली होऊ दे’, अशी प्रार्थना करून ते कागद १८.४.२०२० या रात्री १० वाजता अग्नीत अर्पण केले.

१. अग्नीत समर्पित केलेल्या कागदाच्या राखेत ‘ॐ’ उमटलेला बघून भावजागृती होणे 

दुसर्‍या दिवशी सकाळी पत्नीने ती राख टाकून देण्यासाठी सुपलीत भरली, तर त्या ठिकाणी ‘ॐ’ दिसला. तो ‘ॐ’ भिंगातून बघितल्यासारखा वर आलेला दिसत होता, म्हणजे स्पष्ट दिसत होता. त्या ‘ॐ’चा आकार (६ इंच × ६ इंच) एवढा होता. ‘ॐ’कडे बघितल्यावर आम्हा दोघांची भावजागृती झाली.

‘सद्गुरु अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच कृती केली; म्हणून देवाने साहाय्य केले आहे’, असे माझ्या लक्षात आले, तसेच ‘आम्ही स्वभावदोष न्यून होण्यासाठी इतके दिवस प्रयत्न केले नाहीत’, याची जाणीव झाली.

२. कार्यालयातील साहेबांविषयी प्रसंग लिहून अग्नीत समर्पित केल्यावर साहेबांच्या बोलण्यात पालट जाणवणे 

‘पूर्वग्रहदूषितपणा’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढतांना मी (श्री. श्रीकृष्ण उपाध्ये यांनी) माझ्या कार्यालयातील साहेबांविषयी प्रसंग लिहिला होता. तो अग्नीत अर्पण केल्यानंतर १९.४.२०२० या दिवशी संध्याकाळी मला साहेबांचा भ्रमणभाष आला. त्या वेळी ‘आज सुटी आहे, तरी साहेबांनी काय काम काढले ?’, असा विचार मनात आला आणि मी भ्रमणभाष उचलला. तेव्हा ते माझ्याशी कामाचे न बोलता ९० मिनिटे अनौपचारिक बोलत होते. ते माझ्याशी त्यांच्या घरच्या अडचणी आणि मुले यांविषयी बोलत होते.

साहेब मला म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण, कार्यालयीन कामासाठी मी तुला कितीही ओरडलो, तरी तू माझा एक चांगला मित्र आहेस.’’ जे साहेब कार्यालयातील कामासाठी भ्रमणभाष केल्यावर तो उचलत नव्हते, ते आज माझ्याशी दीड घंटा अनौपचारिक बोलत होते. ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढून ती अग्नीत अर्पण केल्यामुळेच ही अनुभूती आली’, असे आम्हा दोघांना वाटले.’

– श्री. श्रीकृष्ण उपाध्ये आणि सौ. अभया उपाध्ये (वय ४७ वर्षे), खांदा कॉलनी, पनवेल. (१९.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक