गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करत गुरुकृपेने प्रारब्धातील अपमृत्यूवर मात करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे. त्यांच्या कृपेविना मला आजचा दिवस पहाता आला नसता. मला आजारातून बरे वाटावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज, सनातनचे सर्व संत आणि साधक यांनी नामजप अन् प्रार्थना केल्या. मी त्या सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

भाग १.

१. मुंबईहून येतांना नेहमीपेक्षा अधिक थकवा जाणवणे, दुसर्‍या दिवशी थकवा वाढल्याने आश्रमात न जाणे आणि त्याच रात्री घरातील सर्वांना थंडी वाजून ताप येणे​

ऑक्टोबर २०१७ मध्ये मी माझी पत्नी सौ. रिशिता आणि मुलगी कु. राधा (वय ७ वर्षे) यांसह दिवाळीसाठी मुंबईला गेलो होतो. २२.१०.२०१७ या दिवशी आम्ही चारचाकीने गोव्याला परत यायला निघालो. त्या वेळी मला नेहमीपेक्षा अधिक थकवा जाणवत असल्याने मी आजारी पडणार आहे, असे मला वाटू लागले. आम्ही आमच्या फोंडा (गोवा) येथील घरी रात्री पोचलो. दुसर्‍या दिवशी मला थकल्यासारखे वाटत असल्यामुळे मी घरीच राहून विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याच रात्री मला थंडी वाजून ताप आल्याने मी औषध घेऊन झोपलो. त्याच वेळी सौ. रिशिता आणि कु. राधा यांनाही ताप असल्याचे लक्षात आले.

श्री. देवांग गडोया

२. ताप न उतरल्याने डेंग्यूची शक्यता वाटून आधुनिक वैद्यांनी रक्ताची तपासणी करून घेण्यास सांगणे, तेव्हाही मन शांत असून या परिस्थितीतून काहीतरी शिकता येईल, असे वाटणे 

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ताप आणि अंगदुखी, हा त्रास एकाच वेळी आम्हा तिघांनाही होत होता. हा आजार म्हणजे सूक्ष्मातून वाईट शक्तींचे आक्रमण असावे, असे सौ. रिशिता म्हणाली. मलाही प्रथमच तसे जाणवले. या २ – ३ दिवसांमध्ये मला जेवण जात नसल्यामुळेे पुष्कळ अशक्तपणा आला होता. माझ्यात चालण्याचीही शक्ती राहिली नव्हती. माझा तापही उतरत नव्हता. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते. आम्हाला तिघांना तपासल्यावर त्यांना हा प्रकार गंभीर वाटल्याने त्यांनी आम्हाला त्वरित डेंग्यूसाठी असलेली रक्त-तपासणी करायला सांगितली. त्या वेळीही माझी स्थिती गंभीर आहे, असे मला वाटले नाही. जे काही होईल, ते माझ्या चांगल्यासाठीच असेल, असे वाटून मी शांत होतो. चिंता करण्याऐवजी या परिस्थितीतून मला काहीतरी शिकता येईल, असे मला वाटत होते. असे प्रथमच घडत होते.

३. रुग्णालयात केलेले उपचार

३ अ. डेंग्यू झाल्याचे निदान झाल्यामुळे रुग्णालयात भरती होणे, प्रतिदिन रक्तामधील प्लेटलेट्सची (रक्तबिंबिकांची) संख्या अतिशय उणावून १२ सहस्र इतकी होणे : रक्ताच्या तपासण्यांच्या अहवालावरून मला डेंग्यू झाला आहे, असे निदान झाले. माझ्या रक्तामधील प्लेटलेट्सची (रक्तबिंबिकांची) संख्या ७० सहस्र एवढी खाली आली होती. (सामान्यतः ही संख्या १.५ ते ४.५ लक्ष इतकी असते.) त्यामुळे मला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रत्येक दिवसागणिक माझ्या रक्तामधील प्लेटलेट्सची संख्या न्यून होत गेली. एके दिवशी ती १२ सहस्र एवढी खाली आली. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या शरिरात अंतर्गत रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू होण्याची शक्यता असते. मला माझा मृत्यू समोर दिसत होता; कारण तपासणीसाठी रक्त काढण्याचा प्रयत्न करत असतांना परिचारिकेला माझ्या दोन्ही हातांच्या शिराच सापडत नव्हत्या. त्यासाठी माझे दोन्ही हात आणि मान यांना अनेक वेळा सुया टोचल्यामुळे त्या ठिकाणी काळे-निळे झाले होते.

३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर रहाता येणे, बरे वाटण्यासाठी आश्रमातील साधक आणि संत यांनी रात्रंदिवस नामजप करणे अन् परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिवसातून ३ ते ५ वेळा भ्रमणभाषवर चौकशी करून मंत्रजप ऐकवल्यानंतर बरे वाटणे : या स्थितीतही मी स्थिर आहे, असे माझ्या लक्षात आले. हे शरिराचे भोग आहेत. परात्पर गुरु डॉक्टर मला काहीही होऊ देणार नाहीत आणि मी बरा होईन, अशी माझी दृढ श्रद्धा होती. माझ्यासाठी आश्रमातील साधक आणि संत रात्रंदिवस नामजप करत आहेत, हे मला समजल्यावर ही श्रद्धा अधिकच दृढ झाली. परात्पर गुरु पांडे महाराज माझी विचारपूस करण्यासाठी दिवसातून ३ ते ५ वेळा माझ्याशी भ्रमणभाषवर बोलायचे. त्या वेळी मला कोणत्याही प्रकारचा त्रास, उदा. ताप, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी होत आहे, असे समजल्यावर त्यासाठी ते स्वतः मंत्रजप करायचे आणि नंतर मला बरे वाटायचे.

३ इ. रुग्णालयात असतांना उपचारांना शरीर चांगला प्रतिसाद देणे; मात्र डोकेदुखी आणि अंगदुखी वाढल्याने ते सहन करू न शकणे, त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपांमुळे थोडे बरे वाटणे :
प्रथम मला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथील उपचारांना माझे शरीर चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे माझी प्रकृती सुधारत आहे, असे आरंभी मला वाटत होते; पण माझी डोकेदुखी आणि अंगदुखी वाढतच होती. हे दुखणे असह्य झाल्यावर मी रुग्णालयात माझ्या समवेत असलेल्या साधकांना माझे डोके वा पाय चेपून देण्यासाठी सतत सांगत होतो. मला शिरेतून वेदनाशमक औषधे द्या, असे मी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही सांगत होतो. त्यानंतर मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे भ्रमणभाष येऊ लागले. त्यांनी माझ्यासाठी १८ मंत्रजप ध्वनीमुद्रित करून संगणकीय पत्राद्वारे पाठवले आणि ते भ्रमणभाषवर सतत लावून ठेवण्यास सांगितले. ते स्वतःही मला भ्रमणभाष करून माझ्या कानात मंत्रजप म्हणत असत. त्यानंतर मला बरे वाटत असे.

३ ई. जेवण जात नसल्याने प्रकृती आणखीनच खालावणे, औषधाच्या गोळ्या घेतांना कुणीतरी गळा दाबत असल्याचे जाणवून गोळ्या ओकून टाकणे आणि यापूर्वी औषधे घेतांना असा त्रास कधीही झालेला नसणे : मला रुग्णालयात भरती केल्यावर २ – ३ दिवसांनी माझी प्रकृती आणखीनच खालावली. मला अन्नाच्या वासानेच मळमळत असल्याने जेवण जात नव्हते. केवळ चहा, ताक आणि फळे एवढेच मी ग्रहण करू शकत होतो. मला एका वेळी औषधांच्या ११ गोळ्या घ्याव्या लागत होत्या. औषध घेत असतांना कुणीतरी माझा गळा दाबत आहे, असे मला वाटत असे. त्यामुळे कित्येकदा मी त्या गोळ्या न गिळता ओकून टाकत असे. यापूर्वी मी औषधे घेतांना असे कधीही झाले नव्हते. नंतर मला दुसर्‍या खोलीत हालवण्यात आले. त्या खोलीत मी एकटाच होतो. त्या रात्री माझ्यावर आध्यात्मिक उपाय व्हावेत, यासाठी आश्रमातून पुरोहित साधक आध्यात्मिक उपायांचे साहित्य घेऊन आले होते. त्या वेळी प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरच माझ्यावर उपाय करत आहेत, असे मला जाणवून पुष्कळ सुरक्षित वाटले.

३ उ. परात्पर गुरु पांडे महाराजांनी केलेले मंत्रजपादी उपाय

३ उ १. एका साधकाला छातीवर हात ठेवायला सांगून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मंत्रजप म्हणणे, त्या वेळी शरिरातून काहीतरी खेचून काढले जात असल्याचे जाणवणे, तेव्हा शरीर अन् आजार यांच्यात युद्ध चालू असून स्वतः ते साक्षीभावाने पहात आहे, असे वाटणे : दुसर्‍या दिवशी आश्रमातून काही साधक मला भेटायला आले होते. त्याच वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझ्यावर उपाय करण्यासाठी मला भ्रमणभाष केला; पण तेव्हा माझी स्थिती चांगली नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी श्री. शॉन यांना माझ्या छातीवर हात ठेवायला सांगितला आणि ते मंत्रजप करू लागले. त्यांचा मंत्रजप चालू असतांना माझ्या शरिरातून काहीतरी खेचून बाहेर काढले जात आहे, असे मला जाणवले. तेव्हा माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटत होते. माझे शरीर आणि आजार यांच्यात युद्ध चालू असून मी ते साक्षीभावाने पहात आहे, असे मला वाटत होते. मी रुग्णालयात असतांना माझ्या शरिरावर आलेले त्रासदायक आवरण आणि आजाराची तीव्रता वाढली आहे, असे मला वाटत होते. प्रत्यक्षात माझे देहप्रारब्ध आणि माझ्यावर झालेले वाईट शक्तींचे आक्रमण हे दोन्ही एकत्र आल्यामुळे त्याचा परिणाम एवढा गंभीर होता, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले नव्हते. मला आयुष्यात पहिल्यांदाच रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. यापूर्वी मला कधीही रुग्णालयात भरती व्हावे लागले नव्हते.

माझ्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ५६ सहस्र एवढी झाली असल्यामुळे तेथील आधुनिक वैद्यांच्या समुपदेशाने मला मोठ्या रुग्णालयात भरती करण्यात आले.

(क्रमशः सोमवारच्या अंकात)

– श्री. देवांग गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०१८)

भाग२.वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिककरा – https://sanatanprabhat.org/marathi/447158.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक