१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या दौर्‍याविषयी माहिती दिली.

बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, ९ मार्च या दिवशी मनसेचा ‘वर्धापन दिन’ असतो. अयोध्या दौर्‍याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. ९ मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील. याशिवाय मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार आहे.

‘मराठी भाषा’ दिनाला स्वाक्षरी मोहीम राबवणार !

बाळा नांदगावकर म्हणाले, ‘‘२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा ‘मराठा राजभाषा’ दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे. यानिमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल. त्या दिवशी मनसेच्या वतीने मराठी शिक्षक, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू, मराठी वृत्तपत्रे, मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.’’