परमेश्‍वराची कृपा आणि त्याचे सामर्थ्य !

१. जीवनात योगायोेग कधी नसतो !

श्री. दत्तात्रय पटवर्धन

जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात. त्यांना ईश्‍वर, ईश्‍वरीकृपा या शब्दांचे वावडे असते. यासंदर्भात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी म्हटले आहे, ‘‘जीवनात योगायोग असा कधी नसतो. ज्याला आपण योगायोग म्हणतो, ती खर्‍या अर्थाने ईश्‍वरी कृपाच असते.’’

२. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’, अशा वृत्तीचे नास्तिक !

दूरचित्रवाहिनीवरील एखाद्या कार्यक्रमात यशस्वी व्यक्तीचा वार्तालाप चालू असतो. तेव्हा मुलाखत देणारी व्यक्ती सहजपणे ‘ईश्‍वरीकृपा’ किंवा ‘गुरुकृपा’ असे शब्द बोलून जाते. त्या वेळी सूत्रसंचालकाचा तोंडवळा अगदी पहाण्यासारखा होतो. तो कौशल्याने विषयांतर करून मुलाखतदाराला ईश्‍वरी तत्त्वापासून दूर घेऊन जातो.

काही देवाला न मानणारे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशा धारणेचे असतात. ज्या वेळी त्यांचा प्राण कंठाशी येतो, तेव्हा अगदी खर्‍या देवभक्तालाही लाजवेल इतके बेमालूम नाटकीपणाने देवाला आळवतात आणि वेळ टळली की, पुन्हा देवाला नावे ठेवण्यासाठी मोकळे होतात. अर्थात् परमेश्‍वराचे धोरण नि:पक्षपाती आणि निर्मळ असते. कर्मफलन्यायानुसार प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतच असते.

३. ईश्‍वराची प्रचीती देणार्‍या दैनंदिन जीवनातील गोष्टी !

आपण अंतर्मुख होऊन दैनंदिन जीवनात घडणार्‍या गोष्टींचे चिंतन केले, तरी आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते की, आपण केवळ ईश्‍वरी कृपेेमुळेच जिवंत असतो. ज्याविना आपण जगू शकत नाही, अशी ईश्‍वरनिर्मित हवा, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी तो आपल्याला विनामूल्य देत असतो. त्या विकत घ्याव्या लागल्या असत्या, तर अब्जाधिशांनाही पैसा अल्प पडला असता.

अ. माणसांनी कष्ट केले; पण पाऊसच पडला नाही, तर ते सर्व कष्ट व्यर्थ जातात. एवढेच नाही, तर ईश्‍वर धान्यही कितीतरी पटीने अधिक देत असतो. एकाच भूमीत नानाविध रंगांची आणि सुगंधांची सुंदर फुले निर्माण होतात. तोच प्रकार फळांच्या संदर्भातही आहे.

आ. जगात कोट्यवधी माणसे आहेत; पण प्रत्येकाचा आवाज, व्यक्तीमत्व एवढेच नाही, तर हस्ताक्षरही निराळे आहे.

इ. आपण मुख, दात आणि जीभ यांच्या साहाय्यानेे अन्नपदार्थ ग्रहण करतो, ती रचनाही आश्‍चर्यकारक आहे. अन्नाचे घास चावतांना आपली जीभ प्रतिदिन किमान ५० वेळा तरी  दातांमध्ये अडकून चावली गेली असती; पण तसे काही होत नाही. क्वचित्च वेळा जरी तसे घडले, तरी त्याची वेदना काही फार काळ टिकून रहात नाही.

ई. या संदर्भात अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, आपल्या मुखात जीभ आणि पडजीभ आहे. त्यामुळे आपण बोलू शकतो. याखेरीज आपल्या मुखातील लाळेचेही वेगळे महत्त्व आहे. जेव्हा एखाद्या आजारपणात आपल्या तोंडाला कोरड पडते, तेव्हा हा अनुभव प्रकर्षाने आपल्याला येतो.

उ. ज्यांच्याकडे नारळाच्या बागा आहेत, त्यांना आयुष्यात डोक्यावर नारळ पडून कुणी गंभीर घायाळ झाल्याचे स्मरत नसेल. अपवादाने झाले, तरी त्या व्यक्तीचा कधी प्राण जात नाही. त्यातूनही तो सुखरूप बाहेर पडतो.

ऊ. सृष्टीमध्ये चंद्र-सूर्य, चांदण्या, आकाश, अथांग समुद्र अशा असंख्य सजीव आणि निर्जीव गोष्टी आहेत. यातून या जगाचा संचालनकर्ता दुसरा कुणीतरी आहे, हे लहान मुलांनाही समजते.

तात्पर्य, ग्रंथवाचन, कीर्तन, प्रवचने यांचे ज्यांना ‘वावडे’ आहे, त्यांना वरील नियमित घडणार्‍या गोष्टींमधूनही ईश्‍वराचे सामर्थ्य आणि कृपा अनुभवता येऊ शकते; पण ज्याला बघायचेच नाही, त्यांना कोण काय दाखवणार ?

४. कोरोनाने विज्ञानाची अगतिकता आणि अपूर्णता दाखवणे

कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरले. या वेळी विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेली राष्ट्रेही हतबल झाली. १ वर्षाचा कालावधी होत आला, तरी या महामारीवर ठोस उपाययोेजना निघू शकली नाही. कोरोना प्रतिबंधित लस शोधण्यात आली; पण त्याविषयी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण दिसून येते. यातून विज्ञानाची अगतिकता आणि अपूर्णता सिद्ध झाली आहे.

५. पडलो तरी नाक वर !

आपल्या सभोवताली इतके सर्व घडत असतांनाही ‘पडलो तरी नाक वर’ अशा वृत्तीचे अहंमान्य लोक समोर दिसणार्‍या देवालाही कृतज्ञता भावनेने शरण जात नाहीत, तर न दिसणार्‍या निर्गुणातील देवाविषयी त्यांना काय सांगणार ?

६. दळणवळण बंदी उठवतांना सर्वांत शेवटी मंदिरे उघडणे !

सरकारने दळवळण बंदी उठवतांना प्राधान्याने जीवनावश्यक वस्तू, केश कर्तनालय आणि मद्याची दुकाने चालू केली; पण ज्यांच्या कृपेखेरीज कुणी जगूही शकत नाही, अशा देवतांची मंदिरे मात्र सर्वांत शेवटी उघडली. आपल्या भारतीय संस्कृती-परंपरेनुसार सर्वसाधारणपणे कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करतांना किंवा दीर्घकाळ बंद असलेली गोष्ट नव्याने चालू करतांना सर्वप्रथम देवाचे कृपाशीर्वाद घेतो. कोरोनाच्या या महाभयानक मारामारीच्या पार्श्‍वभूमीवर तर असे करणे अगत्याचे होते.

७. प्रसिद्धीचा हव्यास असणारे धर्मद्रोही !

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने लागू केलेल्या ‘ड्रेस कोड’च्या विरोधात आंदोलन केले. या मंडळींना धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम यांविषयी काहीच देणे-घेणे नसते. येन केन प्रकारेण ‘प्रसिद्धी पुरुषा भवेत’ या न्यायाने कोणत्याही मार्गाने का होईना प्रसिद्धी मिळवायची, एवढाच यांचा संकुचित हेतू असतो.

परमेश्‍वर अशा लोकांना वेळ आल्यावर त्यांची योग्य जागा दाखवून देतोच. प्रत्येक गोष्टीचे स्थान हे ठरलेले आहे. टोपी ही नेहमी डोक्यावरच असते आणि पादत्राणे (चपला) ही नेहमी पायातच असतात, हे लक्षात ठेवले पाहिजे, अन्यथा देवाला ती जागा दाखवून द्यावी लागते. शेवटी बुद्धीप्रामाण्यवादी आणि नास्तिक यांनाही एक दिवस ‘ईश्‍वरेच्छा बलियेसी’ (देवाच्या इच्छेपुढे काही चालत नाही) हा सिद्धांत मान्य करावाच लागतो; परंतु त्यांना ते कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

– श्री. दत्तात्रय पटवर्धन, सावंतवाडी, सिंधुदुर्ग (१९.१२.२०२०)