देशविरोधी संघटनांनी अर्थपुरवठा केल्याचा संशय
नवी देहली – येथील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेले शेतकरी नेते आणि ‘भलाई इंसाफ वेलफेयर सोसायटी’चे अध्यक्ष बलदेव सिंह सिरसा यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) चौकशीसाठी बोलावले आहे. ही चौकशी देशविरोधी संघटनांनी अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी, तसेच बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’च्या एका नेत्यावर प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात केली जाणार आहे.
१. एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.
२. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका येथील खलिस्तानी समर्थकांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांच्या देशातील भारताच्या दूतावासाबाहेर निदर्शने केली होती. यात सिख फॉर जस्टिस, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान टायगर फोर्स या खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा समावेश होता. या संघटनांनी भारतातील सामाजिक संघटनांना अर्थपुरवठा केल्याचा संशय आहे.
३. नुकतीच एन्.आय.ए., ईडी, आयकर विभाग, सीबीआय आणि फेरा यांच्या अधिकार्यांची एक बैठक पार पडली होती. त्यात या खलिस्तानी आतंकवादी संघटनांच्या विरोधात कृती करण्याचे ठरवण्यात आले.