आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात नियमित एकत्र येण्याचा उपस्थितांचा निर्धार !
उत्तरप्रदेश – आरोग्य क्षेत्रातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांचे संघटन व्हावे, तसेच आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैध मार्गाने कृती करण्यात यावी, या उद्देशाने आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने नुकतीच एक ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी वाराणसी येथील डॉ. अजयकुमार जयस्वाल, डॉ. भरतलाल जयस्वाल, डॉ. रंजय गुप्ता, डॉ. दिपांकर शुकला, डॉ. अभिषेक केशरवाणी, डॉ. आलोक, डॉ. संजय कुमार, डॉ. विजय यांसह अनेक आधुनिक वैद्य, तसेच हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारद्वारे ३४४ औषधे प्रतिबंधित केली गेली आहेत; परंतु अजूनही अनेक ठिकाणी अशा औषधांची सर्रास विक्री केली जात असल्याचे लक्षात येते. १२ डिसेंबर या दिवशी राजस्थानमध्ये १ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याचे आढळले. या संदर्भात बैठकीमध्ये वैध मार्गाने कृती करण्यासाठी विस्तृत चर्चा करण्यात आली, तसेच समाजात जागृतीसह एकत्र येऊन कृती करणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन सर्वांनीच प्रत्येक ७ दिवसांतून एकदा एकत्र येण्याचे ठरवण्यात आले.
या वेळी आरोग्य साहाय्य समितीचा वरील उपक्रम करतांना त्याला साधनेची जोड कशी द्यावी, याची माहिती श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी दिली. याप्रसंगी वाराणसी येथील डॉ. अजयकुमार जायस्वाल यांनी स्वत: कोरोनाचे रुग्ण असतांनाच्या स्थितीत नामजपाद्वारे त्यावर कशी मात केली, याची माहिती दिली.