‘१२.१२.२०२० या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगाचे २५० भाग पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने…
‘१२.१२.२०२० या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगाचे २५० भाग पूर्ण होत आहेत. मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे प्रतिदिन चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी पूर्वप्रसिद्धीची ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा मिळाली. ‘ऑनलाईन’ सत्संगाचे २५० भाग पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ‘पोस्ट’ बनवतांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव लिहून द्यायला गुरुदेवांनी सुचवले. ही सेवा करतांना माझ्या अल्पबुद्धीला लक्षात आलेली सूत्रे मी गुरुचरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करते.
१. परात्पर गुरुदेवांनी साधकांच्या मनातील इच्छा ओळखून त्यांना विविध सेवांमधून आनंद देणे
कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी लागू झाली. तेव्हा ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’कडून प्रतिदिन ‘ऑनलाईन’ सत्संग शृंखलेचे आयोजन करण्यात आले. ‘सत्संग चालू होणार आहे’, हे समजल्यावरच ‘सत्संगाच्या ‘पोस्ट’ बनवाव्यात’, अशी माझ्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. नंतर एप्रिल मासात केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. ‘गुरुदेव साधकांच्या मनातील इच्छा ओळखतात आणि विविध सेवांतून त्यांना आनंद देतात’, हे मला अनुभवता आले.
२. देवाने ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा टप्प्याटप्प्याने शिकवणे
२ अ. आरंभी बनवलेल्या ‘पोस्ट’मध्ये पुष्कळ सुधारणा कराव्या लागल्याने सेवा पूर्ण व्हायला ६ – ७ घंटे लागणे : आरंभी मला या सेवेला पुष्कळ वेळ द्यावा लागायचा. मी सकाळी ११ वाजता ‘पोस्ट’ बनवायला चालू केल्यावर ती संध्याकाळी ६ वाजता अंतिम व्हायची. मी बनवलेल्या एकाच ‘पोस्ट’मध्ये पुष्कळ सुधारणा असायच्या.
२ आ. ‘पोस्ट’ पडताळतांना सहसाधकाने त्यातील पालट शांतपणे सांगणे आणि स्वतःकडून ते पालट सहजतेने स्वीकारले जाणे : श्री. निखील पात्रीकर ‘पोस्ट’ पडताळतांना त्यातील पालट मला शांतपणे सांगायचे. कित्येक वेळा त्यांना मला एकाच पालटाविषयी पुनःपुन्हा सांगावे लागायचे. त्यांच्याकडून मला सेवेतील परिपूर्णता आणि स्थिरता शिकायला मिळाली. देवाच्या कृपेमुळे माझ्याकडून त्यांनी सांगितलेले पालट सहजतेने स्वीकारले जायचे.
२ इ. सेवेतील बारकावे समजावून सांगणे : गुरुदेवांनी निखीलदादाच्या माध्यमातून मला सेवेतील बारकावे समजावून सांगितले आणि माझ्याकडून परिपूर्ण सेवा होण्यासाठी त्यांनीच प्रयत्न करवून घेतले. ‘पोस्ट’ बनवण्याची तपाससूची बनवणे, ‘त्याप्रमाणे सेवा झाली का ?’, याची फेरतपासणी करणे, व्याकरण पुनःपुन्हा तपासणे, ही सूत्रे त्यांच्याकडून मला शिकता आली.
२ ई. देवाच्या कृपेने ‘पोस्ट’ अल्पावधीतच बनवून होणे : देवाने मला टप्प्याटप्प्याने शिकवले आणि आता मला पूर्ण ‘पोस्ट’ बनवायला केवळ २० ते ३० मिनिटे लागतात. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे मला हे जमू लागले. तेच या क्षुद्र जिवाकडून सेवा करवून घेत आहेत.
३. ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी ‘पोस्ट’ बनवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
३ अ. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून भारतभ्रमण होऊन कधी न पाहिलेल्या मंदिरांचे दर्शन होणे : सत्संगाच्या ‘पोस्ट’ बनवतांना‘ सत्संगाचा विषय’ आणि ‘सत्संगाचे नाव’ असे २ भाग असतात. मला सत्संगाची संहिता लिहिणार्या साधकांकडून विषय मिळायचा. त्यासाठी माहितीजाल (इंटरनेट)मधून एखादे चित्र (इमेज) शोधावे लागते. गुरुदेवांच्या कृपेने माझा विषयाचा अभ्यास व्हायचा. नामजप सत्संगातून गुरुदेव माझ्यासमोर हिंदु संस्कृतीची महानता अधोरेखित करायचे, तर भावसत्संगाच्या माध्यमातून माझे भारतभ्रमण होत असे. भावसत्संगात विविध मंदिरांविषयी भावप्रयोग घेत असल्याने मी कधी न पाहिलेल्या मंदिरांचेही मला दर्शन व्हायचे.
३ आ. साधनेचे प्रयत्न अल्प असल्याची जाणीव होणे : ‘ऑनलाईन’ सत्संगासाठी संहिता लिहिणार्या कु. संगीता मेनराय मला सत्संगाचा विषय सांगतांना ‘अनेक भक्तांनी ईश्वरभक्ती कशी केली ?’ याविषयी सांगायच्या. तेव्हा ‘माझी भक्ती किती अल्प आहे !’, याची मला जाणीव व्हायची. त्या वेळी ‘देव मला प्रयत्न करायला सांगत आहे’, असे मला वाटत असे.
३ इ. सात्त्विक चित्रांचा अभ्यास होणे : सत्संगासाठी पुष्कळशी चित्रे (इमेजेस) ‘sanatan.org’ या संकेतस्थळावर मिळतात; पण काही वेळा अन्य ठिकाणी चित्रे शोधावी लागायची. तेव्हा ‘त्यातील अधिक सात्त्विक चित्र कोणते आहे ? कोणत्या चित्रात भाव जाणवतो ?’, याचा अभ्यास गुरुदेवांनी माझ्याकडून करवून घेतला.
३ ई. सात्त्विक चित्रांच्या माध्यमातून देवतांचे सगुण रूप अनुभवता येणे : गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे सनातन संस्थेची देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध आहेत. त्यातून अखंड चैतन्य मिळते. मला त्याविषयी कृतज्ञता वाटते. सामाजिक संकेतस्थळावर उपलब्ध असलेली देवतांची चित्रे तितकी सात्त्विक नसतात. गुरुदेवांनी या घोर कलियुगात आम्हा क्षुद्र जिवांसाठी या सात्त्विक चित्रांच्या माध्यमातून देवतांचे सगुण रूपच आमच्यासमोर ठेवले आहे.
४. अनुभूती
४ अ. गुरुदेवांच्या कृपेने ‘पोस्ट’साठी नवीन संकल्पना सुचणे : ‘पोस्ट’ बनवतांना वेळ वाचावा; म्हणून मी ‘पोस्ट’साठी जुनीच ‘डिझाईन्स’ घ्यायचे. (एडीट करायचे.) गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘गुरुदेवांच्या चरणी नवीन ‘पोस्ट’ अर्पण करूया’, असे मला वाटले. तेव्हा सलग ७ – ८ दिवस गुरुदेवच मला ‘पोस्ट’साठी नवीन संकल्पना सुचवत होते. ‘तेच माझ्या माध्यमातून सर्व करत आहेत’, असे वाटून मला पुष्कळ आनंद मिळाला.
४ आ. कृष्णाशी बोलत सेवा केल्यामुळे वेगळीच रंगसंगती निवडली जाणे आणि ‘पोस्ट’कडे पाहून डोळ्यांत अश्रू येणे : कृष्णजन्माष्टमीच्या वेळी सत्संगाचे सर्व विषय कृष्णाशी संबंधित होते. मी त्या दिवशी कृष्णाशी बोलत सेवा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘पोस्ट’ बनवतांना मला वेगळा आनंद मिळाला. त्या वेळी माझ्याकडून वेगळीच रंगसंगती निवडली गेली. तेव्हा ‘पोस्ट’कडे पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
४ इ. स्वतःमध्ये व्यापकता येणे : माझा या सेवेच्या निमित्ताने विविध राज्यांतील साधकांशी संपर्क आला. मी सोलापूरमध्ये रहात असून मध्यप्रदेश, फरिदाबाद, गोवा आणि देहली येथील साधकांशी समन्वय करतांना ‘देवाने मला एका जिल्ह्यापुरते संकुचित ठेवले नाही. देव मला भारतभर फिरवून आणत आहे आणि माझ्यामध्ये व्यापकता आणत आहे’, असे मला जाणवले. ‘देवाने माझ्यासाठी स्थळाची बंधने तोडली आहेत’, असे मला वाटले.
५. कृतज्ञता
५ अ. ‘ऑनलाईन’ भावसत्संगाच्या माध्यमातून संत आणि ऋषि-मुनी यांना समाज ओळखू लागणे : ‘ऑनलाईन’ भावसत्संगात अनेक संत आणि देवता यांविषयी माहिती असते. त्यांच्याशी संबंधित चित्रे माहितीजालावर (इंटरनेटवर) शोधायची असतात. तेव्हा कित्येक वेळा चित्रे (इमेजेस) मिळायची नाहीत. काही वेळा चित्रे विडंबनात्मक असायची. तेव्हा माझ्या लक्षात यायचे, ‘भारतात अनेक संत महात्मा होऊन गेले. समाजातील व्यक्ती त्यांना ओळखत नाही किंवा समाजातील व्यक्तींना त्यांचे नावही ठाऊक नाही. समाजात ओळखल्या जाणार्या साधू-संतांना विडंबनात्मक रूपांमध्ये सादर केले जाते. समाजातील व्यक्ती ‘ऑनलाईन’ भावसत्संगाच्या माध्यमातून संत आणि ऋषि-मुनी यांना ओळखू लागल्या. त्यामुळे मला या सत्संगाप्रती कृतज्ञता वाटते.
५ आ. प्रतिदिन देवाच्या नवीन रूपाचे दर्शन घडणे आणि नवीन भक्तांना भेटायला मिळणे : प्रतिदिन होणार्या ‘ऑनलाईन’ भावसत्संगासाठी चित्रे (इमेजेस) शोधतांना माझा भावसत्संगाच्या विषयांचा अभ्यास व्हायचा. त्यामुळे भक्त आणि भक्ती यांची श्रेष्ठता माझ्या लक्षात यायची. मला या सेवेतून प्रतिदिन देवाच्या नवीन रूपाचे दर्शन घडायचे, नवीन भक्तांना भेटायला मिळायचे. त्याविषयी मी त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
५ इ. सेवा करण्याची संधी देणे : ‘गुरुदेव, केवळ तुमच्याच कृपेमुळे मला तुमची चरणसेवा करण्याची संधी मिळाली. या सेवेतून तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षावच केला आहात; पण माझ्या अल्पबुद्धीला काही लक्षातच आले नाही. ‘तुम्हीच या क्षुद्र जिवाला घडवत आहात’, त्याविषयी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.
‘तुम्हाला अपेक्षित असे घडण्यासाठी तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी मी प्रार्थना करते.’
– कु. श्रेया गुब्याड, सोलापूर (१.१२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |