जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया नव्याने चालू करण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट

पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया नव्याने चालू करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्याच्या मते जिल्हा पंचायतीची सध्याची निवडणूक प्रक्रिया फेब्रुवारी मासात चालू झाली होती. जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारी मासात काढण्यात आली होती आणि यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली. शासनाने जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचे घोषित केले आहे; मात्र यासाठी नव्याने अधिसूचना किंवाप्रक्रिया चालू केलेली नाही, तसेच आचारसंहिताही लागू केली नाही. यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक ९ किंवा १६ जानेवारी २०२१ या दिवशी घेतल्यास योग्य होईल, असे मत पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी व्यक्त केले.