संयुक्त अरब अमिरातकडून १३ देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी

पाकच्या समावेशाने सहस्रो नागरिकांच्या नोकर्‍या जाणार

अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – संयुक्त अरब अमिरातने १३ देशांच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. यात इराण, सीरिया, अफगाणिस्तान पाकिस्तान आदी इस्लामी देशांचा समावेश आहे. अमिरात आणि इस्रायल यांच्यातील सामंजस्य करारानंतर ही बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इस्लामी देशांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही.

या बंदीमुळे पाकच्या रावळपिंडी येथीलच केवळ ३ सहस्र कामगारांच्या नोकर्‍या जाणार आहेत. संपूर्ण पाकमध्ये किती जणांवर याचा परिणाम होणार आहे, याची आकडेवारी समोर आलेली नाही. अमिरातमध्ये एकूण २ लाख ११ सहस्र पाकिस्तानी नागरिक नोकरी करतात. यामुळे पाकला अब्जावधी रुपयांचे विदेशी चलन मिळते; मात्र आता अमिरातच्या बंदीमुळे यावर परिणाम होणार आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकला यामुळे चांगलाच मोठा फटका बसणार आहे.