लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर दिशानिर्देशांचा काय लाभ ? – सर्वोच्च न्यायालय

जनतेला स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत शिस्तच शिकवली नसल्याने आणि आरोग्यविषयीचे गांभीर्यच न बिंबवल्याने आज कोरोना संकटाच्या वेळी त्याचे दुष्परिणाम उघडपणे दिसत आहेत. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

राजकोटच्या या रुग्णालयात लागली होती आग, ६ रुग्ण मृत्युमुखी पडले !

नवी देहली – बहुतांश लोक मास्कच योग्य पद्धतीने घालत नसतील, तर अशा दिशानिर्देशांचा काय लाभ ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त केली. गुजरातमधील राजकोट येथे कोरोना रुग्णालयातील आगीत ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने ही अप्रसन्नता व्यक्त केली. न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत सुनावणी चालू केली आहे. २७ नोव्हेंबरला या रुग्णालयात आग लागली होती.

१. न्यायालयाने म्हटले की, आम्ही विवाह सोहळे आणि राजकीय सभा पहात आहोत. त्यात ६० टक्क्यांहून अधिक लोक मास्क घालत नाहीत. जे घालत आहेत, त्यांचे मास्क गळ्यातच लटकत आहेत. तुम्हाला समजले पाहिजे की, ही कोरोनाची दुसरी लाट आहे. असेच चालू राहिल्यास पुढे स्थिती आणखी बिघडत जाईल.

२. केंद्र सरकारचे अधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, ‘‘आगीच्या घटनांविषयी आधीच राज्य सरकारांना दिशानिर्देश जारी केले आहेत. आता नव्याने ते जारी केले जातील.’’ त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘‘केवळ दिशानिर्देश ठरवून चालणार नाही, त्यांची कार्यवाहीही आवश्यक आहे. यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा.’’ (हे न्यायालयाला का सांगावे लागते ? केंद्र सरकारला ते कळत का नाही ? कि ‘दिशानिर्देश दिले की, आपले काम संपले’, असे सरकारला वाटते ? – संपादक)