समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना समाजातील लोकांची अपेक्षित प्रगती न होण्यामागील लक्षात आलेले अपसमज !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना समाजातील लोकांची अध्यात्मात अपेक्षित प्रगती न होण्यामागील लक्षात आलेले त्यांच्या मनातील अध्यात्माविषयीचे अपसमज !

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली. ‘समाजातील बरेच जण अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतांचा गांभीर्याने अभ्यास करत नाहीत. अध्यात्मातील अपसमज समजून न घेतल्यामुळे बरीच वर्षे साधना करत असूनही त्यांची अपेक्षित आध्यात्मिक प्रगती झालेली नाही. त्यामुळे ते ‘मोक्षप्राप्ती’ या जीवनाच्या ध्येयापासून पुष्कळ दूर आहेत’, याची काही मला पहायला मिळालेली उदाहरणे आणि त्यांतून मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अधिवक्ता रामदास केसरकर

१. सांप्रदायिक साधना

समाजातील बरेच जण सांप्रदायिक साधना करत आहेत. सांप्रदायिक साधनेच्या मर्यादांमुळे, उदा. बर्‍याच जणांनी एकाच प्रकारची साधना करणे, व्यापकतेचा अभाव यांमुळे अनेक वर्षे साधना करूनही त्यांची अपेक्षित प्रगती झालेली नाही. त्यांना समष्टी आणि व्यष्टी साधना यांतील भेद न कळल्याने ते समष्टी साधनेने जलद गतीने होणार्‍या प्रगतीपासून वंचित राहिले आहेत.

२. संतांच्या नावाचा जप करणे आणि सकाम साधना करणे

कोणत्याही संतांनी आपल्या नावाचा जप करण्यास कधीही सांगितलेले नाही. काही जण स्वतःच्या मनाने एखाद्या उच्च कोटीच्या संतांच्या नावाचा जप करून अनेक वर्षे साधना करत आहेत. आपल्या उपास्यदेवतेच्या नावाचा जप न केल्याने त्यांची अपेक्षित प्रगती झालेली नाही. संतांच्या नावाचा जप केल्याने त्यांना व्यवहारातील अनेक अनुभूती आलेल्या आहेत. ‘अशा अनुभूती आल्याने आपण योग्य साधना करत आहोत’, असा त्यांचा अपसमज झालेला आहे. त्यांना निष्काम साधनेचे महत्त्व ठाऊक नसल्याने ते सकाम साधनेत अडकून रहातात. त्यामुळे त्यांची अपेक्षित प्रगती झालेली नाही.

३. अनुभूतींत अडकणे

काही जण स्वतःच्या मनाने एखाद्या उच्च कोटीच्या संतांच्या नावाचा जप करून अनेक वर्षे साधना करत आहेत. त्यांना चांगल्या अनुभूतीही आलेल्या आहेत; परंतु ‘साधकाने अनुभूतीत न अडकता अनुभूतींच्या पुढे म्हणजे आत्मानुभूतीपर्यंत जायचे असते’, हे त्यांच्या लक्षात न आल्याने ते आयुष्यभर अनुभूतींत अडकून पडतात. बहुतांशी अनुभूती या सकामच असतात. त्यामुळे त्यांची अपेक्षित प्रगती झालेली नाही.

४. स्वतःच्या मनाने गुरूंच्या शोधात अनेक वर्षे भटकणे आणि अयोग्य व्यक्तीला गुरु मानणे

काही साधकांना ‘अध्यात्मात प्रगती करण्यासाठी देहधारी गुरूंची आवश्यकता आहे’, हे ठाऊक असते; परंतु ‘आपण स्वतःच्या मनाने गुरु करू नये किंवा शोधू नये’, हे ठाऊक नसल्याने ते आपल्याच मनाने गुरूंच्या शोधात अनेक वर्षे भटकतात आणि आपल्या साधनेचा अमूल्य वेळ वाया घालवतात. एवढेच नव्हे, तर काही जण स्वतःच्या मनाने कोणालातरी (अयोग्य व्यक्तीला) गुरु मानून त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक वर्षे साधना करत आहेत; परंतु त्यांची अपेक्षित आध्यात्मिक प्रगती झालेली नाही. काही जण स्वतःच्या मनाने ‘ग्रंथ हेच गुरु’, असे मानून अनेक वर्षे साधना (अनेक ग्रंथांचे वाचन) करत असल्याने त्यांची अपेक्षित आध्यात्मिक प्रगती झालेली नाही.

५. साधनेला विरोध करणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाला कंटाळून साधना सोडून देणे

समाजातील काही जण साधनेला विरोध करणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासांसंबंधी अनभिज्ञ आहेत. त्यांना त्या संदर्भात आवश्यक असलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची साधना पुढच्या टप्प्यात न जाता अनेक वर्षे ते साधनेच्या एकाच टप्प्याला अडकून पडले आहेत. काहींनी तर वाईट शक्तींच्या त्रासाला कंटाळून ‘साधना केल्यामुळे त्रास होतो’, असा अपसमज करून घेऊन साधनाच सोडून दिलेली आहे.

६. प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर साधना न करता आध्यात्मिक ग्रंथ वाचून अथवा ‘ग्रंथांचा संग्रह केल्याने आपण पुष्कळ साधना करत आहोत’, या भ्रमात राहून आपला जन्म व्यर्थ घालवणे

काही जण वेगवेगळे आध्यात्मिक ग्रंथ वाचतात अन् ग्रंथांचा मोठ्या प्रमाणावर संग्रहही करतात. ‘तसे केल्याने आपण पुष्कळ साधना करत आहोत’, या भ्रमात राहून ते आपला जन्म व्यर्थ घालवतात. वर्ष १९९५ मध्ये प्रसारसेवेत असतांना मी संभाजीनगर येथे एका व्यक्तीच्या घरी संपर्काच्या सेवेसाठी गेलो होतो. तिच्याशी साधनेच्या संदर्भात बोलतांना तिने मला ती बरीच वर्षे साधना करत असल्याचे सांगितले, तसेच मला तिने वाचलेल्या काही ग्रंथांतील माहिती सांगितली. तेव्हा मी त्यांना ‘आपण नेमकी काय साधना करता ?’, ते सांगा’, असे विचारल्यावर ते मला म्हणाले, ‘‘अहो केसरकर, आपण ज्या खोलीत बसलो आहोत, ही खोली पहा. येथील सगळी कपाटे आध्यात्मिक ग्रंथांनी भरलेली आहेत. ‘या ग्रंथांचे वाचन करणे’, हीच माझी साधना आहे.’’ ते ऐकून अन् त्यांच्यातील अहं लक्षात घेऊन मला त्या वेळी त्यांना काही सांगावेसे वाटले नाही; म्हणून मी त्यांना ‘छान आहे’, असे म्हणून तेथून निघालो.

७. स्वतःच्या मनाने त्यांना आवडणार्‍या देवतेच्या नामजपाची साधना अनेक वर्षे करणे

काही जण नामजपाच्या संदर्भातील अध्यात्मशास्त्राचे मूलभूत नियम लक्षात घेत नाहीत. आपल्याच मनाने आपल्याला आवडणार्‍या देवतेच्या नामजपाची साधना अनेक वर्षे करत असल्याने त्यांची अपेक्षित आध्यात्मिक प्रगती झालेली नाही. ते वैखरी वाणीत काही ठराविक माळा नामजप करतात आणि त्यातच समाधान मानून अनेक वर्षे त्याच टप्प्याला अडकून पडतात. वैखरीच्या पुढील वाणीत, म्हणजे मध्यमा, पश्यंती, परा अशा प्रकारे नामात प्रगती करत पुढे जाण्यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत.

८. अल्पसंतुष्ट राहून अनेक वर्षे एकाच टप्प्याची व्यष्टी साधना करणे

अध्यात्म हे अनंताचे ज्ञान आहे. जिज्ञासा, अभ्यासू वृत्ती, प्रगतीची तळमळ आणि विचारण्याची वृत्ती नसल्याने काही जण अल्पसंतुष्ट राहून अनेक वर्षे एकाच टप्प्याची व्यष्टी साधना करत रहातात. ‘अध्यात्मात आपण खरेच प्रगती करत आहोत का ? केली तर ती किती ?’, इत्यादीसंदर्भात सूक्ष्मातील अचूक कळणारे अन् ते सांगणारे कुणी योग्य मार्गदर्शक न मिळाल्याने त्यांची अपेक्षित आध्यात्मिक प्रगती झालेली नाही.

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥’

– अधिवक्ता रामदास केसरकर, सनातन संस्थेचे कायदेविषयक मानद सल्लागार (२४.१०.२०२०)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक