५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. भार्गवी सरमळकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. भार्गवी सरमळकर एक आहे !

कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्थी (१८.११.२०२०) या दिवशी सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील कु. भार्गवी सीमित सरमळकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले 

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(‘वर्ष २०१७ मध्ये कु. भार्गवी हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

कु. भार्गवी सरमळकर

कु. भार्गवी सरमळकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. ‘कु. भार्गवी नेहमी हसतमुख असते.’

– श्री. सीमित सरमळकर (वडील) आणि श्रीमती सुरुची सरमळकर (आजी)

२. समजूतदारपणा

‘भार्गवीचे बाबा सेवेसाठी वाराणसीला होते. इतर मुलांना बाबा हवेच असतात. बाबा बाहेरगावी असतांना तिने ‘बाबा हवे’, असा हट्ट केला नाही. खरेतर तिचे बाबांवर पुष्कळ प्रेम आहे.

३. तिला पदार्थ बनवायला आवडतात. तिला चवीचेही ज्ञान आहे.

४. कलेची आवड

४ अ. चित्रकलेची आवड : तिला चित्रकला आवडते आणि ती छान चित्रेही काढते. तिच्या चित्रांत देवी-देवता, आश्रम, साधक असेच असते. चित्रांच्या माध्यमातून ती अनुसंधानात असते.

४ आ. नृत्य करण्याची आवड : ती स्वतःला विसरून नृत्य करते. प्रत्यक्षात तिला कुणीही शिकवले नाही; पण ती जे काही हावभाव करते, ते पाहून आश्‍चर्य वाटते, ‘हिला हे कसे काय येते ?’ एकदा सात्त्विक गरबा नृत्याचा प्रयोग चालू होता. त्या वेळी तिने ते पाहून पदन्यास केला. तिने नृत्यातून कविता बनवून एका साधिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘देवच तिला हे सुचवतो’, असे वाटले. तिला एकदा तरी गुरुमाऊलींच्या समोर नृत्य करण्याची इच्छा आहे.’

– श्री. सीमित आणि सौ. तन्वी सरमळकर (वडील-आई)

५. ‘स्वरक्षण (कराटे) प्रशिक्षण, सायकल चालवणे’ हे तिला पुष्कळ आवडते.

६. उत्तम आकलनक्षमता

आश्रमात स्तोत्रपठण चालू होते. त्यातील सर्व स्तोत्रे तिने काही दिवसांत आत्मसात केली.’

– सौ. तन्वी सरमळकर

७. प्रेमभाव

अ. ‘कोणत्याही साधकाशी ती लगेचच जवळीक करते. तिला खाऊ मिळाला, तर ती इतर मुलींना किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींना वाटून खाते. आपली वस्तू इतरांना देण्यामध्ये तिला आनंद वाटतो. आश्रमात कुणाचाही वाढदिवस असला, तरी ती उत्साहाने त्यांच्यासाठी शुभेच्छापत्र बनवते.’ – श्री. सीमित सरमळकर आणि सौ. तन्वी सरमळकर

आ. ‘एकदा माझा कान पुष्कळ दुखत होता. त्या वेळी तिने माझी पुष्कळ काळजी घेतली. माझ्या शेजारीच बसून ती नामजप करत असे. ‘अंथरूण घालणे, मला अल्पाहार देणे, केर काढणे’, अशा सेवा ती करत असे.’ – सौ. तन्वी सरमळकर

८. तिच्या शाळेच्या बाईही तिचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘तिच्या हस्ताक्षरातून तिच्यावरचे संस्कार कळतात.’’

– श्री. सीमित आणि सौ. तन्वी सरमळकर

९. सेवा करण्याची आवड

‘तिला सेवा करायला आवडते. तिला रुग्णाईत साधकांची सेवा करायला आवडते. ‘मला मोठे होऊन डॉक्टर-संत व्हायचे आहे आणि सेवा करायची आहे’, असे ती सांगते.

१०. दळणवळण बंदीच्या काळात आम्ही आश्रमात रहायला आलो. तेव्हा भार्गवी आश्रमजीवनाशी सहजतेने एकरूप झाली.’

– सौ. तन्वी सरमळकर

११. ‘ती नेहमी आई-बाबांचे ऐकते. ती स्वतःच्या चुका फलकावर, तसेच वहीत लिहून क्षमायाचनाही करते आणि प्रायश्‍चित्त घेते.’

– श्री. सीमित सरमळकर आणि श्रीमती सुरुची सरमळकर

१२. ‘ती जेव्हा दुचाकी किंवा चारचाकी यांनी प्रवास करते, तेव्हा ती अखंड नामजप, प्रार्थना आणि स्तोत्र म्हणते.’

– सौ. तन्वी सरमळकर

१३. इतरांना साधना सांगणे

‘आपल्या ताईला ती ध्यान लावायला आणि मंत्र म्हणायला सांगते. तिला सात्त्विक कपडे घालण्यास सांगते आणि स्वतःही तसे आचरण करते. मलाही ती आश्रमातील नियम सांगते.’

– श्रीमती सुरुची सरमळकर

१४. लहानपणापासूनच मनावर राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील प्रेमाचे संस्कार होणे

अ. ‘तिला हिंदु राष्ट्राबद्दल पुष्कळ आकर्षण आहे.

आ. मुंबईला असतांना मी तिकडच्या वसाहतीतील द्वाररक्षकाला ‘जय श्रीराम ।’, असे म्हणायचो. ते तिने ऐकले. तेव्हापासून लहान असतांनाच ती आपल्या शब्दांत ‘जय श्रीराम ।’ असे मोठ्याने म्हणत असे. इतरांनाही तिचे पुष्कळ कौतुक वाटत असे.

इ. लहानपणापासून तिला आम्ही रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या दाखवत होतो अन् त्यांच्याविषयी गोष्टीही सांगत होतो. तेव्हापासून तिच्या मनावर ते बिंबले आहे आणि तिला अशा गोष्टी पुष्कळ आवडतात.’

– श्री. सीमित सरमळकर

१५. आपत्काळाविषयीचा दृष्टीकोन

‘येणार्‍या आपत्काळाविषयी ती म्हणते, ‘‘आई आपण आताच प्रयत्न करूया आणि देवाचे लाडके होऊया.’’

१६. भाव

१६ अ. देवतांप्रतीचा भाव : तिला मानस दृष्ट काढतांना साक्षात् मारुति दिसतो आणि ‘तोच दृष्ट काढत आहे’, असे तिला दिसते. तिला ध्यानमंदिरात देवता सजीव झाल्यासारख्या दिसतात आणि ‘त्या तिच्याशी संवाद साधतात’, असे ती अनुभवते.

१६ आ. संतांप्रतीचा भाव

१६ आ १. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : भार्गवी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांंना पहाण्यासाठी आणि भेटण्यासाठी आतुरलेली असते. त्या जेव्हा तिच्याशी बोलतात, तेव्हा तिला पुष्कळ आनंद होतो. कोणतीही प्रतिमा न ठेवता ती सहजतेने आणि मोकळेपणाने त्यांच्याशी बोलते. हे दृश्य पहातांना मला ‘ती त्यांचीच मुलगी आहे’, असे जाणवते.

१६ आ २. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ : श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यज्ञाच्या वेळी जेव्हा तिला दिसायच्या, तेव्हा ती त्यांच्याकडे पहातच रहायची. त्यांनी एकदा तिचा हात धरला. तेव्हा तिला पुष्कळ आनंद झाला. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या साक्षात् देवी आहेत’, असा तिचा भाव असतो.

१६ आ ३. प.पू. दास महाराज : प.पू. दास महाराज यांना पाहून ती लगेचच त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना नमस्कार करते. एकदा ती ध्यानमंदिरात जात होती. तेवढ्यात समोरून प.पू. दास महाराज आले. ती त्यांना म्हणाली, ‘‘मी त्या मंदिरात चालले आहे; परंतु मला इथेच देव भेटला.’’ हे ऐकून प.पू. दास महाराजांनी तिला लगेच चॉकलेट दिले. तिला त्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१६ आ ४. पू. नीलेश सिंगबाळ : एकदा पू. नीलेशदादांनी तिच्या गालाला हात लावला आणि ‘तू कशी आहेस ?’, असे विचारले. ती धावतच माझ्याकडे येऊन म्हणाली, ‘‘पू. दादांनी माझ्या गालाला हात लावला.’’ त्या वेळी ‘साक्षात् देवाने मला स्पर्श केला आहे’, असा तिचा भाव होता. भार्गवी पू. दादांकडे भेटण्यास जातांना पुष्कळ मायेने बालकभावाने त्यांच्याकडे जात होती. ‘त्या वात्सल्यभावामुळे दादांनी तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आपुलकीने तिच्या गालावर अन् डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.’

– सौ. तन्वी सरमळकर

१७. आश्रमातील वातावरणामुळे पालट होणे

‘तिच्यावर योग्य संस्कार होण्यासाठीच आम्ही मुंबईहून गोव्याला स्थलांतरित झालो आणि ‘आश्रमातील वातावरणामुळे तिच्यात बराच पालट होत आहे’, असे लक्षात आले.

१८. स्वभावदोष

हट्टीपणा, राग येणे, उलट बोलणे, चंचलपणा, अभ्यास न करणे, लहरीपणा आणि  अतीआत्मविश्‍वास’

– श्री. सीमित सरमळकर

‘हे गुरुमाऊली, भार्गवीसारखी साधक-मुलगी दिल्याविषयी आणि सर्व लिखाण लिहून घेतल्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’ – सौ. तन्वी सरमळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२०)


यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक