D.K. Shivakumar On Muslim Reservation : (म्हणे) ‘मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत पालट करणार !’

  • कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे विधान

  • संसदेपासून देशभरात शिवकुमार यांच्यावर होत आहे टीका

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीच्या ‘डायमंड स्टेट्स समिट’ या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकार लागू करणार असलेल्या मुसलमानांच्या आरक्षणावर बोलतांना राज्यघटनेत पालट करण्याचे विधान केले. यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. संसदेतही हे सूत्र उपस्थित करण्यात आल्यावर गदारोळ झाला. राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले की, राज्यघटनेत हे स्पष्ट आहे की, धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही; पण काँग्रेसला राज्यघटना मुसलमानांना आरक्षण द्यायचे आहे.

काय म्हणाले होते डी.के. शिवकुमार ?

डी.के. शिवकुमार यांना कार्यक्रमात मुसलमानांच्याआरक्षणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, बघूया, वाट पाहूया. न्यायालयाकडून कोणताही निर्णय आला, तरी आम्ही काहीतरी प्रारंभ केला आहे. मला ठाऊक आहे की, (मुसलमानांना आरक्षण दिल्यास) सगळेच न्यायालयात जातील. आपल्याला चांगल्या दिवसाची वाट पहावी लागेल, तो दिवस येईल. बरेच पालट होत आहेत, राज्यघटना पालटत आहे आणि असे काही निर्णय आहेत जे राज्यघटना पालटतात.

या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. भाजपने म्हटले की, हे लांगूलचालनाचे राजकारण आहे. काँग्रेस राज्यघटना पालटून मुसलमानांना आरक्षण देऊ इच्छिते. हे बेकायदेशीर आणि राज्यघटना यांच्याविरुद्ध आहे.

लांडग्याचा चेहरा उघड झाला ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, लांडग्याचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांना देशाला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे. त्यांचा दुतोंडीपणा समोर आला आहे.

राज्यघटना कुणीही पालटू शकत नाही ! – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कुणीही पालटू शकत नाही. आम्ही भारताला जोडण्यासाठी काम करतो. ज्यांना भारत तोडायचा आहे, त्यांनी आम्हाला सांगू नये.


हे पण वाचा : Karnataka Muslim Reservation Row : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मुसलमानांना आरक्षण दिल्याच्या सूत्रावरून संसदेत गदारोळ !


माझे विधान भाजप चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहे ! – डी.के. शिवकुमार यांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण वादावर डी.के. शिवकुमार म्हणाले की, प्रसारमाध्यमे चुकीचे वार्तांकन करत नाहीत; मात्र भाजपच चुकीचा उल्लेख करत आहे. तो खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ओळखला जातो. मी म्हणालो की, कधीकधी निर्णयानंतर पालट झाले आहेत. ‘आम्ही राज्यघटना पालटणार आहोत’ असे म्हटले नव्हते. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत. ‘राज्यघटना म्हणजे काय ?’, हे मला ठाऊक आहे. मी म्हणालो की, राज्यघटना पालटतांना असे निर्णय अनेक वेळा घेतले आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंसाठी नाही, तर मुसलमानांसाठी काँग्रेसने यापूर्वीही राज्यघटनेत पालट केले आहेत. शाहबानो प्रकरण यासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यामुळे काँग्रेसकडून असे काही होणे, हे नवीन नाही. सत्तेसाठी काँग्रेसने आणीबाणीच्या काळात राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घुसडले. उद्या काँग्रेस भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ असेही राज्यघटनेत पालट करून घोषित करील. त्यामुळे ही स्थिती येण्यापूर्वीच भारताला हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे !