
१. सूक्ष्मातील जग पहाण्याची ओढ
‘बालपणी मला हिंदु देवतांविषयी काहीच ठाऊक नव्हते. मला केवळ कथेतील पर्या आणि पुस्तके अन् चित्रपट यांतून जादू ठाऊक होती. मला न पाहिलेले (सूक्ष्मातील) जग पहायचे होते. वयाच्या दहाव्या वर्षी एकदा मला माझ्या बाजूला एक परी दिसली होती; परंतु ‘ती खरंच परी होती कि नाही’, हे मला कळले नाही. भगवंताविषयी कधी अनुभूती आली नसल्याने माझा भगवंतावर विश्वास नव्हता; परंतु मी एखाद्या अनुभूतीची अथवा आंतरिक जाणीव होण्याची वाट पहात होते.

२. साधना करण्यापूर्वी साधिकेने सूक्ष्म जगत जाणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या माध्यमातून साधनेला झालेला आरंभ
अ. किशोरवयात माझ्या आजूबाजूला असे काही लोक होते, ज्यांना सूक्ष्मातील कळत होते. मला सूक्ष्मातील कळत नव्हते; परंतु ‘सूक्ष्मातील कसे ओळखायचे ?’, हे शिकण्याची माझी तीव्र इच्छा होती.

आ. ‘नेटल’ (हिंदी नाव : बिछुआ पत्ती) नावाची एक वनस्पती आहे. मी या वनस्पतीची सूक्ष्म स्पंदने अनुभवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘ती संरक्षण देणारी वनस्पती आहे’, असे मला जाणवले आणि सूक्ष्मातून मला संरक्षककवच दिसले. प्रत्यक्षातही या वनस्पतीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असून ती एक गुणकारी वनस्पती आहे. त्यामुळे सूक्ष्म स्पंदनांचा माझा अभ्यास योग्य होता.
इ. एकदा मला मळमळत होते आणि माझे डोकेही दुखत होते; परंतु माझ्याकडे औषध नव्हते. तेव्हा मी निसर्ग आणि वनस्पती यांना प्रार्थना केली अन् माझ्या मनात विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींची पाने खाण्याचा विचार तीव्रतेने आला. त्या वनस्पतीची पाने खाल्ल्यावर मला पुष्कळ बरे वाटू लागले. नंतर ‘आरोग्याच्या दृष्टीने त्या वनस्पतींचे कोणते लाभ आहेत ?’, हे मी पुस्तकात वाचले. तेव्हा मला जो शारीरिक त्रास होत होता, तो न्यून करण्यासाठी ती वनस्पती लाभदायी असल्याचे मला कळले.
ई. मी जादू करणार्या लोकांविषयी ऐकले होते आणि ‘जादू म्हणजे काय ?’, हे जाणून घेण्याचीही मला उत्सुकता होती. त्यासाठी मी एक पुस्तक विकत घेतले. पुस्तक विकत घेतल्यानंतर अगदी एक आठवड्यानंतरच मला एका आध्यात्मिक संकेतस्थळाविषयी कळले आणि मी नामजप करण्यास आरंभ केला. नंतर मला जाणीव झाली की, ‘गुरुतत्त्वानेच मला अयोग्य मार्गाकडे जाण्यापासून वाचवले आणि साधनेच्या योग्य मार्गावर आणले.’
३. साधनेला आरंभ केल्यावर ईश्वराविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे
अ. साधनेला आरंभ केल्यावर मी एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. तेव्हा मी साधकांकडून देवतांच्या कथा ऐकत असे. यातूनच देवतांविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा माझ्या मनात निर्माण झाली.
आ. ज्यांना ईश्वराकडून ज्ञान मिळते, अशा साधकांना मी भेटले. त्यांना ‘ईश्वराकडून ज्ञान कसे मिळते ? आणि ‘ते ईश्वराशी कसे बोलतात ?’, यांविषयी मी जाणून घेतले. ‘मला ज्ञान मिळेल’, असे मला कधी वाटले नव्हते; परंतु ‘ईश्वराकडून ज्ञान कसे मिळते ? किंवा ईश्वराशी अनुसंधान साधणे कसे असते ?’, याची मला जिज्ञासा होती. मला ईश्वराच्या जवळ जाण्याची, ईश्वराला प्रत्यक्ष पहाण्याची अन् बोलण्याची आंतरिक तळमळ लागली होती.
४. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यापूर्वी आश्रमात झालेल्या ‘नरसिंहयागा’च्या वेळी सूक्ष्मातून नरसिंहदेवाचे दर्शन होणे
वर्ष २०२१ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘नरसिंहयाग’ झाला. त्या वेळी प्रथमच मला सूक्ष्मातून दृश्य दिसले होते. अग्नीच्या ज्वाळा मुखातून बाहेर पडणार्या नरसिंहदेवाचे रूप मला दिसले होते. ‘माझी ही कल्पना असेल’, असे वाटून आरंभी मी याकडे दुर्लक्ष केले; परंतु सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्ती साधिका सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण मला दिलेल्या दृश्याशी अगदी मिळतेजुळते होते, तेव्हा ‘मला ईश्वरानेच हे दृश्य दाखवले आहे’, याची जाणीव झाली. आरंभी माझे परीक्षण मानसिक आणि भावाच्या स्तरावर होते.
५. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर
काही दिवसांतच माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. त्यानंतर माझ्या सूक्ष्म-चित्रांची गुणवत्ता सुधारली, तसेच ईश्वराकडून मला अधिक ज्ञान मिळू लागले.
६. सूक्ष्म परीक्षण करण्यापूर्वी जिज्ञासेपोटी त्या विषयाचा अभ्यास करणे
सूक्ष्म परीक्षण करण्यासाठी मला हिंदु धर्मातील एखादा विषय सांगितला जातो अथवा सूक्ष्म-चित्र काढण्यासाठी एखादा विषय सांगितला जातो. तेव्हा जिज्ञासेपोटी मी त्या विषयाचा अभ्यास करते. पूर्वी सूक्ष्म परीक्षण करतांना मी मला ठाऊक असलेल्या माहितीचा वापर करायचे. त्यामुळे सूक्ष्म परीक्षणाच्या सत्यतेवर परिणाम व्हायचा. आता मी तसे करत नाही.
७. साधिकेची सूक्ष्मातील दिसण्याची, तसेच जाणण्याची प्रक्रिया
अ. खरेतर डोळे बंद केल्यावर ज्यांना सूक्ष्मातील दिसते, अशा व्यक्तींमध्ये मी अंतर्भूत नाही. मी जेव्हा भाव ठेवते अथवा ईश्वराशी बोलते, तेव्हाच मला सूक्ष्मातील काही दिसते. कधी कधी मी ईश्वराला प्रश्न विचारते आणि ईश्वर एखादे दृश्य दाखवून मला त्याचे उत्तर देतो.
आ. कधी कधी ‘एखाद्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे सूक्ष्म परीक्षण करावे’, असा विचार माझ्या मनात येतो. त्या वेळी ‘मला सूक्ष्मातून काहीतरी दिसावे’, हे देवाचेच नियोजन असल्याने मला सूक्ष्मातील सहजतेने दिसते. ते ठिकाण जर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमासारखे एखादे सात्त्विक ठिकाण असेल, तर मला त्या ठिकाणी देवता अथवा सात्त्विक गाेष्टी सहजतेने दिसतात.
इ. काही वेळा, विशेषतः युनायटेड किंगडम येथे रहात असतांना मला कधी कधी अनिष्ट शक्ती दिसतात, उदा. आमच्या घरात एका पूर्वजांचे रेखाचित्र आहे, त्यात ‘ते पूर्वज बांधले गेले असून ते किंचाळत आहेत’, असे मला दिसते.
८. ‘ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ असल्याने साधिकेला सूक्ष्मातील ज्ञान मिळते’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगणे
एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘मला सूक्ष्मातील ज्ञान का मिळते ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘तुला ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ असल्याने तुला सूक्ष्मातील ज्ञान मिळते.’’ यातून ‘तळमळ असणे किती महत्त्वाचे आहे’, हे मला शिकायला मिळाले. ‘सूक्ष्मातील कळणे’, हे भगवंताने मला दिलेले वरदानच आहे. भाव आणि तळमळ असेल, तर ईश्वराकडून ज्ञान मिळते आणि ते भक्तीच्या स्तरावरील असते.
‘परात्पर गुरुमाऊली, तुम्ही मला हे वरदान दिले आहे, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. तुम्हाला अपेक्षित असा या क्षमतेचा वापर करता यावा, यासाठी तुम्हीच मला साहाय्य करा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करते.
– विदेशातील एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे), ४.३.२०२४
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |