‘नाटो’चे माजी कमांडर रिचर्ड शिरेफ यांचा दावा
(नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना.)

लंडन (ब्रिटन) – रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिका हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर एका ब्रिटीश जनरलने तिसर्या महायुद्धाची चेतावणी दिली आहे. नाटोचे माजी कमांडर रिचर्ड शिरेफ म्हणाले की, जोपर्यंत रशिया त्याच्या विस्तारवादी धोरणावर कायम रहातो, तोपर्यंत कायमस्वरूपी शांतता शक्य नाही.
शिरेफ म्हणाले की, जर आपण रशियाला रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत, तर दोन वर्षांत युद्ध चालू होईल, असे माझे भाकित आहे. ते म्हणाले की, अनेक युरोपीय देशांनी युक्रेनमध्ये शांती सैनिक पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांचे उपराष्ट्रपती यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका कोणतीही सैनिकी हमी देणार नाही.
शिरेफ पुढे म्हणाले की, युरोपकडे रशियाशी थेट सामना करण्यासाठी २ वर्षे आहेत. पुतिन यांचे ध्येय बल्गेरियापासून पोलंडपर्यंतच्या पूर्व प्रदेशाला एका नवीन रशियन साम्राज्यात एकत्र करणे आहे.