‘हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती, कुर्ला (पश्चिम)’ यांच्या वतीने कुर्ला (मुंबई) येथे हिंदु दिनदर्शिकेचे प्रकाशन !

साधना करून ईश्वरप्राप्ती करणे हा मनुष्यधर्म ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

मुंबई – प्रत्येक वस्तूने आणि पशू-पक्षांनी कसे वागावे, कसे आणि कुठे रहावे, हे भगवंत ठरवतो आणि तोच त्या वस्तू आणि पशू-पक्षांचा धर्म असतो. त्याप्रमाणे साधना करून ईश्वरप्राप्ती करावी, मोक्षाला जावे, हा मनुष्याचा धर्म म्हणजेच कर्तव्य आहे, असे विधान भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी कुर्ला येथे ‘हिंदू दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्या’त केले. हिंदूंना हिंदु वर्षाचे महिने, तिथी, सण यांची माहिती व्हावी, यासाठी हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम) यांच्या वतीने यंदा पहिल्यांदाच हिंदु मासांप्रमाणे दिनदर्शिका सिद्ध करण्यात आली असून २३ मार्च या दिवशी कुर्ला (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी ‘उत्सव हिंदुत्वाचा, उत्सव कुर्ल्याचा’ या दिनदर्शिकेचा दिमाखदार प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

हिंदु दिनदर्शिकेविषयी बोलतांना ते म्हणाले,…

१. ख्रिस्ती कॅलेंडर हे केवळ कालगणनेसाठी सिद्ध करण्यात आले असून हिंदु पंचांग कालयोजनेसाठी आखले जाते. ख्रिस्ती कॅलेंडरमध्ये वर्षाचे ३६५ दिवस १२ महिन्यांत मांडण्यासाठी काही महिने ३०, तर काही महिने ३१ दिवसांचे करण्यात आले आहेत, ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

२. हिंदु मासात मात्र साधारणतः ३० दिवस असतात. यातील प्रत्येक दिवसाचे स्वतंत्र व्यक्तीमत्त्व आणि महत्त्व असते. हिंदु कालयोजनेनुसार सिद्ध करण्यात आलेली दिनदर्शिका ही हिंदूंसाठी अभिमानास्पद आहे.

दीपप्रज्वलन करतांना सर्वेश्वर नगरचे संघचालक श्री. प्रभाकर परांजपे आणि भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे

कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी कयपंजीने दीपप्रज्वलन केले. या वेळी व्यासपिठावर सर्वेश्वरनगरचे संघचालक श्री. प्रभाकर परांजपे उपस्थित होते. दिनदर्शिकेसाठी विज्ञापन आणि अर्थसाहाय्य करणार्‍या दात्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. देशभरात नावलौकिक कमावलेल्या गोरखनाथ महिला गोविंदा पथक या देशातील पहिल्या गोविंदा पथकाचाही या वेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रपुरुषांच्या कथा, जीवनचरित्रे आणि शौर्यकथांच्या ग्रंथांचे प्रदर्शन अन् विक्री केंद्र प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी लावण्यात आले होते. हिंदु मासांच्या वैशिष्ट्यपूर्ण नावांची रचना करून व्यासपिठाजवळ भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. यंदा प्रथमच हिंदु दिनदर्शिका सिद्ध करण्यात आल्याने प्रकाशन सोहळ्याला हिंदु धर्मातील ज्येष्ठ आणि ज्ञानी सत्पुरुषांचा आशीर्वाद लाभावा, यासाठी आयोजकांनी सध्या सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची आश्रमात जाऊन भेट घेतली आणि त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. कार्यक्रमाच्या आरंभी राष्ट्र-धर्म यांवरील गीतांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचा आरंभ ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आणि समारोप संपूर्ण ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताने करण्यात आला.

नव्या पिढीला माहिती कळावी, यासाठी हिंदु दिनदर्शिकेची संकल्पना राबवली ! – किरण दामले, कार्यवाहक, हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम)

प्रतिवर्षी येणारे सण ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे मागे-पुढे होतात. यात आपल्या सणांची चूक नसून आपल्या सणांनाच आपण चुकीच्या कॅलेंडरमध्ये गुंतवले आहे. त्यामुळे आताच्या पिढीला हिंदु महिन्यांची नावेसुद्धा ठाऊक नाहीत. निदान पुढच्या पिढीला आपले हिंदु महिने, तिथी आणि तिथीनुसार येणारे प्रत्येक सण कोणत्या हिंदु मासात येतात हे कळण्यासाठी प्रथमच हिंदु दिनदर्शिकेची संकल्पना राबवण्यात आली असून ही दिनदर्शिका हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने अधिकाधिक घरात पोचवावी, असे आवाहन हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला (पश्चिम)चे कार्यवाहक श्री. किरण दामले यांनी केले. गुढीपाडव्यानिमित्त असलेल्या नववर्ष स्वागतयात्रेला उपस्थित रहाण्याचेही त्यांनी आवाहन केले.