‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळाल्याविषयी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मान्य !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार’ मिळणे, हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील सर्वोच्च आनंद, समाधान अन् भाग्य यांचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझे दायित्व वाढले असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे हाच माझा धर्म आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा ‘आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्राप्त झाल्याविषयी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्या वेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की,…

१. मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणारे वारकरी, शेतकरी अन् माझ्या लाडक्या बहिणी अन् लाडक्या भावांचा आहे, असे मी मानतो.

२. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करण्यासाठी आणखी बळ मिळो, अशी प्रार्थना मी करतो.

३. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या संत तुकाराम महाराजांच्या ओळी मला प्रिय आहेत. एखाद्याने जीव लावला, विश्‍वास टाकला, तर त्याला कमरेची लंगोटीही सोडून द्यायची आणि एखाद्याने दगाफटका केला, तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच तुकाराम महाराजांची शिकवण मी आयुष्यभर जपली.

वारकर्‍यांच्या हितार्थ केलेली कार्ये !

उपमुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले की, वारकरी बंधूंचा विचार करून इतिहासात प्रथमच आमच्या काळात वारकर्‍यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिले. वारकरी विमाछत्र योजनेत वारकर्‍यांचा विमा काढण्यात आला, वारीमध्ये लाखो वारकर्‍यांची आरोग्य पडताळणी करण्यात आली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचे कामही मार्गी लागले. विठुरायाच्या दर्शन रांगांसाठी आपण तात्काळ निधी दिला. मंदिर हेच संस्काराचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळेच ‘ब’ श्रेणीतील तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपण २ कोटी रुपयांवरून थेट ५ कोटी रुपये केला. प्रथमच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. पंढरपूरला ‘व्हीआयपी’ (विशेष महनीय व्यक्ती) ताफा बाजूला ठेवून दुचाकीवरून फिरलो. हे साहाय्य म्हणजे काही उपकार नव्हेत; कारण वारकरी संप्रदायाचे या समाजावरील उपकार कुणी ७ जन्म घेतले, तरी फेडू शकणार नाही. हा पुरस्कार मला कोणत्याही पदाहून पुष्कळ मोठा आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटीबद्ध होतो, आहे आणि सदैव राहीन.