यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी साहित्यांवरील बहिष्कारामुळे यंदा दिवाळीत भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री

भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

नवी देहली – किरकोळ व्यापार्‍यांची संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी दिवाळीमध्ये भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री झाली, तर चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनामुळे भारतीय उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार देशातील ३० शहरांमधून केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या शहरांमध्ये देहली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर, लक्ष्मणपुरी, कर्णावती, जयपूर, जम्मू आदींचा समावेश होता. भारतीय उत्पादनांच्या झालेल्या विक्रीमध्ये विशेषतः विजेची उपकरणे, स्वयंपाकाचे साहित्य, मिठाई, घरगुती सजावट, चपला, घड्याळे आदींचा समावेश आहे. या संघटनेने पुढे असेही म्हटले आहे की, चीनी उत्पादनांवरील बहिष्काराचे प्रमाण वाढवत नेऊन डिसेंबर २०२१ पर्यंत साधारण १ लाख कोटी रुपयांपर्यंतचे आयात न्यून करणार आहोत.