वैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास

आपला भारत देश म्हणजे ज्ञानाची आणि ज्ञानोपासकांची भूमी आहे. अनेक अभ्यासक, समाजहितैच्छुक ऋषितुल्य अशा अनेकांनी या भूमीत जन्म घेतला आणि त्यांनी त्यांच्या कार्य-कर्तृत्वाने देशाचे नाव त्रिखंडात विख्यात केले. अशा सुजनांनी केवळ देश म्हणून भारताकडे पाहिले नाही, तर आपली आई म्हणून अतिशय आत्मीयतेने भारत देशाकडे पाहिले आणि तिची सेवा निःस्वार्थ भावाने केली. अशा या निःस्पृह वृत्तीधारकांच्या मांदियाळीत साजेल, असे एक नाव म्हणजे पंडित शिवकर बापूजी तळपदे !

इंग्रजांच्या शासनकाळात वेदांच्या अध्ययनातून स्फूर्ती घेत, शिल्पशास्त्रातील साधन खंडातील ‘अग्नियानशास्त्र’ या प्राचीन विमानविद्येशी संबंधित शास्त्राचे संशोधक, पुनरुद्धारक आणि त्या शास्त्राला समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र झटणारे अभ्यासक म्हणून पंडित तळपदे ज्ञात आहेत. तळपदे यांच्या कार्यामागे त्यांची अहर्निश अशी ज्ञानोपासना आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याची अमूल्यता, बहुविधता आणि गौरव हा त्यांनी केलेली अथक अभ्यास अन् परिश्रम यांना जाणल्यावाचून आपल्यापर्यंत पोचू शकत नाही. त्यांच्याविषयीची माहिती येथे देत आहोत.

बालपण आणि अध्ययन

प्रगतीशील अशा पाठारे प्रभु समाजात वर्ष १८६४ मध्ये मुंबईत शिवकर तळपदे यांचा जन्म झाला. शिवकर यांच्या मनात बालपणापासूनच असीम राष्ट्रप्रेमाचे बीज रूजलेले दिसते. पुढे राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या ध्येयासक्त तळपदे यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर स्वतःचे उत्तरदायित्व सांभाळत अध्ययनसाधना आजन्म चालू ठेवली. त्यांना ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्’चे कला शिक्षक पंडित चिरंजीलाल वर्मा यांनी कलेसमवेतच वेदविद्येचेही धडे द्यावयास प्रारंभ केला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या वेदांतून दिसून येणार्‍या विज्ञानाचे विवेचन अतिशय सखोल पद्धतीने पंडित वर्मा आपल्या विद्यार्थ्यांना करत असत.

वेदाध्ययन करण्याची जिज्ञासा

पंडित चिरंजीलाल वर्मा यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या तळपदे यांच्या मनात वैदिक काल आणि तत्समयी असणारा विज्ञानविषयक दृष्टीकोन हे पूर्णांशाने बिंबले गेले अन् ते वेदविद्येच्या स्वयं अध्ययनासाठी प्रवृत्त झाले. त्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘ऋग्वेद-प्रथमसूक्त आणि त्याचा अर्थ’ या पुस्तकात त्यांचा वेदांचे अध्ययन करण्याची पद्धती अन् वेदांकडे पहाण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. ऋग्वेदाच्या प्रथम सूक्तातील ९ ऋचांवर मराठी भाषेमधे त्यांनी केलेले भाष्य म्हणजे त्यांचे हे पुस्तक होय. स्वामी दयानंद यांनी ऋषिप्रणीत पद्धतीने वेदमंत्रांचे अर्थ नैरुक्तिक शैलीने अर्थात् शब्दाच्या मूळाशी जात अर्थ समजून घेणे, हे स्पष्ट केले. त्या आर्य परंपरेला अवलंबून वेदांचा अर्थ कसा समजून घ्यायचा, याचा जणूकाही वस्तुपाठ म्हणजे पंडित तळपदे यांचे ऋग्वेदाच्या प्रथम सूक्तावरील भाष्य आहे.

श्री. विजय उपाध्याय

अध्यापकाची भूमिका आणि विमानविद्याविषयक प्रयोगाचा संकल्प

लौकिक अर्थाने आपले अध्ययन संपल्यानंतर पंडित तळपदे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे कार्य करू लागले. आपल्या अध्यापनाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकीच एक म्हणजे वेदांचे मराठीत विज्ञाननिष्ठ निरुपण करणारे पंडित श्रीपाद दा. सातवळेकर होत. विद्यार्थीप्रिय आणि अभ्यासू अशा तळपदे यांच्या व्यक्तीमत्त्वाने प्रभावित झालेल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे प्राचार्य जॉन ग्रिफिथ यांनी विजापूरचे सर्वेक्षण आणि अजंठा येथील गुफांमधील चित्रांचे अध्ययन अन् जतन कार्य यांसाठीच्या आपल्या मोहिमांमध्ये सहकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली.

अध्यापनाचे कार्य करत असतांनाच पंडित तळपदे यांनी गुरु पंडित चिरंजीलाल वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय शास्त्रांचे अध्ययन करण्यास प्रारंभ केला. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या नैकविध ग्रंथसंपदेतून विमानविद्या विषयक मूलभूत सिद्धांत त्यांनी सखोल अभ्यासले. तसेच त्यांनी चारही पंडित , ब्राह्मणग्रंथ, आरण्यक, उपनिषद्, ६ वेदांग, ६ उपांग (दर्शनशास्त्र) यांचे उपवेदांसह अध्ययन केले. या सगळ्या काळात विमानविद्याविषयक प्रयोग करण्याचा त्यांचा संकल्प अधिकाधिक दृढ होत गेला. प्राचीन संस्कृत साहित्यातून या विद्येचा अभ्यास करत असतांना त्यांनी पश्‍चिमेकडील देशांमध्ये विमानविद्येविषयक होणारे प्रयोगही सविस्तर अभ्यासले. स्वतःचे अध्ययन एकांगी राहू नये, आपण आपल्या विषयामध्ये जास्तीत जास्त अद्ययावत ज्ञान आत्मसात केले पाहिजे, ही दृष्टी त्यांना होती. या सर्व अध्ययनाचा परिपाक म्हणजे त्यांनी स्वयं अध्ययन आणि विविध प्रयोगांसाठी वर्ष १८९२ मध्ये उभारलेली प्रयोगशाळा होय.

विमानविद्येवर संशोधन

वेदमंत्रांवर सखोल चिंतन करून त्यांचा वैज्ञानिक अर्थ स्पष्ट करत प्रायोगिक तत्त्वावर त्याची सिद्धता पडताळणे, अशा पद्धतीने पंडित तळपदे संशोधन कार्य पुढे नेत होते. या पद्धतीने दिवस-रात्र प्रयत्नशील रहात त्यांनी विमानाचे एक प्रतिमान (मॉडेल) सिद्ध केले. त्यांनी म्हात्रे नामक मित्रद्वयांद्वारे त्या मॉडेलचे एक चित्र ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या प्रदर्शनात ठेवले होते. त्यांची ‘प्राचीन विमानकलेचा शोध’ या विषयावरील ३ व्याख्याने खूप गाजली. करवीरपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘विद्याप्रकाशवारिधि’ ही उपाधी देऊन त्यांच्या विद्वत्तेचा यथोचित गौरव केला. विमानाचे केवळ मॉडेल न बनवता ते उडण्यासाठी सज्ज करणे, त्यासाठी अधिक संशोधन करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी धन जमवणे आदी सर्व एका व्यक्तीच्या सामर्थ्यातील कार्य नव्हते; परंतु त्यांनी नियोजित केलेल्या या कार्यासाठी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य प्राप्त झाले नाही, हे वास्तव आहे.

‘मरुत्सखा’ विमानाचे प्रायोगिक परीक्षण

‘मरुत्सखा’ विमानाचे संग्रहित चित्र

उत्साही माणसांना असाध्य असे काही नसते. आपल्या ध्येयमार्गावर ते चालू लागले की, त्यांना यशाची द्वारे खुली होतात. त्याचीच एक प्रचीती म्हणून वर्ष १९१५ मध्ये त्यांच्या या कार्याच्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यात एक मोठा टप्पा आला. बेंगळुरू येथील शंकराचार्यांच्या परंपरेतील पंडित सुब्राय शास्त्री या नावाचे स्वामी पंडित तळपदे यांच्या संपर्कात आले. ते प्राचीन शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचे चांगले जाणकार होते. त्यांनी तळपदे यांना महर्षि भारद्वाज कृत ‘यन्त्रसर्वस्व’, ‘अंशुबोधिनी’, ‘आकाशतन्त्र’ आदी प्राचीन विमानविद्या संबंधित भौतिकशास्त्रे शिकवली. त्यांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे पंडित तळपदे यांनी पंडित सुब्राय शास्त्रींसह वर्ष १९१५ ते १९१७ या कालावधीत मुंबईतील गिरगाव चौपाटीवर त्यांनी निर्मिलेल्या ‘मरुत्सखा’ नामक विमानाचे प्रायोगिक परीक्षण केले. या परीक्षणानंतर पंडित तळपदे यांनी या विमानावर अधिक संशोधन करावयास प्रारंभ केला. या काळातच त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आणि परिणामस्वरूप त्यांचे आरोग्य खालावू लागले; पण असे असले, तरी संशोधनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. अखेरीस १७ सप्टेंबर १९१७ या दिवशी त्यांनी नश्‍वर देहाचा त्याग करत आपली इहलोकीची यात्रा समाप्त केली.

पंडित तळपदे यांचे संशोधनाखेरीज इतर कार्य

विमानविद्येच्या अध्ययनाच्या ध्यासासह पंडित तळपदे यांची बुद्धी अनेक विषयांच्या चिंतनात आणि लेखनात रमू लागली. वेदांचे पठण आणि अध्ययन हेतू पंडित वर्मा यांनी चालू केलेल्या ‘वेद-धर्म प्रचारिणी सभे’ची धुरा त्यांच्या मृत्यू पश्‍चात पंडित तळपदे यांनी निष्ठेने अन् समर्थपणे वाहिली. या संस्थेच्या वतीने ‘वेदविद्याप्रचारणीनी पाठशाळा’ चालवली जात असे. तिचे मंत्री म्हणूनही ते काम पहात. ‘शामराव कृष्ण आणि मंडळी’ यांनी प्रकाशित केलेल्या ‘आर्य-धर्म पत्रिके’चे संपादक म्हणून तळपदे यांनी काम पाहिले. ‘ऋग्वेद-प्रथमसूक्त आणि त्याचा अर्थ’ आणि ‘प्राचीन विमानकलेचा शोध’, ही मराठी भाषेतील दोन, ‘योगदर्शनांतर्गत शब्दों का भूतार्थ दर्शन’ आणि ‘मन और उसका बल’ ही हिंदी भाषेतील दोन पुस्तके, तर गुजराती भाषेत गायत्री मंत्राचे रहस्य उलगडवून दाखवणारा ‘गुरुमंत्रमहिमा’ नावाचा ग्रंथ आदी लेखन त्यांनी केले आहे. त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा भाषांचे आकलन असल्याने ते बहुभाषाविध होते. त्यांचा स्वभाव शास्त्र आणि त्यासंबंधीचे विषय यांचे सखोल चिंतन करण्याचा असल्याने ते बहुश्रुत होते. त्यांचा व्यासंग दांडगा होता. अशा या बहुआयामी पंडित तळपदे यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

लेखक – लीना हुन्नरगीकर आणि श्री. विजय प्रसाद उपाध्याय

(लेखाच्या लेखिका-लेखक दोघेही पंडित तळपदे यांच्या वेदविद्येशी संबंधित पुस्तकाचे संपादन करत आहेत.)