साधनेच्या बळावर आपत्काळाला सहजतेने सामोर्‍या जाणार्‍या पू. माई !

‘साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रासाच्या निवारणार्थ त्यांच्यासाठी नामजपादी उपाय करण्यासाठी प.पू. दास महाराज रामनाथी आश्रमात वास्तव्यास आहेत. ते गुरुआज्ञा म्हणून आश्रमात गेले, तर बांदा पानवळ येथील श्री गौतमारण्य आश्रमाची देखभाल आणि श्रीराम पंचायतन मंदिराचे नित्योपचार करण्यासाठी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई) आश्रमात थांबल्या.

पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (माई)

१. पू. (सौ.) माईंनी जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव आधीच करून ठेवणे आणि साधकांना ‘या आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करा’, असे सांगणे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दळणवळण बंदी झाली. पू. (सौ.) माईंनी स्थानिक साधकांच्या साहाय्याने जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमव आधीच करून घेतली होती. पू. (सौ.) माईंनी सांगितले, ‘‘आपत्काळ येणार आहे’, हे गुरुमाऊलींनी आधीच सांगितले होते.’’ त्यांना कोणताही ताण येत नाही किंवा त्या विचलितही होत नाहीत. ‘त्या या वयात केवळ त्यांची ‘आधात्मिक साधना आणि गुरुमाऊलींवर असणारी श्रद्धा’ यांमुळेच हे सर्व करू शकतात’, असे वाटते. त्यांना कधी भ्रमणभाष केला, तर त्या आमचीच विचारपूस करतात आणि आम्हाला सांगतात, ‘‘या आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करा.’’

श्री. संदेश गावडे

सौ. साधना गावडे

२. प.पू. दास महाराज यांच्या अनुपस्थितीत बांदा, पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने आणि भावपूर्णरित्या साजरा करणे 

२ अ. ‘श्रीरामाला माझ्याकडून जशी सेवा करून घ्यायची असेल’, तशी तो करून घेईल’, या भावाने पू. (सौ.) माईंनी श्रीरामनवमी उत्सवाची सिद्धता करणे : श्री गौतमारण्य आश्रमात श्रीरामनवमी हा उत्सव प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली (सगळे साधक आणि स्थानिक श्रीराम भक्त) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या उत्सवाची सिद्धता १५ ते २० दिवस आधीपासूनच चालू होते; परंतु या वर्षी ‘कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि दळणवळण बंदी’, यांमुळे ‘या वर्षींचा श्रीरामनवमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करायचा’, असे ठरले. ‘हा उत्सव चालू झाल्यापासून या उत्सवाला प.पू. दास महाराज उपस्थित नाहीत’, असे कधी झाले नव्हते. या वर्षी दळणवळण बंदी असल्याने प.पू. दास महाराज श्रीरामनवमी उत्सवाला येणे अशक्य होते, तरी पू. (सौ.) माई जराही विचलित झाल्या नाहीत. त्या म्हणाल्या, ‘‘श्रीरामाला त्याची सेवा माझ्याकडून जशी करून घ्यायची असेल, तशी तो करून घेईल आणि प.पू. दास महाराज यांची रामनाथी आश्रमात अधिक आवश्यकता असेल; म्हणून देवाने तसे नियोजन केले आहे.’’

२ आ. पू. (सौ.) माईंनी सहजतेने श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करणे : पू. (सौ.) माईंनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा अत्यंत काटकसरीने वापर करून श्रीरामनवमी उत्सवाचे सर्व विधी या वर्षीही अत्यंत नियोजनबद्ध अन् भावपूर्ण वातावरणात साजरे केले. त्यांचे हे सहजतेने करणे पाहून ‘त्यांचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा आहे !’, हे लक्षात येते.

३. भाव

३ अ. आरती करतांना आर्त भावाने देवाला आळवणे : पू. (सौ.) माई प्रतिदिन संध्याकाळी आरती करतांना देवाला ओवाळतात. तेव्हा ‘समोरील देवता त्यांची आरती स्वीकारत आहे’, असे जाणवते. त्या आरती करतांना देवाशी पूर्णपणे एकरूप झालेल्या असतात आणि आर्त भावाने देवाला आळवत असतात.

३ आ. पू. (सौ.) माई सर्वांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना करत असणे : संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानात देवाकडे ‘अवघ्या विश्वाचे कल्याण होवो’, असे मागणे मागतात. पू. (सौ.) माई देवाकडे स्वतःसाठी काहीही न मागता ‘आलेली आपत्कालीन स्थिती लवकरात लवकर दूर होऊ दे. परात्पर गुरुदेवांचा महामृत्यूयोग टळू दे. हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे. सर्व साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होऊन त्यांची साधना चांगली होऊ दे’, अशी मागणी देवाकडे करतात. त्यांचा आध्यात्मिक अधिकार त्यांच्या सहज वागण्यातून लक्षात येत नाही. आमच्यावर श्री गुरुदेवांच्या असलेल्या असीम कृपेमुळेच आम्हाला अशा थोर संतांचा सहवास मिळतो.

‘प.पू. दास महाराज सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढा देण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले आहेत, तर पू. (सौ.) माई स्थूल देहाने आश्रमातील नित्यक्रम करत असतात आणि सूक्ष्म देहाने श्रीगुरुचरणी लीन होऊन साधना करतात’, असे आम्हाला जाणवते. ‘गुरुदेवा, आमच्या साधनेसाठी आवश्यक ते गुण त्यांच्याकडून आम्हाला आत्मसात करता येऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री गुरुचरणी लीन होण्यास आतुर असलेले,

श्री. संदेश विष्णु गावडे आणि सौ. साधना संदेश गावडे, कारीवडे, सावंतवाडी (२२.४.२०२०)


सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक