(परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती)
१. जन्मोत्सवाच्या आधी आलेल्या अनुभूती
१ अ. किन्नीगोळी येथील संत प.पू. देवबाबा यांच्याकडे सेवा करत असतांना ‘श्रीरामा’चा नामजप आपोआप चालू होणे आणि त्यामुळे मनाला आनंद मिळणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या काही दिवस आधी, म्हणजे एप्रिल २०१९ मध्ये मला किन्नीगोळी येथील प.पू. देवबाबांकडे सेवेला जाण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे सेवा करतांना माझा श्रीरामाचा नामजप आपोआप चालू झाला होता. सेवा करतांना माझा तो नामजप कधी वैखरीतून, तर कधी मध्यमा वाणीत होत असे. त्या वेळी माझ्याशी कोणी बोलायला आले, तर माझ्या मनात नामजपाचे शब्द नसायचे; परंतु तरीही ‘नामजप कोणत्या तरी वेगळ्याच स्थितीत चालू आहे आणि त्यातून माझ्या मनाला आनंद मिळत आहे’, असे मला जाणवत होते. ही स्थिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे अजूनही टिकून आहे.
१ आ. मनात नकारात्मक विचार येत असतांना श्रीरामानेच त्या स्थितीतून बाहेर काढल्याचे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या एक आठवडा आधी मला पुष्कळ मानसिक त्रास होत होता. ‘मला साधना करता येणार नाही. मी सर्व सोडून देतो’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात येत होते. काही साधक मला समजावण्याचा प्रयत्न करत होते, तरीही ते विचार अल्प होत नव्हते; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आतून माझा श्रीरामाचा सतत जप चालू होता. ‘त्यामुळे मला रामरायानेच त्या स्थितीतून बाहेर काढले आहे’, असे वाटले.
१ इ. राजमातंगी यागाच्या वेळी छातीचा भाग अचानक लाल होणे आणि ‘ते चांगल्या शक्तीचे लक्षण आहे’, असे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकूंनी सांगणे : याच कालावधीत रामनाथी आश्रमात राजमातंगी याग होता. यागाची पूर्णाहुती झाली आणि ‘माझा छातीचा भाग अचानक लाल झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. याविषयी मी सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांना विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हे चांगल्या शक्तीचे लक्षण आहे आणि अनाहतचक्रातून चांगली शक्ती बाहेर पडत आहे.’’
१ ई. यज्ञाच्या आरंभास विलंब झाल्यास होणारी चिडचिड अल्प होऊन मन वर्तमानात स्थिर रहाणे : पूर्वी यज्ञ चालू होण्यास उशीर झाला की, माझ्या मनाची चिडचिड व्हायची; परंतु ‘या कालावधीत ‘यज्ञ कधी चालू करायचा आणि कधी संपवायचा ?’ हे सर्व देवाचे नियोजन आहे’, असे मनाला वाटते. त्यामुळे आता मला वर्तमानात राहून स्थिर रहाता येते आणि मनाची विचार प्रक्रियाही पालटली आहे.
२. जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कौतुक केल्यावर गुरुदेवांमधील कृपाळूपणा लक्षात येऊन भावजागृती होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी माझे इतर पुरोहितांकडे कौतुक केले आणि म्हणाले, ‘‘सिद्धेश श्री. दामोदर वझेगुरुजींसारखे छान भावपूर्ण मंत्र म्हणायला लागला आहे. इतरांनीही त्याच्यासारखे प्रयत्न करावेत.’’ गुरुदेवांचे हे कौतुकाचे बोल ऐकल्यावर ‘माझे प्रयत्न अत्यल्प होतात; ते तरीही माझे कौतुक करतात. गुरुदेव किती कृपाळू आहेत !’, असे वाटून माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवच हे करवून घेत असल्याने कृतज्ञता व्यक्त झाली.
३. पौरोहित्याची सेवा शिकतांना आरंभी आलेले अपयश, मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि गुरुदेवांची अनुभवलेली कृपा !
३ अ. आरंभी मंत्रजपाचे आकलन न होऊन उच्चार नीट करता न येणे, गुरुजींनी समजावून आणि नंतर रागावून सांगूनही काही पालट न होणे अन् त्यांनी परात्पर गुरुदेवांना शरण जाऊन प्रार्थना करण्यास सांगणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांच्या कृपेनेच मला पौरोहित्याची सेवा करायला मिळाली. ती सेवा करतांना मला माझे पूर्वीचे (आरंभीचे) दिवस आठवले आणि माझी भावजागृती झाली. मी वर्ष २००८ मध्ये रामनाथी आश्रमातील पुरोहित पाठशाळेत शिकण्यासाठी आलो होतो. त्या वेळी गुरुजींनी एखादा मंत्र शिकवला, तरी मला त्या मंत्राचा उच्चार करता येत नव्हता आणि तो मंत्र नीट वाचताही येत नव्हता. गुरुजी मला आरंभी गायत्रीमंत्र शिकवत होते. ‘त्या मंत्राचा उच्चार कसा करायचा ? स्वर कसे म्हणायचे ?’, हे ते पुष्कळ प्रेमाने शिकवत होते, तरीही मला गुरुजी सांगतात, तसे उच्चार करता येत नव्हते. मला येत नाही; म्हणून काही वेळा गुरुजी माझ्यावर ओरडायचे आणि रागवायचे. ‘‘लक्ष देऊन म्हटले पाहिजे’’, असेही म्हणायचे; परंतु मला आकलनच होत नव्हते. गुरुजी मात्र ‘‘तुला जमणार आहे’’, असे म्हणायचे आणि मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन प्रार्थना करायला सांगायचे.
३ आ. मंत्रजप म्हणावयास जमत नसल्याने मन अस्थिर होणे आणि गुरुदेवांना आर्ततेने शरण जाऊन प्रार्थना केल्यावर ‘तू धीर सोडू नकोस. तुला जमणार आहे’, असा अंतर्मनातून आवाज येऊन मन स्थिर होणे : मी प्रतिदिन रडत रडत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करायचो. ‘माझ्या समवेत असलेल्या सर्व पुरोहितांना हे सर्व जमत आहे. मग ‘मी कुठे न्यून पडत आहे’, हे तुम्ही मला सांगा. तुम्हीच माझ्या मनात वेदांचे शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण केलीत. मी तुम्हाला संपूर्णतः शरण आलो आहे’, अशी प्रार्थना मी प्रतिदिन करत होतो. काही वेळा मला वाटायचे, ‘माझा निर्णय चुकला आहे. मी दुसरे कोणते तरी क्षेत्र निवडायला पाहिजे होते.’ तेव्हा अंर्तमनातून आवाज यायचा, ‘तू धीर सोडू नकोस. तुला सर्व जमणार आहे’ आणि मी पुन्हा स्थिर होत होतो. गुरुजींनी शिकवलेला गायत्रीमंत्र समवेतच्या सर्व मुलांना ५ – ६ दिवसांतच सस्वर म्हणता येऊ लागला; परंतु मला तो मंत्र सस्वर म्हणण्यासाठी अडीच मास लागले.
३ इ. गुरुकृपेने मनात शरणागतभाव निर्माण झाल्याने चांगले मंत्र म्हणता येऊनही अहंभाव निर्माण न होणे : याचा मला एक चांगला लाभ झाला. माझ्या मनात शरणागतभाव निर्माण झाला. ‘मी जे काही मंत्र म्हणतो, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच म्हणत आहे’, याची जाणीव मला भगवंताने करून दिल्याने माझ्यात अहंभाव निर्माण झाला नाही. त्यामुळे मला चांगले मंत्र म्हणता येऊ लागले.
४. सर्व काही गुरुदेवच करवून घेत असल्याची प्रचीती घेत असल्याचे सांगितल्यावर त्यांना आनंद होणे
कार्यक्रमाच्या नंतर मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना यज्ञाचे तीर्थ देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मी त्यांना वरील सर्व प्रसंग सांगितले. त्यांच्याशी बोलतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. मी त्यांना म्हटले, ‘‘माझ्या मनाची किती वाईट स्थिती होती ! त्यातून तुम्हीच मला घडवलेत. इतकेच नव्हे, तर यज्ञांचे प्रमुख पुरोहित म्हणून सेवा करण्याची संधी देऊन तुम्हीच ती माझ्याकडून करवून घेतलीत. आरंभी साधे मंत्रजपही नीट म्हणू न शकणार्या माझ्याकडून यज्ञांचा प्रमुख पुरोहित म्हणून सेवा घडणे, हे माझ्यासाठी एक मोठे आश्चर्य आहे. ‘तुम्हीच सर्व करवून घेत आहात’, हे मला पदोपदी जाणवते.’’ हे ऐकल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘मला हे ऐकून पुष्कळ आनंद झाला. ’’
५. स्वतःचे असे काहीच प्रयत्न नसतांना परम दयाळू गुरुदेवांची क्षणोक्षणी कृपा अनुभवत असल्याने त्यांच्या प्रती व्यक्त झालेली कृतज्ञता !
‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण परात्पर गुरुदेव जाणतात. ‘माझे असे काहीच प्रयत्न नसतांनाही परम दयाळू गुरुदेवांच्या कृपेमुळेच हे सर्व घडत आहे.’ तेव्हा माझ्याकडून कृतज्ञताभावाने पुढील श्लोकाचे स्मरण झाले.
मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ॥
अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानन्दस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळेच माझ्यात पालट घडले आणि मला त्यांच्या जन्मोत्सवात सहभागी होण्याचीही संधी मिळाली, त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. सिद्धेश करंदीकर, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक