Saugat-E-Modi : भाजप देशातील ३२ लाख मुसलमान कुटुंबांना ईदनिमित्त ‘सौगात ए मोदी’ भेटवस्तू देणार !

नवी देहली – ईदच्या निमित्ताने भाजप मुसलमान समाजाला विशेष भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा देशातील ३२ लाख गरीब मुसलमान कुटुंबांना ईदसाठी ‘सौगात ए मोदी’ भेटवस्तू देणार आहे. यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबत वस्त्रे आणि अन्य सामग्री असेल.

१. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे ३२ सहस्त्र पदाधिकारी देशातील ३ सहस्र मशिदींमध्ये जाऊन या भेटवस्तूंचे वाटप करणार आहेत.

२. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मार्च या दिवशी देहलीच्या निजामुद्दीन येथून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

३. ‘या अभियानाच्या अंतर्गत भाजप गरजू मुसलमान समाजापर्यंत पोचणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात गरीब मुसलमान कुटुंबांना साहाय्य करण्यावर भाजपने जोर दिला आहे. त्यामुळे धार्मिक सलोखा वाढवण्यास साहाय्य होईल’, असे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भाजपने मुसलमानांना कितीही जवळ करण्याचा प्रयत्न केला, तर मुसलमान त्याला मते देणार नाहीत, हे आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे भाजपने त्याची शक्ती आणि पैसा मुसलमानांवर वाया घालवण्याऐवजी तो हिंदूंच्या कल्याणार्थ वापरावा. त्याचा पक्षाला नक्कीच लाभ होईल, असेच हिंदूंना वाटते !