|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश उच्च न्यायालयाने एका विद्यापिठातील २० विद्यार्थ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यासह अन्य ५ विद्यार्थ्यांची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवली आहे.
वर्ष २०१९ मध्ये सरकारवर टीका करणार्या फेसबुक पोस्टवरून अबरार फहाद या विद्यार्थ्याला ठार मारल्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने आरोपी विद्यार्थ्यांना ही शिक्षा सुनावली होती. सर्व आरोपी बांगलादेश अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापिठाचे विद्यार्थी होते. ते आता विसर्जित झालेल्या ‘बांगलादेश छात्र लीग’ संघटनेशी संबंधित होते. ही संघटना माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची विद्यार्थी संघटना होती. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी या निर्णयाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, आम्ही यावर समाधानी आहोत; मात्र या निर्णयाची लवकर कार्यवाही (अंमलबजावणी) झाली पाहिजे.