पोलिसांवर आक्रमण करणार्‍यांना सोडणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दंगल प्रकरण

मुंबई – नागपूर येथे घडलेली दंगल सुनियोजित होती; येथे एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरांना, तसेच आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. यात ३ पोलीस घायाळ झाले असून पोलीस उपायुक्तांवर कुर्‍हाडीने वार करण्यात आला. पोलिसांवर आक्रमण करणारे जे कुणी असतील, त्यांना सोडणार नाही. या घटनेत वाहने जाळण्यात आली. संपूर्ण घटनेत ३३ पोलीस घायाळ झाले आहेत. एकूण ५ नागरिक घायाळ झाले आहेत. तिघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दोघे रुग्णालयात असून एकजण अतीदक्षता विभागात भरती आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले…,

१. या प्रकरणी ३ गुन्हे नोंदवण्यात आले असून २ गुन्हे नोंदवले जात आहेत. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

२. प्रवेशाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तेथे तैनात करण्यात आल्या आहेत.

३. संबंधितांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही अनुमती दिली जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेले आक्रमण चुकीचे आहे.

४. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणे, हे आपले सर्वांचे दायित्व आहे. मी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की, या काळात सर्व समाजांचे धार्मिक सण चालू आहेत. अशा परिस्थितीत सगळ्यांनी संयम ठेवायला हवा.

औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करावे लागणे दुर्दैवी ! – मुख्यमंत्री

खरेतर औरंगजेबाची कबर हवी कशाला ? पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्याला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले. त्याचे संरक्षण करण्याचे दायित्व केंद्र आणि राज्य सरकार यांचे आहे. सहस्रो लोकांना मारणार्‍या औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण करावे लागते, हे दुर्दैव आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.

राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अत्यंक क्रूरकर्म्या औरंगजेबाची तुलना कुणाशीही केली जाऊ शकत नाही; परंतु सपकाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्याच्याशी तुलना करतात, हे अतिशय निंदनीय आहे. हे राज्य छत्रपतींच्या आदर्शावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांचा अवमान हा महाराष्ट्राचा अवमान आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे.

औरंगजेबाने आपल्या भावाचा खून केला. वडिलांना अटक केली. लहान भावाला वेडे ठरवले. छत्रपती संभाजी महाराजांनाही छळले. त्यामुळे औरंगजेब निश्‍चित क्रूर होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही तेवढ्याच क्रूर पद्धतीने कारभार करत आहे, असे विधान सपकाळ यांनी केले होते. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली.

नागपूर येथे दंगलीनंतरच्या घडामोडी !

१. नागपूर येथील दंगलीनंतर पोलिसांकडून अन्वेषण, तसेच ‘कोंबिंग ऑपरेशन’ (एकाच ठिकाणी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात झडती घेणे) चालू आहे. या प्रकरणी १५० हून अधिक जणांविरोधात गुन्हे नोंदवून अनेकांना अटक करण्यात आली आहे. पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू आहे. १ सहस्र ८०० सामाजिक माध्यमांची झडती घेण्यात येत आहे. पोलिसांकडून अडथळे उभारले (बॅरिकेडिंग) जात आहेत.

२. जमावाने क्रेन आणि जेसीबी जाळल्याने विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आल्याने त्यांची वैयक्तिक स्वरूपाचीही हानी झाली आहे. शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड करण्यात आली.

३. जमावाने तोंडावर रुमाल आणि मास्क लावले होते. त्यांनी एका चारचाकी गाडीत मोठा दगड टाकून गाडी पेटवून दिली. गाडीला आग लागल्यानंतर शेजारच्या एका हिंदु कुटुंबाच्या घराची भिंत आणि खिडकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे खिडकी आणि भिंत हा परिसर काळाकुट्ट झाला आहे.

४. दंगलीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी देण्यात आली.

५. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले. पोलिसांनी बळजोरीने दुकाने बंद केल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास १ सहस्र पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.

६. महाल-गांधी गेटकडे जाणार्‍या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडिंग’ करून मार्ग बंद करण्यात आले. या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील नागरिकांची गर्दी पोलिसांनी पांगवली. त्यामुळे अनेकांनी पोलिसांवरही रोष व्यक्त करत पोलिसांविरुद्ध निदर्शने केली; मात्र पोलिसांनी गर्दी पांगवली.

७. दंगलीनंतर रस्त्यावर झालेला कचरा गोळा करून नागपूर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत परिसर स्वच्छ केला. या कचर्‍यात मोठ्या प्रमाणात दगड आणि काचा होत्या.