1984 Anti Sikh Riots Case : काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

देहलीतील वर्ष १९८४ ची शीखविरोधी दंगल

आरोपी सज्जन कुमार

नवी देहली – येथील  राऊस अव्हेन्यू न्यायालयाने देहलीत वर्ष १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पीडितांनी सज्जन कुमार यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हे प्रकरण दंगलीच्या वेळी सरस्वती विहारमध्ये जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येशी संबंधित आहे. सज्जन कुमार सध्या दंगलीच्या दुसर्‍या एका प्रकरणात तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

सज्जन कुमार यांच्यावरील अन्य २ खटले

१. दिल्ली कॅन्टमधील पालम कॉलनीमध्ये ५ शिखांच्या हत्येनंतर गुरुद्वारा जाळण्यात आला. या प्रकरणात सज्जन कुमार दोषी आढळले. १७ डिसेंबर २०१८ या दिवशी देहली उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

२. देहलीच्या सुलतानपुरी येथे झालेल्या ३ शिखांच्या हत्येप्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले.


काय आहे शीखविरोधी दंगल ?

३० ऑक्टोबर १९८४ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. यानंतर देहलीत दंगल उसळली. या शीखविरोधी दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या नानावटी आयोगाच्या अहवालानुसार एकट्या देहलीत ५८७ गुन्हे नोंद झाले होते, ज्यामध्ये २ सहस्र ७३३ लोक मारले गेले होते. देशभरातील मृतांची संख्या ३ सहस्र ५०० च्या जवळपास होती. एकूण प्रकरणांपैकी सुमारे २४० प्रकरणे बंद करण्यात आली, तर २५० प्रकरणांमध्ये आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !
  • ४१ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होय !