
नवी देहली – येथे २४ फेब्रुवारी या दिवशी ‘फाऊंडेशन अगेन्स्ट कंटिन्युइंग टेररिझम्’ (फॅक्ट) या संस्थेने एक प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’ने बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटनांवर चर्चासत्र आयोजित केले होते. यात अनेक तज्ञ, राजनैतिक अधिकारी आणि पत्रकार सहभागी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीने बांगलादेशाला अप्रत्यक्ष चेतावणी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होणारे कधीही न संपणारे अत्याचार’ या विषयावरील चर्चेत भाग घेतला. चर्चेत ते काय म्हणाले हे समजू शकलेले नाही.
अजित डोवाल यांची कोलकात्यामध्ये गुप्त बैठक
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या आठवड्यात कोलकात्याला अचानक भेट दिली. ही भेट अत्यंत गोपनीय होती. या भेटीचे कारण बंगाल आणि बांगलादेश यांमधील वाढता धोका असल्याचे सांगितले जात आहे. बंगाल नक्षलवादी आणि जिहादी आतंकवादी यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे. डोवाल यांनी गुप्तचर अधिकार्यांसमवेत अनेक बैठका घेतल्या. पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमधील सर्व गुप्तचर अधिकारी या बैठकांना उपस्थित होते. यात बांगलादेशामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या (‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’च्या) वाढत्या कारवायांवर चिंता व्यक्त करण्यात आली. गुप्तचर यंत्रणांना सतर्क रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः बीरभूम, मालदा, मुर्शिदाबाद आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांना देखरेखीखाली ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक मान्यताप्राप्त नसलेले मदरसे आहेत. हे मदरसे आतंकवाद्यांना साहाय्य करू शकतात.