Kash Patel Oaths On Bhagavad Gita : काश पटेल यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली एफ्.बी.आय.च्या संचालक पदाची शपथ

(एफ्.बी.आय. म्हणे ‘फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ – सांघिक अन्वेषण यंत्रणा)

काश पटेल

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कश्यप (काश) पटेल यांनी ‘फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन’ (एफ्.बी.आय.) या अन्वेषण यंत्रणेचे संचालक म्हणून शपथ घेतली. विशेष असे की, शपथ घेतांना त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेवर हात ठेवला होता. काश पटेल यांचा कार्यकाळ १० वर्षांचा असणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी म्हटले होते की, काश मला आवडण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सर्व कर्मचार्‍यांचा त्याच्याप्रती असलेला आदर. काश पटेल आतापर्यंतचा सर्वोत्तम संचालक म्हणून ओळखला जाईल. तो एक अतिशय श्रम करणारा आणि कणखर व्यक्तीमत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या स्वतःच्या भूमिका आहेत.

कोण आहेत काश पटेल ?

काश पटेल यांचे आई-वडील वर्ष १९७० मध्ये गुजरातहून प्रथम कॅनडा आणि नंतर न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. काश पटेल यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. पटेल यांनी तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस ‘चीफ ऑफ स्टाफ’ (कार्यालय प्रमुख) म्हणून देखील काम केले होते.