Demolish Aurangzeb’s Tomb : औरंगजेबाची कबर बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त करा ! – आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी

भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर येथील मोगल बादशाह औरंगजेब याच्या कबरीवर बुलडोझर चालवावा, अशी मागणी भाग्यनगर (तेलंगाणा) येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी केली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केलेल्या व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे.

औरंगजेबाच्या पिलावळीस धडा शिकवण्यासाठी मावळे सिद्ध आहेत !

आमदार टी. राजा सिंह यांनी यात म्हटले आहे की, छावा चित्रपटातून दाखवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाकडून करण्यात आलेले अत्याचार पाहून हिंदूंचे रक्त उसळत आहे. महाराष्ट्रातील जनतेला अत्याचार ठाऊक होते; मात्र चित्रपटाद्वारे आम्ही भारतियांना त्यांची माहिती झाली आहे. चित्रपटात केवळ काही प्रमाणातच अत्याचार दाखवण्यात आले आहेत. तरीही ते सहन होत नाहीत. यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणार्‍या, त्यांचे तुकडे करणार्‍या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या भूमीत नसावी. औरंगजेबाचे नाव महाराष्ट्राच्या भूमीवरून पुसले गेले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना यासाठी विनंती करत आहे की, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी. तुम्ही काळजी करू नये की, औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी त्याची अनौरस पिलावळ उभी राहील. त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील मावळे सिद्ध आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना पुन्हा मिळवण्यासह आक्रमकांची प्रतिके नष्ट केली जाणे अत्यावश्यक आहे. गौरवशाली इतिहासाचे स्मरण करूनच उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते. टी. राजा सिंह यांनी केलेल्या या स्वागतार्ह मागणीने यास आरंभ झाला पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमी समाजाची भावना आहे.