‘छावा’ या हिंदी चित्रपटाने ‘१४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हॅलेन्टाइन डे’ या अभद्र प्रथेला फाटा देण्याचे महत्कार्य केले आहे. या चित्रपटामुळे प्रथमच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अद्वितीय शौर्य, असीम धैर्य, पराकोटीची स्वराज्यनिष्ठा, जाज्वल्य धर्मप्रेम, तसेच मोगलांचे पशूतुल्य क्रौर्य यांची माहिती अवघ्या जगाला झाली. चित्रपटांद्वारे सतत हिंदु धर्म, देवता यांची टिंगलटवाळी करणे, हिंदूंना मुद्दाम आतंकवादी दाखवणे, सत्यकथेत पालट करून ‘अॅसिड’ फेकणार्या मुसलमानाचे नाव पालटून त्याला चित्रपटात हिंदु दाखवणे अशी अपकृत्ये करून हिरवी तळी राखणार्यांना हे भगवे प्रत्युत्तरच जणू दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिले आहे. त्यामुळे या अजरामर चित्रपटाविषयी उतेकर आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन झालेच पाहिजे !
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आजवर महाराष्ट्रापुरता मर्यादित होता. त्यांच्यावरील मालिका साकारणार्यांना काही मुसलमानधार्जिण्या राज्यकर्त्यांनी छुपा विरोध केला. ‘१६८९ संभाजी’सारख्या चित्रपटांना निधीअभावी रखडवण्यात हे लांगूलचालनकर्ते यशस्वी झाले होते. शंभूराजांची भूमिका करणार्या कलावंतांनाच फितवून मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टी निधर्मीवाद्यांच्या दावणीला बांधली होती. मराठी चित्रपटकर्त्यांनी गेल्या काही वर्षांत ही बंधने तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला मर्यादित यश आले. याउलट ‘छावा’ या चित्रपटाने सर्व जोखडं फेकून देत निधर्मीवाद्यांना सणसणीत चपराक दिली आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या स्वप्नाळू जीवनात गुंतू शकणार्या तरुणाईला शंभूराजांच्या विलक्षण राष्ट्र आणि धर्म प्रेमाविषयी विचार करायला लावले आहे. लक्ष्मण उतेकर या कसलेल्या दिग्दर्शकाने शंभूराजांची गाथा साता समुद्रापार नेण्याच्या केलेल्या यशस्वी प्रयत्नांची ती सर्व उपांगेच म्हटली पाहिजेत !
– संकलक : श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर
१. चित्रपटाची वैशिष्ट्ये !
अ. चित्रपटाची कथा कै. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवरून घेतली आहे; मात्र कादंबरीतील विशिष्ट प्रसंगांची निवड अप्रतिम झाली आहे. रिषी विरमानी आणि इर्शाद कामिल यांनी लिहिलेले संवाद क्षात्रवृत्तीवर्धक आणि धारदार झाले आहेत.
आ. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती थोडक्यात कथन केली जाते. त्यानंतर चालू झालेल्या पहिल्या लढाईच्या प्रसंगापासूनच चित्रपट प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतो.

इ. या चित्रपटात शंभूराजेंचे निधर्मीपण दर्शवणारा एक प्रसंग प्रारंभी आहे; मात्र त्यानंतर कुठेही निधर्मीवादाचा उदोउदो केलेला नाही. आज अनेकजण छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ दर्शवण्यासाठी मनानेच त्यांच्या सैन्यात काही मुसलमान दाखवतात; मात्र तसले कोणतेही दृश्य या चित्रपटात नाही.
ई. लढाईची दृश्ये आजच्या तरुणांना आकर्षून घेणारी झाली असली, तरी त्यातून शंभूराजांचे शौर्य, युक्ती, शक्ती हे सर्व जनमानसात रुजवण्यात ती यशस्वी झाली आहेत. मराठ्यांच्या इतिहासाचा अविभाज्य घटक असलेला गनिमी कावा या चित्रपटातून विशेष अधोरेखित होतो.
उ. औरंगजेब किती हिंस्र, क्रूर, निम्नस्तरीय विचारसरणीचा आणि पाताळयंत्री होता, हे या चित्रपटाने अत्यंत प्रभावीपणे सादर केले आहे. यामुळे स्वतःचा बाप, भाऊ, मुलगा यांचा बळी देऊन सत्ता उपभोगणार्या मोगलांचा हिरवा इतिहास अत्यंत सहजतेने लोकांपर्यंत पोचतो.
ऊ. स्वराज्याचे शत्रू असलेले गणोजी आणि कान्होजी शिर्के यांसारख्या दुष्प्रवृत्तींविरुद्धचा रोष प्रेक्षकांमध्ये पसरतो.
ए. चित्रपटात सर्वच लढाया अद्वितीय दर्शवल्या आहेत. संगमेश्वरची लढाई आणि शंभूराजांना जेरबंद करतांना झालेली मोगलांची दयनीय अवस्था विशेषत्वाने परिणामकारक झाली आहे. तेव्हाच्या आणि जेरबंद झाल्यानंतरच्या शंभूराजांच्या डरकाळ्या संपूर्ण चित्रपटगृह दणाणून सोडतात. अन्य चित्रपटांत केवळ कपोलकल्पित कथांमध्ये नायकाला सर्वोच्च दर्शवण्यासाठी पेरलेल्या सवंग दृश्यांपेक्षा ही सगळी दृश्ये अंगावर येतात; कारण त्याला शंभूराजांच्या अद्वितीय शौर्याचा, सत्यतेचा आणि धर्मप्रेमाचा स्पर्श आहे.
ऐ. प्रारंभी शंभूराजेंची विजयगाथा असलेला हा चित्रपट शेवटाकडे वळतांना त्यांच्या असीम बलीदानाप्रती प्रत्येकाला मान झुकवायला लावतो. प्रारंभी शंभूराजेंच्या विजयतृष्णेचा रथ पाहून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणारे युवक राजेंचा छळ पाहून निःशब्द होतात. प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघते. मोगलांच्या क्रौर्याविरुद्ध तळपायाची आग मस्तकाला पेटते आणि जणू हिंदवी स्वराज्याचा हुंदकाच प्रेक्षक अनुभवतो.
२. चित्रपटाच्या कलाकारांचा समृद्ध अभिनय !

अ. विकी कौशल यांनी ‘शंभूराजे’ ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट म्हणजे वजन वाढवणे, तलवारबाजी शिकणे, घोडेस्वारी शिकणे हे सर्व दिसून येते. शंभूराजे त्यांच्या नसानसांतच जणू भिनले आहेत, इतका वास्तव अभिनय त्यांनी केला आहे. शंभूराजांना कैद केल्यानंतरचा त्यांचा त्वेष, देहाची लक्तरे पडत असतांनाही जागृत असलेली विजिगिषु वृत्ती, जिभ कापली, तरी डोळ्यांतून बाहेर पडणारी आग, राष्ट्रप्रेमाची धग, जाज्वल्य धर्मनिष्ठा हे सर्व प्रेक्षकांना मुग्ध करून टाकते. आजच्या पिढीतील सर्वांत गुणी, अभ्यासू आणि वास्तवाला धरून पात्राशी एकरूप होणारा कलाकार म्हणून विक्की कौशल यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

आ. शांत वाटणारा म्हातारा इरेला पेटल्यानंतर किती बेदरकार अन् खूनशी होतो, हे औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्ना यांनी छान वठवले आहे. अक्षय यांच्या योगदानामुळे मोगलांच्या हिरव्या मनोवृत्तीविषयी प्रेक्षकांमध्ये चीड निर्माण होते.

इ. रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसूबाईंची भूमिका केली आहे. एका हिंदु महाराणीचा तडफदारपणा, उत्कृष्ट राजकीय समज, माणसाची पारख, तत्त्वनिष्ठा आणि केवळ पतीचे मनोगतच नव्हे, तर स्वराज्याची आवश्यकता ओळखून दुःख पाठीवर टाकणारी खंबीर महाराणी या सर्व छटा रश्मिका यांनी समर्थपणे पेलल्या आहेत.
ई. अन्य कलाकारांमध्ये आशुतोष राणा (सरसेनापती हंबीरराव मोहिते), विनित कुमार सिंग (कवि कलश), दिव्या दत्ता (महाराणी सोयराबाई), संतोष जुवेकर (रायाजी माल्गे) आदींच्या भूमिकाही उठावदार झाल्या आहेत.
३. अन्य महत्त्वाची सूत्रे

अ. चित्रपटातील शंभूराजांचे पूर्ण पात्रच अनुकरणीय असे आहे. शंभूराजांचे नेतृत्व, निर्णयकुशलता, धर्माभिमान, सहनशीलता, दुर्दम्य इच्छाशक्ती, क्षात्रतेज, ब्राह्मतेज, ईश्वरावरील श्रद्धा इ. गुण येथे शिकायला मिळतात. समोरून येणार्या शत्रूपेक्षा आपल्याच गोटातील फितूर किती घातक असतात, हा महत्त्वाचा धडा चित्रपट देतो.
आ. चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत हे ए.आर्. रहमान यांनी दिले आहे. शंभूराजेंच्या संदर्भातील ‘तुफान’ हे गीत श्रवणीय आणि प्रसंगानुरूप बलश्री निर्माण करणारे आहे. एकूणच चित्रपटातील संगीत अन् पार्श्वसंगीत सर्व दृश्यांतील मारकता अन् दाहकता यांना एका वेगळ्या उंचीवर नेणारा सुखद अनुभव देते.
इ. चित्रपटगृहामध्ये आधीपासूनच भगवे ध्वज लावले आहेत. अनेक हिंदु तरुणांचे गट भगवे ध्वज घेऊन, भगवी उपरणे, वेश आदी परिधान करून शिव-शंभूंचा जयघोष करत चित्रपटगृहांत येत आहेत. शंभूराजांच्या प्रवेशाच्या वेळी चित्रपटगृहात चालू होणारा जयघोष आणि शेवटी पसरणारी स्मशानशांतता हे हिंदूंच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. ‘व्हॅलेन्टाईन डे’ला धाब्यावर बसवून हिंदुत्वाची लाट आणणार्या या चित्रपटाबद्दल प्रत्येक हिंदूने कृतज्ञ राहिले पाहिजे ! तसेच या चित्रपटाला आलेले धर्मांध आणि औरंग्याप्रेमी कोणते-ना-कोणते कारण काढून हिंदूंवर आक्रमणेही करू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे ! त्यामुळे हिंदूंनी चित्रपट पहातांनाही योग्य ती सावधानता आणि सतर्कता बाळगली पाहिजे !
#Chhaava Review : A Compelling Movie that powerfully depicts the greatest sacrifice for Dharma!
|
४. चित्रपटाचे सर्वेसर्वा ‘लक्ष्मण उतेकर’ यांचे विशेष अभिनंदन !

लक्ष्मण उतेकर यांचे चित्रपट दिग्दर्शन उत्कृष्ट झाले आहे. त्यांच्या शिवप्रेमाची प्रचिती चित्रपटातील सर्वच प्रसंगांतून येते. त्यांनी हिंदूंच्या धर्मभावनांचा आदर राखला आहे. सेक्युलरवादी किंवा औरंगजेबी पिलावळ यांना कोणतीही टीकेची संधी साधू द्यायची नाही, यात ते यशस्वी झाले आहेत. चित्रपटमाध्यम म्हणून आवश्यक असलेली साधनशुचिता बाळगतांना ही शौर्यगाथा जगभर विनाअडथळा पोचवण्याचा त्यांचा हेतू साध्य झाला आहे. विदेशातील अलेक्झांडरसम स्वयंघोषित लढवय्यांच्या लुटूपुटूच्या लढाया चित्रपट माध्यमाद्वारे जगभर पोचवून त्याच्या बिदागीवर उदरनिर्वाह करणार्या चित्रपटकारांना उतेकरांनी तोंडघशी पाडले आहे.
उतेकरांचे विशेष अभिनंदन यासाठी, की त्यांनी या चित्रपटात शंभूराजेंचे धर्मवीरत्व दर्शवणारा छोटा का असेना; पण एक महत्त्वपूर्ण प्रसंग घातला आहे. औरंगजेब शंभूराजेंना धर्मांतर करण्याचे आमिष दाखवतो; मात्र राजे त्यालाच आपल्या गोटात येण्याचे आवाहन करतात. हा प्रसंग म्हणजे ‘गेली अनेक वर्षे दाऊद इब्राहिमसारख्या अधोविश्वातील धर्मांध गुंडांच्या हातातील कठपुतळी बनलेल्या आणि धर्मांधांची तळी उचलण्यासाठी आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन त्यांना अपकीर्त करणार्या ‘बॉलिवूड’करांना ‘भगवे प्रत्युत्तर’ आहे.
५. सर्वांना आवाहन !
असा चित्रपट अनेक वर्षांतून एकदाच बनतो. आजवर धर्मांध मोगलांची खूनशी बाजू कुणासमोरही येऊ देऊ नये, यासाठी या विषयावर अनेक कादंबर्या असूनही कुणीही या विषयाला हात घातला नव्हता. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीवर आलेले हिरवे शेवाळ दूर करण्याचा प्रारंभ ठरू शकतो. त्यामुळे आणि शिव-शंभूराजांचे पाईक म्हणून ही शौर्यगाथा आपण पाहिलीच पाहिजे. तसेच हा चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन बघितल्यास त्याचा चित्रपटकर्त्यांना आर्थिक लाभ होऊन त्यांची पाठ थोपटल्यासारखे होईल. सर्वच पालकांनी मुलांसमोर राष्ट्र आणि धर्म प्रेमाचा आदर्श निर्माण व्हावा, यासाठी बालकांना हा चित्रपट दाखवायला हवा !