नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: हटवली !

पोलीस आयुक्तांनी लागू केले आदेश !

प्रतिकात्मक चित्र

नागपूर – शहरात १७ मार्चच्या रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास धर्मांधांनी  हिंसाचार घडवून आणला होता. त्यानंतर पोलिसांनी नागपूर शहरातील ११ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संचारबंदी लागू केली होती. हिंसाचाराच्या ६ दिवसांनंतर म्हणजे २३ मार्च या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून शहरातील संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याविषयीचे आदेश लागू केले आहेत.

नागपूर शहरात हिंसाचार उसळल्यानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दंगलग्रस्त परिसराशिवाय अन्य भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने संचारबंदी उठवण्यास अनुमती दिली होती. लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता कायम राखतील, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतील, अशी आम्ही आशा करतो, असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी म्हटले आहे.

नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: उठवली असली, तरी भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी आणि इतर तणावग्रस्त भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रहाणार आहे. तेथे सशस्त्र सैनिक अजूनही रस्त्यावर तैनात आहेत. पोलिसांचीही  गस्त वाढवण्यात येणार आहे. संचारबंदी हटवल्यानंतर जर कुणी संशयास्पद स्थितीत फिरतांना किंवा हालचाली करतांना आढळल्यास त्याला त्वरित कह्यात घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.