भ्रमणभाषवर क्रिकेट सामना पहात बस चालवणार्‍याला कामावरून काढले !

परिवहनमंत्री प्रतावराव सरनाईक यांची कारवाई !

मुंबई – क्रिकेटचा सामना पहात बस चालवणार्‍या चालकावर एस्.टी. महामंडळाने कारवाई केली आहे. या बसचालकाला कामावरून काढण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिली, तसेच चालक पुरवणार्‍या खासगी आस्थापनाला ५ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

दादर ते स्वारगेट (पुणे) येथे जाणार्‍या ई-शिवनेरी बसचा चालक २१ मार्चच्या रात्री लोणावळा येथे बस चालवत असतांना क्रिकेटची मॅच पहात होता. गाडीतील एका प्रवासाने याचे चित्रीकरण करून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी संबंधित चालकावर कारवाई करण्याचा आदेश दिला. याविषयी प्रताप सरनाईक म्हणाले की, अपघातविरहित सेवा हा या बससेवेचा नावलौकिक आहे. अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या चालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांचा ‘एस्.टी.’च्या या प्रतिष्ठित सेवेविषयीचा विश्वास दृढ होत जाईल. भविष्यात एस.टी.कडे असलेल्या खासगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची आवश्यकता आहे.